समाजातील नकारात्मकता पुढे आणून तीवर प्रहार करण्याचे धाष्टर्य़ जोपर्यंत दाखवले जात नाही तोपर्यंत सकारात्मक असे काही जन्मास येत नाही..

सध्याच्या वातावरणात नकारात्मकतेचा नगारा पिटला जातो म्हणून देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात बराच थयथयाट केला. स्थलांतरित मजुरांसंदर्भातील याचिका न्यायालयात आली असता मेहता यांनी काही माध्यमांची संभावना जगबुडीवादी (प्रॉफेट्स ऑफ डूम), गिधाडे अशा शेलक्या शब्दांत केली. माध्यमांच्या या वास्तववादी वर्णनाबद्दल मेहता यांचे अभिनंदन. असे करणारे मेहता हे पहिले नाहीत. तितकी त्यांची प्रतिभा नाही. हे अशा प्रकारचे मध्यमबुद्धी माध्यमदुष्ट मेहता वेळोवेळी फोफावतात याचे कारण ते ज्यांची सेवा करीत असतात त्यांचे परिस्थितीवर नियंत्रण नसते आणि त्याची चिंता मालकापेक्षा मेहता यांच्यासारख्या चाकरालाच अधिक असते. आपल्या धन्यास ‘पोपट मेला आहे’ हे सांगण्याचे धैर्य या अशा चाकरांत नसते आणि ते राजापेक्षा आपली राजनिष्ठता दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत. एरवी या अशा चाकरांची दखल न घेणेच रास्त. परंतु प्राप्त परिस्थितीत मेहता यांच्यासारख्यांमुळे राजा आणि प्रजा दोघांपुढेही आव्हान उभे राहणार असल्याने त्याचा समाचार घ्यायला हवा. त्यामागील हेतू मेहता यांचा पाणउतारा करणे- तितके ते महत्त्वाचे नाहीत- हा नसून यानिमित्ताने नकारात्मकतेमागील सकारात्मकता अधोरेखित करणे हा आहे.

याचे कारण या देशात गेल्या काही शतकांत जे काही सकारात्मक घडले त्यामागे मेहता नाराजी व्यक्त करतात ती नकारात्मकता आहे, हे भान हरवून चालणारे नाही. त्याच्या पुराव्यासाठी जोतिबा फुले यांच्या ‘शेतकऱ्यांच्या आसुडा’पर्यंत, बाळ गंगाधर टिळकांच्या ‘भारतीय असंतोषाचे जनक’ या उपाधीपर्यंत, सावरकरांच्या हिंदू धर्म सुधारणांच्या प्रयत्नांपर्यंत वा आंबेडकरांच्या हिंदू धर्म त्यागापर्यंत मागे जाण्याची गरज नाही. समाजातील नकारात्मकता पुढे आणून तीवर प्रहार करण्याचे धाष्टर्य़ जोपर्यंत दाखवले जात नाही तोपर्यंत सकारात्मक असे काही जन्मास येत नाही, हे सार्वकालिक सत्य. त्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची. आताही मेहता ज्याविषयी संतापले तो स्थलांतरित मजुरांचा मुद्दा माध्यमांनी लावून धरला नसता तर जे काही किरकोळ सकारात्मक घडले तेही घडले नसते. म्हणून मेहता यांनी माध्यमांतील नकारात्मकतेस दोष देण्यापेक्षा त्यामागील कारणांना भिडण्याचे शौर्य आणि शहाणपण दाखवणे गरजेचे होते.

तसे केले असते तर त्यांना माध्यमांना या नकारात्मक चित्रप्रदर्शनाची गरज का लागली याची जाणीव झाली असती. त्यांना हेही कळले असते की कोविडयोद्धय़ांच्या गौरवार्थ थाळीवादनाच्या तयारीस तीन दिवस देणाऱ्या सरकारने स्थलांतरितांना आपले जगण्याचे मार्ग शोधण्यासाठी कसेबसे फक्त तीन तास दिले. मेहता यांना हेही समजले असते की ज्या एका तीन आठवडय़ांच्या टाळेबंदीने विषाणूंच्या प्रसाराची साखळी तुटण्याचे दावे केले जात होते ती साखळी दोन महिन्यांनंतर उलट अधिकच मजबूत होत असताना स्थलांतरित मजुरांचे जिणे अधिकाधिक अशक्त होत गेले. या स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी आधी जाऊ दिले जावे अशी मागणी राज्य सरकारे करीत असताना आपण ज्या सरकारचे प्रतिनिधित्व करतो त्यांनी तीकडे कसे दुर्लक्ष केले याचाही साक्षात्कार मेहता यांना झाला असता. अशा वेळी खरे तर या स्थलांतरितांच्या हालअपेष्टा जनतेसमोर आणण्याचे ‘नकारात्मक कार्य’ माध्यमांनी अत्यंत सकारात्मकरीत्या केले. माध्यमांच्या या सकारात्मक कृत्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय दाहात होरपळण्याची वेळ आल्यानेच मेहता ज्याची चाकरी करतात त्या सरकारला जाग आली आणि ज्या काही तुटपुंज्या उपाययोजना झाल्या त्या झाल्या. याचा अर्थ असा की माध्यमांनी मेहता ज्यास नकारात्मकता म्हणतात ती दाखवली नसती तर कालांतराने या मजुरांतील असंख्यांच्या मरणवार्ताच समोर येऊ लागल्या असत्या. म्हणजेच माध्यमांची ही कथित नकारात्मकता भविष्यातील अनेक दु:खद घटनांना आळा घालू शकते. म्हणून ती महत्त्वाची.

त्यासाठीच शहाण्या राज्यकर्त्यांनी माध्यमांकडून होणाऱ्या वास्तवदर्शनास नकारात्मक म्हणायचे नसते. आता जे सत्तेवर आहेत त्यांना याची जाणीव करून द्यायला हवी की मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या कालखंडातील निष्क्रियता चव्हाटय़ावर मांडून माध्यमांनी तत्कालीन राज्यकर्त्यांविषयी नकारात्मकता निर्माण केली नसती तर विद्यमानांना सत्तासंधी मिळती ना. ज्या कथित दूरसंचार घोटाळ्यावर या मंडळींनी रान पेटवले त्यात माध्यमांचाच वाटा मोठा होता. पुढे हा दूरसंचार घोटाळा म्हणजे खोटी आवई होती हे सत्यदेखील जनतेसमोर आणले ते न्यायपालिका आणि माध्यमे यांनीच. ज्या बोफोर्स तोफातील भ्रष्टाचाराचा बागुलबोवा उभा करून विरोधकांना काँग्रेसविरोधात आपले बस्तान बसवता आले तो व्यवहार माध्यमांनीच समोर आणला होता. खरे तर आताच्या सत्ताधीशांनी या कथित घोटाळ्याची पाळेमुळे खणून त्यातील आरोपींना शासन करायला हवे होते. दूरसंचार घोटाळ्याबाबतही या सत्यप्रेमी सरकारने संबंधितांना कठोरातील कठोर शासन होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी होती. उलट या सरकारच्या काळात या दोहोंतील काहीच घडले नाही. ना बोफोर्स व्यवहाराबाबत कोणास शासन झाले ना दूरसंचार घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढली गेली. अशा वेळी मेहता यांच्यासारख्या सकारात्मकतावादी विधिज्ञांनी आपल्या धन्यांस या कामी मदत करायला हवी. पण तसे काही झाल्याचे दिसत नाही. तथापि हे सकारात्मकतावादाचे खूळ डोक्यात गेलेले मेहता हे काही एकटे नाहीत. ते निदान तसे पोटासाठी तरी करत असतील. पण समाजातील एका मोठय़ा भक्तिभाववादी गटाकडूनदेखील अलीकडे माध्यमांतील वाढत्या नकारात्मकतेबद्दल सुस्कारे सोडले जातात.

दांभिक या एका शब्दात समाजातील या गटाचे रास्त वर्णन करता येईल. याचे कारण असे की काँग्रेस सत्तेवर असताना अशी ‘नकारात्मकता’ दर्शवणाऱ्या माध्यमांना याच दांभिकांकडून ‘निर्भीड’, ‘निष्पक्ष’ आदी विशेषणांनी गौरविले जात असे. पण या वर्गाची लबाडी अशी की तीच माध्यमे तेच आपले वास्तवदर्शनाचे नियत कर्तव्य आता करू लागले की मग मात्र यांचा मस्तकशूळ उठतो. म्हणजे काँग्रेस सत्तेवर असताना सरकारचे वाभाडे काढले की माध्यमांचा उदोउदो. आणि तेच काम सांप्रतकाळी माध्यमांनी केले की मात्र माध्यमे नकारात्मक आणि त्यापुढे जाऊन राष्ट्रद्रोही. मेहता यांच्यासारख्या बुद्धिमानाने खरे तर हा विरोधाभास दाखवून द्यायला हवा आणि खरी कर्तव्यच्युती कोणाकडून होत आहे हे दाखवून द्यायला हवे.

सरकारची निष्क्रियता दाखवून देणे हे माध्यमांचे कर्तव्यच. सरकार कोणत्याही पक्षाचे असो. व्यवस्था तितकीच संवेदनशून्य आणि राज्यकर्ते कमीअधिक प्रमाणात तितकेच बेमुर्वतखोर असतात. म्हणून माध्यमांनी आपले कर्तव्य नेहमी सरकारनिरपेक्ष पार पाडणेच अपेक्षित असते. आणि आताही माध्यमांनी तेच केले. सरकारला दांडगे बहुमत आहे म्हणजे सरकारची प्रत्येक कृती रास्तच असते असे नव्हे. किंबहुना बहुमताच्या आनंदात बऱ्याचदा सरकारी कृती बेफिकिरीच्या जवळ जाणाऱ्या असतात. अशा वेळी अशा सरकारांना भानावर आणण्याची जबाबदारी माध्यमांची. तीच या काळात काही निवडक(च) माध्यमांनी पार पाडली. त्याबद्दल त्यांना नकारात्मकतावादी ठरवले जात असेल तर तो त्यांचा गौरव ठरतो. माध्यमे म्हणजे सरकारचे टाळकुटे गौरवगणंग (चीअरलीडर्स) वा रोजंदार जल्पक नव्हेत. यानिमित्ताने माध्यमांना काहींनी गिधाडांची उपमा दिली. परिसराच्या स्वास्थ्यासाठी जितकी गिधाडे आवश्यक तितकीच समाजाच्या स्वास्थ्यासाठी निष्क्रियतेची रानोमाळ पसरलेली कलेवरे दाखवून देणारी माध्यमेही गरजेची. मेहता यांची विधाने म्हणजे हा गिधाडगौरव ठरतो. म्हणून त्याचे स्वागत.