संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ७३व्या वार्षिक अधिवेशनात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर चढवलेला तिखट शाब्दिक हल्ला अपेक्षितच होता. दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या देशाबरोबर कोणतीही द्विपक्षीय चर्चा सुरू ठेवणे अशक्य असल्याचे स्वराज यांनी म्हटले आहे. शब्दच्छल व दुटप्पीपणाच्या बुरख्याआड पाकिस्तान नेहमीच आपली लबाडी लपवण्याचा प्रयत्न करतो हा स्वराज यांचा आक्षेपही पटण्याजोगा आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान यांची निवड झाल्यानंतर अनेक भारतीयांमध्ये भोळसट आशावाद निर्माण झाला होता. इम्रान यांचे अनेक भारतीय क्रिकेटपटूंशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण क्रिकेटपटू व राजकारणी इम्रान यांच्यातील फरक समजण्याचे भान त्या वेळी अनेकांना नव्हते. यात सरकारपक्षातलेही अनेक जण होते. परंतु मध्यंतरी काश्मीर खोऱ्यात चार पोलिसांचे अपहरण होऊन त्यांतील तिघांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली आणि इम्रान खान यांचा वैयक्तिक उल्लेख करत भारताने निषेध तर केलाच; पण स्वत:हून मांडलेला परराष्ट्रमंत्री स्तरावरील चर्चेचा प्रस्तावही तडकाफडकी मागे घेतला. आमसभेतील ज्या सत्रात भारत आणि पाकिस्तान यांचे परराष्ट्रमंत्री परस्परांशी चर्चा करणार होते, त्याच सत्रात अखेर एकमेकांच्या राष्ट्रांवर हे मंत्री आगपाखड करते झाले! चर्चा मागे घेण्याचे भारताकडून आलेले आणखी एक कारण म्हणजे काश्मिरात मारल्या गेलेल्या बुरहान वानी व अन्य दहशतवाद्यांच्या ‘स्मरणार्थ’ पाकिस्तानने टपाल तिकिटे प्रसृत करणे. आपल्या भाषणात स्वराज यांनी ९/११ आणि २६/११ या घटनांचा उल्लेख करून अमेरिका व आपण समदु:खी असल्याचे सूचित केले. पहिल्या घटनेच्या सूत्रधारास अमेरिकेने पाकिस्तानातच जाऊन संपवले. दुसऱ्या घटनेचा सूत्रधार (हाफीझ सईद) मात्र आजही पाकिस्तानात राजरोस फिरतो आणि राजकारण-समाजकारणही करतो हे स्वराज यांनी दाखवून दिले. सुषमा स्वराज यांनी अशा पद्धतीने पाकिस्तानवर कडवट शब्दांत टीका करणे नवीन नाही. गेल्या वर्षीही त्यांनी ‘भारतात आयआयटी, आयआयएम उभ्या राहतात आणि पाकिस्तानात दहशतवाद्यांचे तळ उभे राहतात’ या शब्दांत हल्लाबोल केला होता. प्रश्न इतकाच की, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे सत्र म्हणजे भारत-पाकिस्तान यांचा वार्षिक ‘चिखलफेक’ सोहळा ठरू लागला आहे का? तसे झाल्यास आमसभेत आज डोनाल्ड ट्रम्प यांना हसलेली मंडळी उद्या आपल्यालाही हसू लागतील! प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानसमोर चर्चेचा प्रस्ताव मांडल्यानंतर आपल्या देशात विशेषत: जम्मू-काश्मीरमध्ये एखादा किरकोळ किंवा मोठा दहशतवादी हल्ला होतोच. हा ‘पॅटर्न’ वर्षांनुवर्षे सुरू असूनही आपल्याला एखादा दहशतवादी हल्ला रोखता आलेला नाही हे कटू वास्तव आहे. हल्ला झाल्यानंतर आपण चवताळल्यासारखे होतो नि चर्चेचा मार्ग स्वत:हून बंद करतो. त्यातून पुन्हा पाकिस्तानला, ते चर्चेला कायमच तयार असतात असा कांगावाही करता येतो. सरकारे बदलूनही या घटनाक्रमात खंड पडलेला नाही. उलट विद्यमान सरकार सर्जिकल स्ट्राइक किंवा मर्यादित लक्ष्यभेद करून पाकिस्तानला कसा ‘कायमस्वरूपी धडा शिकवला’ याविषयी अजूनही टाळ्या पिटत आहे नि त्या घटनेचा वर्धापन दिनही साजरा करू लागले आहे! परराष्ट्र धोरण हे तात्कालिक, भावनिक वा प्रतिक्रियावादी असल्यास त्यातून मिळणारी फळेही अल्पकालीन असतात. सातत्य व परिपक्वपणा ही भारताच्या किमान पाकिस्तानविषयक धोरणाची लक्षणे नाहीत. त्याचे परिणाम आपण किती काळ भोगणार हे ठाऊक नाही. आमसभेसारख्या व्यासपीठांवर जोरदार भाषणे ठोकून तात्कालिक समाधान मिळत असले, तरी तो शाश्वत तोडगा खचितच नसतो.
त्रागा योग्यच, पण..
संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ७३व्या वार्षिक अधिवेशनात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर चढवलेला तिखट शाब्दिक हल्ला अपेक्षितच होता.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 01-10-2018 at 02:08 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma swaraj on pakistan