ऐन तारुण्यात, आयुष्यातील मौजमजा करण्याच्या दिवसांत त्याने एक  ध्यास घेतला तो होता पर्यावरण संवर्धनाचा. संगणकावर बसून माउसने क्लिक करून पर्यावरण संवर्धन होत नाही, त्यासाठी स्वत मैदानात उतरून काम करावे लागते असे त्याचे परखड मत आहे, अगदी नामांकित माहिती तंत्रज्ञान कंपन्यात काम करणारा तसा हा व्हाइट कॉलर तरुण पर्यावरण प्रेमाने झपाटून काम करतो तेव्हा त्याकडे जगही स्तिमित होऊन बघत राहते. त्याला नुकताच उपक्रमशीलतेचा रोलेक्स पुरस्कार जाहीर झाला आहे. या तरुणाचे नाव आहे अरुण कृष्णमूर्ती. चेन्नईतील किलकट्टलाय हे तळे प्रदूषणापासून वाचवण्यासाठी त्याने नऊशे शाळकरी मुलांच्या वानरसेनेला हाताशी धरून मोठे काम उभे केले आहे. नवी दिल्ली, हैदराबाद येथील तळीही स्वच्छ केली आहेत. मुलांची मदत घेण्याचे त्याने सांगितलेले कारणही जरा वेगळे आहे. त्याच्या मते मुले ही नेहमीच मदतीला तयार असतात, तुम्हाला नेहमी बौद्धिक आव्हाने देत असतात व  तुम्हाला अद्ययावत राहण्याची प्रेरणा देत असतात. त्यांच्यात उद्याचे आशास्थान आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आधीच जलस्रोत कमी असताना शहरातील तळी जर कचऱ्याने भरली जात असतील व त्यामुळे ओढे-नाले प्रदूषित होत असतील तर ते धोकादायक आहे हे ओळखून त्याने किलकट्टाय तळ्याचा प्रश्न हाती घेतला, त्यासाठीच त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. अरुण, मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून पदवीधर झाला. नंतर त्याने आयआयएमसी या संस्थेतून संज्ञापनाची पदवी घेतली, त्याने सागरी प्रदूषणावर ‘एलिक्झिर पॉइझन्ड’ व कासवांच्या दुरवस्थेवर ‘कूर्मा’ असे दोन माहितीपट तयार केले, त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. अरुणला यापूर्वी गुगल अ‍ॅलम्नी इंपॅक्ट पुरस्कार व इंटरनॅशनल यूथ फाउंडेशनचा यूथ अ‍ॅक्शन नेट फेलो हा पुरस्कार मिळाला आहे. या उमद्या तरुणाचे वैशिष्टय़ म्हणजे माहिती तंत्रज्ञान उद्योगात काम करूनही त्याच्याकडे पर्यावरण रक्षणाच्या कार्यासाठी द्यायला भरपूर वेळ आहे. त्याने तीन वर्षे गुगलमध्ये काम केले आहे. ही नोकरी सोडून त्याने ‘एनव्हायरन्मेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया’ ही संस्था स्थापन केली. भटक्या व निराधार प्राण्यांना आधार देणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.