भारतीय साहित्य क्षेत्रात ज्ञानपीठ हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार समजला जात असला तरी सरकारी पातळीवर केंद्रीय साहित्य अकादमीची शान वेगळीच आहे. ही संस्था स्वायत्त असली तरी या संस्थेशी संबंधित साहित्यिकांमध्येही गटातटाचे राजकारण चालत असल्याने या पुरस्कारवाटपात अनेकदा अनाकलनीय घटना घडल्या आहेत. जी. ए. कुलकर्णी यांना जाहीर झालेला  पुरस्कार तांत्रिक बाबीवरून मागे घेतला गेला. मराठीतील अव्वल दर्जाचे कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तो ‘टीकास्वयंवर’ या समीक्षाग्रंथासाठी. श्रेष्ठ कवी ग्रेस यांना हा पुरस्कार ललित लेखनासाठी देण्याची किमया अकादमीने केली. दोन-तीन वर्षांपूर्वी  वा. ल. कुलकर्णी यांच्यानंतरच्या पिढीतील मान्यवर समीक्षकाचे पुस्तक डावलून तुलनेने तरुण लेखकाच्या पुस्तकाला हा पुरस्कार बहाल केला गेला. यंदा मात्र मराठी समीक्षेचा सन्मान अकादमीने केला. नामवंत समीक्षक म. सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’या समीक्षाग्रंथाला हा पुरस्कार मिळाला, ही खचितच आनंददायी बाब आहे. मराठीमध्ये समीक्षालेखन फारसे गांभीर्याने होते, असे दिसत नाही. रा. भा. पाटणकर, सुधीर रसाळ, रा. ग. जाधव, द. ग. गोडसे आदी हाताच्या बोटांवर मोजता येतील अशीच नावे चटकन सांगता येतील. या परंपरेमध्येच म. सु. पाटील यांचा समावेश करावा लागेल. भारतीय साहित्य क्षेत्रापासून ते पाश्चात्त्य साहित्य शाखांचा सखोल अभ्यास असलेल्या म. सु. पाटील यांचा कविता हा विशेष चिंतनाचा विषय. ज्ञानेश्वर, तुकारामांपासून ते आधुनिक काळातील कवींपर्यंत मराठी कवितेचा वेध घेताना त्यांनी मराठी कवितेचे वेगळेपण आणि नवेपण सांगितले. विशेषत: निर्मितीप्रक्रिया आणि कवितेचा रूपबंध या दोन्ही घटकांचे चिंतन त्यांनी वेळोवेळी केले आहे. विंदांच्या अमृतानुभवाच्या अर्वाचिनीकरणावरील त्यांचे भाष्य स्वत: विंदांना आवडले होते. अर्वाचिनीकरणातील बऱ्याच त्रुटी मसुंनी दाखवल्या होत्या. मर्ढेकरोत्तर काव्याचा आढावा घेताना केशवसुत, कुसुमाग्रज, सुर्वे, ढसाळ यांतील वेगळेपण त्यांनी दाखवून दिले. त्यांनी एकीकडे सदानंद रेगे यांच्यावर विस्ताराने लिहिले. शंकर रामाणी यांच्यासारखे कवी ५० वर्षे कविता लिहीत होते. तरी त्यांची दखल फारशी कोणीही घेत नसे, ती मसुंनी घेतली. अवांच्छित वास्तवाबद्दलचा उद्वेग मर्ढेकरांच्या परंपरेतील कवींनी ज्या धारदार शब्दांत प्रकट केला तसे पुढील कवींना क्वचितच जमले, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. मनमाडला प्राचार्य असताना त्यांनी लिहिण्याची ऊर्मी असलेल्यांना नियतकालिक चालवण्यासाठी चालना दिली. त्यांच्या प्रेरणेतूनच ‘अनुष्टुभ’ हे नियतकालिक सुरू झाले व अल्पावधीतच दर्जेदार नियतकालिक म्हणून ते गणले जाऊ लागले. येथे लिखाणाची सुरुवात करून अनेक लेखक व कवी पुढे नावारूपाला आले. कोणत्याही गटातटांत सामील न होता स्वतंत्रपणे साहित्याची सेवा करणारे फार थोडे लेखक आहेत. त्यात मसुंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मसुंनी कादंबरी, कविता, लघुकथा अशा साहित्याच्या विविध प्रकारांत मुशाफिरी केली असली तरी समीक्षक म्हणूनच त्यांची कामगिरी लक्षणीय आहे. ‘सर्जनप्रेरणा..’मधून कविमनाचे विशेष, त्यावरील विविध प्रभाव, प्रतिभा, संवेदनशीलता यांचा आदिबंधात्मक रूपवेध घेताना विख्यात पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अभिजात कवी, मानसशास्त्रज्ञ, तत्त्वचिंतक, सौंदर्यमीमांसक यांच्या विविध मत-मतांतरांचा मर्मज्ञ रसिकतेने यात आढावा घेतल्याने त्याला पुरस्कार मिळणे क्रमप्राप्त होते. मात्र पाच-सहा दशके सातत्याने लिखाण करणारे मतकरी वा म. सु. पाटील यांना इतक्या उशिरा हे पुरस्कार मिळणे समर्थनीय नाही. पुरस्कार निवड समितीने यापुढील काळात तरी यात सुधारणा करावी. म्हणजे लेखकाला पुरस्कार मिळाला तरी खंत व्यक्त करायची वेळ येणार नाही.