इंद्रजित भालेराव

चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, व्याख्याते, संगीत चिकित्सक, अभ्यासक, लेखक अशा विविध रुपांत वावरणारे आणि त्याहीपलीकडे बरेच काही असणारे विनय हर्डीकर लवकरच वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करत आहेत…

loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
congress incredible performance in lok sabha election 2024
काँग्रेसची अविश्वसनीय कामगिरी!
bjp loses seat of ayodhya ram temple
‘खऱ्या हिंदूं’ची जबाबदारी..
patna high court
अग्रलेख : ‘आबादी…’ आबाद?
Loksatta editorial The Agnipath scheme introduced to divert expenditure on soldiers to material is controversial
अग्रलेख: ‘अग्निपथ’ची अग्निपरीक्षा!
loksatta editorial on israeli supreme court decisions says ultra orthodox jews must serve in military
अग्रलेख : बीबींचा ‘शहाबानो क्षण’!
loksatta editorial on intention of centre to levy gst on petrol diesel
अग्रलेख : अवघा अपंगत्वी आनंद!  
Loksatta editorial Horrific Murder In Vasai Boyfriend Stabs Girlfriend To Death With Iron Spanner
अग्रलेख: लक्षणाची लक्तरे..

विनय हर्डीकर हे नावाप्रमाणे मुळीच विनयी स्वभावाचे नाहीयेत. कारण विनय आला की शास्त्रकाट्याची कसोटी ढळण्याची शक्यता असते. आणि याचा काटा तर फारच काटेकोर आहे. हा माणूस कधी काय बोलून कुणाची कशी नशा उतरवेल ते सांगताच येत नाही. भल्याभल्यांना टपल्या मारताना मी या माणसाला पाहिलंय आणि हा माणूस कधीच भावनेच्या भरी जाणार नाही असं वाटत असताना कुणाकुणाला उत्कटतेने मिठी मारतानाही मी या माणसाला पाहिलंय. या माणसाने नावाचे सार्थक केले नसले तरी हा माणसाने आपल्या स्वभावगुणाने आडनाव मात्र सार्थ केलेले आहे. याच्या आडनावाप्रमाणेच हा समजायला मोठा हार्ड, कठीण आहे. याला समजून घेणे ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे. आणि म्हणूनच या माणसावर नेमकं लिहिणंदेखील अवघड आहे.

मध्यमवर्गीय म्हणून जन्माला आलेल्या या माणसाला कधीच मध्यमवर्गाच्या मर्यादेत राहता आलं नाही. अर्थात आयुष्यभर हा कुठेच, कधीच आणि कुणाच्याच मर्यादेत राहिलेला नाही. त्यामुळे त्याला एका ठिकाणी थांबताही आलेले नाही. मग तो प्रवास असो, विचार असो की जीवन असो, हा सतत बदलत गेलेला आहे. याची ओढ सतत नव्याकडे असते. नवनव्या गोष्टी जाणून घ्यायची, समजून घ्यायची, स्वत:त मुरवून घ्यायची आणि त्या गोष्टीची मर्यादा समजली की त्याच्याहीपुढे निघायची, त्याच्या पुढचं समजून घ्यायची या माणसाची तयारी असते. त्यामुळे हा माणूस एकच गोष्ट आयुष्यभर धरून बसलाय असे झालेले नाही. विविध माणसं, विविध संस्था आणि विविध चळवळी धरत, सोडत हा पुढे पुढे चालत राहिलेला माणूस आहे. या माणसाचं असं सतत जागा बदलत राहणं पाहून कुणाला वाटेल की, ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असंच या माणसाचं आहे. पण मी म्हणेल याउलट या माणसाचं आहे. हा जिथं होता तिथं भरजरी पितांबराचा पदर होऊन राहिला आणि चिंधी होण्याच्या आधी त्यानं दुसरा पितांबर विणायला सुरुवात केली, असंच म्हणावं लागेल. कुणाचं मिंधं होऊन आपली चिंधी होऊ न देणे यासाठीच तर या माणसाची ही सगळी धडपड होती.

कुठे आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून उदास, हताश होऊन हा घरी बसलेला नाही. याने काहीतरी नवीन शोधून काढलेलं आहे. आधीच्या पुढचं शोधून काढलेलं आहे. आणि त्याने आपला प्रवास सुरूच ठेवलेला आहे. म्हणूनच आज त्याचा अमृत महोत्सव सुरू होत असला तरी ‘अवघे पाऊणशे वयमान’ असंच म्हणावं, अशी या माणसाची स्थिती आहे. याला जशी विलक्षण वेगळेपणाची हाव आहे तशीच याला विक्रमाचीही हवा आहे. त्यामुळे हा कधी काय करेल ते सांगताच येत नाही.

हेही वाचा >>> शेतकरी हितात मोदींचे आणि देशाचे हित

यानिमित्ताने विनय हर्डीकर यांचा आयुष्यपट उलगडून पाहायला हरकत नाही. विनय लक्ष्मण हर्डीकर यांचा जन्म (२४ जून १९४९) कोल्हापूर येथे झालेला असून शालेय शिक्षण मुंबईत, महाविद्यालय शिक्षण पुण्यात आणि पुणे विद्यापीठातून त्यांनी एमए इंग्रजी केलेलं आहे. इंग्रजीतून पीएचडी करण्यासाठी पुणे विद्यापीठातच डॉ. सं. नागराजन या विख्यात विद्वानाकडं नावनोंदणी केली. ‘राजकीय बांधिलकी आणि साहित्य’ असा विलक्षण वेगळा विषय घेतला. त्या विषयाचा अभ्यास, व्यासंग भरपूर केला. त्यावर जगभर व्याख्यानं दिली. पण पदवी पूर्ण केलीच नाही. डोक्यात एकदा सणक बसली की, ती गोष्ट तिथेच सोडून निघून जायचं, हा या माणसाचा स्वभावच आहे. त्यामुळे अनेक पीएचड्यांचं ज्ञान मिळवूनही पीएचडीची पदवी काही या माणसानं मिळवली नाही.

मुळातच चळवळ्या स्वभाव असलेल्या या माणसानं विद्यार्थी असल्यापासूनच चळवळीत काम करायला सुरुवात केली. ज्ञानप्रबोधिनी, ग्रामायण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संपूर्ण क्रांती आंदोलन, जनता पक्ष, शेतकरी संघटना, इंडियन सेक्युलर सोसायटी अशा संस्था आणि संघटनांतून काम करत हा माणूस सतत उपक्रमशील राहिला. स्वत: वैयक्तिक पातळीवरही लहान प्रमाणात का होईना काही सामाजिक आणि वैचारिक उपक्रम करत राहिला. महाभारत विचारमंथन, चिकित्सा, स्वच्छ-समर्थ-समृद्ध भारत, भारत-इंडिया फोरम, सिटिजन पीएमआरडीए, सर्वांसाठी शेक्सपियर, बहुजन सुखाय संस्कृत असे काही वैयक्तिक उपक्रमही या माणसाने आयुष्यात राबवले आहेत.

काही विक्रमाच्या नोंदीही या माणसाच्या नावावर जमा आहेत. सहा लाख किलोमीटर मोटारसायकल चालवली आहे, २५० ट्रेक केले आहेत, ७० किल्ल्यांचा अभ्यास करून ते किल्ले पाहिलेले आहेत. एकीकडे हे सगळं करत असताना शास्त्रीय संगीताचाही या माणसाचा व्यासंग विलक्षण आहे. शास्त्रीय संगीत ऐकणे, स्वत: गाणे आणि रसग्रहण करणे या तीनही पातळ्यांवर हा माणूस शास्त्रीय संगीताला ज्या पद्धतीने भिडतो त्यामुळे वाटत राहतं की, एका बाजूला शेतकरी संघटनेच्या कामासाठी रानावनातून वणवण फिरणारा हा माणूस इकडं शास्त्रीय संगीतातही तेवढाच प्रवीण आहे, हे विलक्षण नाही काय?

५० वर्षापासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशभर या माणसानं ५०० च्या वर व्याख्यानं दिलेली आहेत. हा मराठीत बोलतो, हिंदीत बोलतो आणि इंग्रजीतही बोलतो. या माणसाला सहा भाषा उत्तम प्रकारे येतात. तीन भाषा कामचलाऊ पद्धतीने तो बोलू शकतो. या माणसाने सतत लोकशाही निर्धार्मिकता, बुद्धिवाद, आशावाद, असत्य न वापरता लोकसंपर्कात राहणं आणि प्रत्यक्ष आर्थिक आशय असलेलं परिवर्तन अपेक्षणं या गोष्टींचा आग्रह धरलेला आहे. हा माणूस भाषणासाठी प्रत्येक वेळी नवा विषय घेतो. कधी जुना विषय घेतला तर तो त्या विषयाची नव्याने मांडणी करतो. एकच विषय घेऊन हा व्याख्यान करत फिरलाय, असं कधी झालेलं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचंड विद्वत्तापूर्ण भाषण करूनही समोरच्या लोकांच्या फिरक्या घेत त्यांना हसवत ठेवणं हे या माणसाच्या वक्तृत्वाचं वैशिष्ट्य आहे. हा खूप उंचीच्या बौद्धिकातून लोकांच्या मेंदूला झिणझिण्या आणत गुदगुल्याही करतो. त्यामुळे याचं भाषण कधीच कंटाळवाणं होत नाही.

१९७८ साली प्रकाशित झालेल्या ‘जनांचा प्रवाहो चालिला’ या पहिल्याच पुस्तकामुळे या माणसाला विलक्षण लोकप्रियता मिळाली. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर त्या आंदोलनात सहभागी होऊन तुरुंगवास भोगलेला असल्यामुळे त्या अनुभवावर लिहिलेलं हे पुस्तक शासनाच्या पुरस्काराच्या यादीत आलं आणि नंतर तो पुरस्कार रद्द झाला. त्यामुळे हे पुस्तक जास्तच गाजलं. तिथून विनय हर्डीकर हे नाव महाराष्ट्राला माहीत झालं. तेव्हा त्यांचं वय होतं अवघं २९ वर्षे. पण त्यानंतर त्यांनी असं ललित स्वरूपाचं लेखन फारसं केलं नाही. मर्ढेकरांची कविता हा या माणसाचा जिव्हार आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच मर्ढेकरांचा ध्यास घेतलेल्या या माणसाने वयाच्या २८ व्या वर्षी ‘मर्ढेकरांच्या शोधात’ हा लेख लिहून वाङ्मयविश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. त्यानंतर २० वर्षांनी ‘कारुण्योपनिषद्’ नावाचा स्वतंत्र ग्रंथ लिहून मर्ढेकरांची उंची मराठी माणसाच्या लक्षात आणून दिली. इथेच हर्डीकरांची समीक्षाही थांबली.

पण हर्डीकरांचं पुढचं लेखन हे प्रामुख्याने व्यक्तिचित्रणात्मक आहे. त्यांच्या व्यक्तिचित्रणाचे तीन अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. ‘श्रद्धांजली’, ‘देवाचे लाडके’, ‘व्यक्ती आणि व्याप्ती’ ही ती तीन पुस्तकं आहेत. या ग्रंथांच्या नावावरूनच लक्षात येतं की हर्डीकरांनी शक्यतो या व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतरच ही व्यक्तिचित्रं लिहिलेली आहेत. कुणाच्या गौरवासाठी हे लेख लिहिलेले नसून शक्यतो त्या त्या व्यक्तीची चिकित्सा करणं हाच या लेखनाचा उद्देश राहिलेला आहे. ज्या ज्या क्षेत्रात, ज्या ज्या चळवळींमध्ये, ज्या दिग्गजांसोबत काम केलं त्या त्या व्यक्तींचं या ग्रंथातून हर्डीकरांनी दस्तऐवजीकरण करून ठेवलं आहे. हर्डीकरांची व्यक्तिचित्रं ही मराठीतील विलक्षण वेगळी व्यक्तिचित्रं आहेत. त्यांच्या व्यक्तिचित्रांना नेहमीच व्यक्तिविमर्श असं म्हटलं गेलं. हर्डीकरांची व्यक्तिचित्रं तीसचाळीस पानांच्या पुढेच असतात. त्या माणसाचा समग्र शोध घेण्याचा प्रयत्न हर्डीकरांनी त्या लेखातून केलेला असतो. त्या माणसाविषयीचं एक समग्र आकलन ते आपल्यासमोर ठेवतात आणि त्यातून तो माणूस आपणाला लख्ख कळाला असं वाटतं.

त्यांनी विमर्श घेतलेल्या लोकांची यादी आपण पाहिली तरी महाराष्ट्र आणि देशपातळीवरील बहुतेक महत्त्वाची माणसं त्यांच्या या व्यक्तिमर्शामध्ये येऊन गेलेली आहेत. जयवंत दळवी, विद्याधर पुंडलिक, नरहर कुरुंदकर, स. शि. भावे, व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, श्री. पु. भागवत, डॉ. सं. नागराजन, यू. आर. अनंतमूर्ती, दुर्गा भागवत, वसंत बापट, गोविंद तळवलकर, श्री. ग. माजगावकर, म. द. हातकणंगलेकर यांच्यासारखी वाङ्मयविश्वातली माणसं त्यात येतात. अ. भि. शाह, हमीद दलवाई, शरद जोशी, वि. म. दांडेकर, स्वामी अग्निवेश, श्री. अ. दाभोलकर, ग. प्र. प्रधान, यदुनाथ थत्ते, बाबा आमटे, आप्पा पेंडसे, मधुकर देवल, पी. डी. देशपांडे, शंकर नियोगी गुहा, शंकरराव वाघ यांच्यासारखी चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते मंडळी या व्यक्तिमर्शामध्ये येतात. कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर, सत्यजित राय, गंगुबाई हंगल यांच्यासारखी कलाक्षेत्रातील मंडळी इथे येतात. मावशी, भाची आणि शिक्षक अशी केवळ तीनच वैयक्तिक नात्यातली माणसं इथं आलेली दिसतात.

‘विठोबाची अंगी’ आणि ‘जन ठाई ठाई तुंबला’ ही दोन समालोचनात्मक पुस्तकेही विनय हर्डीकर यांच्या नावावर जमा आहेत. हर्डीकर ज्या काळात जगत होते त्या त्या काळाचा तेव्हा त्यांनी विविध नियतकालिकातून घेतलेला आढावा आपणाला इथे वाचायला मिळतो. आपल्या भोवतालाचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, वाङ्मयीन धांडोळा घेत राहणं, ज्यातून त्या त्या क्षेत्रातल्या लोकांना मार्गदर्शन होईल असे निष्कर्ष मांडून दाखवणं, हे काम हर्डीकर यांनी या लेखांमधून केलं आहे. असं लेखन ते अधून मधून करत आले आहेत. त्याची आतापर्यंत केवळ दोनच संकलनं प्रकाशित झालेली आहेत.

या माणसानं आयुष्यात कधी स्थिरस्थावर होण्याचा विचार केला की नाही, असा प्रश्न पडतो. कारण हा माणूस कधीच कुठल्या मोहात, लोभात पडलेला नाही. त्यामुळे याने ना घर बांधले, ना संपत्ती जमा केली. पोटापाण्यासाठी थोडीफार कामं या माणसानं केली. ज्ञान प्रबोधिनी, पुणे विद्यापीठ, रानडे इन्स्टिट्यूट इथं काही दिवस अध्यापकाचं कामही या माणसानं केलं. इंडियन एक्स्प्रेसमधून पत्रकारितादेखील केली. न्यू क्वेस्टसारख्या इंग्रजी नियतकालिकाचं संपादनही काही काळ केलं. विविध कामं करत आणि सोडत हा माणूस पुढं चालत राहिला.

हर्डीकरांचं पहिलं पुस्तकच नव्हे तर त्यांनी वेळोवेळी लिहिलेले अनेक लेखही बरेच वादग्रस्त ठरले. त्यावर खूप चर्चाही झाल्या. त्यातलाच एक खूप चर्चिला गेलेला लेख म्हणजे ‘सुमारांची सद्दी’. समाजातल्या सुमार लोकांनी संधी शोधत समाजाचं केलेलं नुकसान हे हर्डीकरांना यातून अधोरेखित करायचं होतं. त्यामुळे अनेकांच्या वर्मी हा लेख लागलेला होता. म्हणूनच त्याची तेव्हा पुष्कळ चर्चाही झालेली होती. ‘सुमारांची सद्दी’ हा लोकांच्या मनावर ठसलेला शब्द हर्डीकरांनाच सुचलेला आहे. स्वत: हर्डीकर मात्र कधीही सुमारांच्या सद्दीत सहभागी झाले नाहीत. त्यामुळे राजकारण्यांच्या एवढ्या जवळ राहूनही आणि विविध पक्षांमध्ये काम करूनही ते कधीही सक्रिय राजकारणात उतरले नाहीत. त्याविषयी त्यांना कधी खंतही वाटली नाही. कारण सक्रिय राजकारणात उतरून सुमारांच्या सद्दीत सहभागी होणं हर्डीकरांच्या प्रकृतीत नव्हतं. किंबहुना त्या विषयाच्या तिरस्कारातूनच त्यांना हा शब्द सुचलेला होता. त्यामुळे हा माणूस सुमारांच्या सद्दीत सहभागी होणं कधीच शक्य नव्हतं.

inbhalerao@gmail.com