अरुण देव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, तसेच जनसंघ आणि भाजपच्या स्थापनेपासून त्यांच्यासाठी काम करणारे मुंबई भाजपचे पहिले सरचिटणीस, आमदार मधु देवळेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सुहृद सहकाऱ्याने त्यांना वाहिलेली श्रद्धांजली

मधु देवळेकर हे उच्चशिक्षित मध्यमवर्गीय असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि पांढरपेशा वर्गाला ते आपलेसे वाटत असत. देवळेकरांचा माझा परिचय कधी झाला ते नेमके आठवत नाही. पण हे वर्ष १९७८ किंवा १९८० दरम्यान असावे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. त्या वेळच्या पश्चिम क्षेत्राचा मी महामंत्री होतो आणि देवळेकर यांच्या निवडणुकीची पूर्ण जबाबदारी माझ्यावर देण्यात आली होती. त्यामुळे आमचा संपर्क वाढला, एकमेकांच्या घरी जाणे वाढले. त्यांनी पक्षाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांना या निवडणुकीचे मतदान कसे करावे याचे प्रभावी मार्गदर्शन केले. देवळेकर ही निवडणूक सहज जिंकले आणि पुढील एक तप या मतदारसंघाचे आमदार राहिले. पक्षही वाढला. नंतर असे लक्षात आले की देवळेकर यांना कॉर्पोरेट पार्श्वभूमी आहे. ते ‘सीमेन्स’मध्ये जनसंपर्क विभाग बघत असत. असे खासगी क्षेत्रातील लोक त्या काळात राजकीय क्षेत्रात फार थोडे होते.

हेही वाचा >>> मराठी लघुपटांच्या वाढत्या दर्जाला राज्य शासनाचीही दाद हवी!

आमदार असल्यामुळे दर आठवड्याला देवळेकर पक्षाच्या खार कार्यालयात बसत, लोकांचे प्रश्न सोडवत. अर्थात ते कधीच ‘मास लीडर’ झाले नाहीत आणि तो त्यांचा पिंडही नव्हता. आमचा सहवास स्नेहात कधी रूपांतरित झाला ते जाणवलेच नाही. देवळेकर कुटुंब मूळचे पोलादपूरजवळच्या देवळे गावचे. त्यांचे वडील यशवंतराव बडोदे संस्थानात नोकरीस होते. देवळेकर चार वर्षांचे असताना त्यांचे वडील निधन पावले. नंतर हे कुटुंब विसनगर येथे स्थायिक झाले. तेथे नानूभाई भोसले यांनी देवळेकर यांच्यावर संघाचे संस्कार केले. हा बंध आयुष्यभर टिकला. पुढे कौटुंबिक कारणामुळे हा परिवार खार येथे स्थिरावला आणि देवळेकर यांचे कर्तृत्व बहरू लागले.

हेही वाचा >>> शेतकरी हितात मोदींचे आणि देशाचे हित

संघाच्या सामान्य स्वयंसेवकापासून ते आमदार होईपर्यंतचा त्यांचा प्रवास कोणतीही राजकीय पुण्याई नसताना घडणे हे माझ्या दृष्टीने फार विशेष आहे. संघ, विद्यार्थी परिषद यांची अनेक पुस्तके त्यांनी अनुवादित केलीच, पण स्वतंत्र लिखाणही बरेच केले. काही राजकीय मतभेद झाल्याने ते भाजपपासून अल्पकाळ दुरावले, पण लवकरच स्वगृही परतले. अगदी २०२२ पर्यंत ते नियमित लेख लिहीत, सर्वांना पाठवत. देवळेकरांमुळे माझा अनेक मोठ्या लोकांशी संबंध आला. नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरू इनामदार वकील (साहेब) तर म्हणत की त्या दोघांचा परिचय देवळेकर यांच्यामुळेच झाला. तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले याचा सिमेंट घोटाळा देवळेकर यांनीच प्रथम विधिमंडळात मांडला आणि ते देशभर ज्ञात झाले. रामदास नायक यांच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी अनेक उपक्रम यशस्वी केले. विशेषत: कार्यकर्त्याला सगळ्या गोष्टीचे ज्ञान झाले पाहिजे यासाठी अभ्यास वर्ग हवेत ही कल्पना प्रथम देवळेकर यांनी प्रत्यक्षात आणली.

राष्ट्रीयत्व, हिंदुत्व आणि भारतीय जनता पक्ष या विचारावर त्यांची इतकी श्रद्धा होती की बाळासाहेब ठाकरेंशी वैयक्तिक संबंध असूनही त्यांनी या जवळिकीचा फायदा करून घेतला नाही. त्यांना स्वत:ला विधान परिषदेत संधी असूनही ते पक्षासाठी विधानसभा निवडणूक लढले होते, हरलेही होते. अनेक वर्षांनी ते सक्रिय राजकारणातून थोडे बाहेर पडले तेव्हाही ते हेच विचार लिहीत असायचे. भाजपचे प्रमुख नेते मुरली मनोहर जोशी यांच्याशी माझा त्यांच्यामुळेच परिचय झाला. त्यांचा दोघांचा जवळचा संबंध होता. ज्योतिष हा दोघांचा लाडका विषय होता, दोघांचा त्या विषयाचा अभ्यास होता.

गेली दोन वर्षे देवळेकर वयोमानामुळे बहुधा घरातच असत. ते नेहमी असे म्हणत की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुत्वासाठी जेवढा प्रयत्न करत आहेत तेवढे काम आपण तळच्या स्तरावर करत नाही, कारण आता पक्ष, आपण सगळे जास्तीत जास्त समाजमाध्यमांमध्ये आहोत. तंत्रज्ञानाचा उपयोग करताना वैयक्तिक संपर्क तुटला आहे. सामान्य लोकांशी संपर्क करताना याचा उचित उपयोग केला तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीचे निकाल लागले ते आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बदलू शकतो, हिंदुत्वाचे आणि हिंदू विचाराचे सरकार आणू शकतो, हा दृढ विश्वास त्यांना होता. त्यांच्या निधनाने पक्षाचे नुकसान झाले आहेच, पण येती निवडणूक जिंकून त्यांना सक्रिय श्रद्धांजली अर्पण करायची संधीही पक्षासमोर आहे. देवळाच्या पायातील शिलांना पक्ष विसरला नाही, हे त्यातून दाखवता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखक मुंबईचे माजी उपमहापौर आहेत.