श्वेता आनंद देशमुख shwetadetq@gmail.com

हिंदू-मुस्लीम समुदायांतील संबंध नेहमीच ताणलेले होते का? ‘जिहाद’ या संकल्पनेचा खरा अर्थ काय? इस्लाममधील मूलतत्त्ववाद अधिक ताठर, उग्र का होत गेला? अशा काही प्रश्नांचा वेध घेताना, हे पुस्तक भारतात ब्रिटिशांचे आगमन होण्यापासून १९४७ च्या फाळणीपर्यंतच्या कालखंडाची सैर घडवून आणते.. आणि आज जे चित्र दिसते आहे ते तेव्हा नव्हते, हे बारीकसारीक तपशिलांसह नेमकेपणाने मांडते..

तारिक हसन यांचे ‘कलोनिअ‍ॅलिझम अ‍ॅण्ड द कॉल टु जिहाद इन ब्रिटिश इंडिया’ हे पुस्तक म्हणजे १९ व्या शतकातल्या वसाहतवादी कालखंडातील भारतात ब्रिटिश आणि मुस्लीम उलेमा यांच्यातील संघर्षांची नोंद घेत ‘जिहाद’ या संकल्पनेचा उगम कसा झाला, याचा इतिहासपट आहे. लेखकाने वासाहतिक कालखंडातील निवडक घटनांच्या निरूपणाबरोबरीने त्यांचे राजकीय अंगाने विश्लेषणही केले आहे. आजचे वास्तव समजून घेण्यासाठी आणि भविष्यकालीन दृष्टांत वास्तवाला धरून असावेत यासाठी इतिहास विसरून चालणार नाही. इतिहासाचे अधिष्ठान सोडून दिले तर भविष्यकालीन उन्नत जगाची संकल्पना फोल ठरेल, अशी लेखकाची भूमिका आहे. हिंदू-मुस्लीम समुदायांमधील तणावपूर्ण संबंध ही बाब आता जणू आपल्या अंगवळणी पडल्यासारखी आहे. मात्र, वासाहतिक कालखंडामध्ये चित्र वेगळे होते. तोच इतिहास हा या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. १९ व्या शतकामध्ये मुस्लीम उलेमांचा ब्रिटिश राज्यकर्त्यांविरुद्ध देशाच्या अनेक भागांमध्ये निकराचा लढा आणि ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या या राष्ट्रवादी लढय़ामध्ये त्यांचे योगदान नोंद घेण्याइतके आहे, हे ऐतिहासिक दाखले देऊन सांगणे हा या पुस्तकाचा प्रपंच!

वासाहतिक कालखंडामध्ये एका बाजूस मुस्लीम समुदायाच्या ‘राष्ट्रवादी प्रेरणा’ सिद्ध करणाऱ्या अनेक ऐतिहासिक घटना आहेत, तर दुसऱ्या बाजूस हिंदू-मुस्लीम दुहीची बीजेदेखील याच वासाहतिक राजवटीने पेरली. याला सर्वस्वी जबाबदार आहे ते स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील भारताविषयीचे साम्राज्यवादी मुशीतील इतिहासलेखन. ब्रिटिशांनी आपले साम्राज्यवादी हित जपण्यासाठी केलेले इतिहासलेखन साहजिकच समाजातील संभाव्य दुही अधोरेखित करून विभाजनाला खतपाणी घालणारे होते. दुर्दैवाची बाब अशी की, ब्रिटिश येथून गेले तरी १९४७ ते २००० या टप्प्यातील इतिहास पुनर्लेखनाचे अपवादात्मक प्रयत्न वगळता, त्यांच्या इतिहासलेखनाची छाप भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर आजही आहे. आपल्याकडील इतिहासतज्ज्ञ आणि बुद्धिवादी वर्ग यांनी त्या प्रभावाखाली लेखन आणि चिंतन केल्याची जबाबदारी घ्यावी, असे लेखक ठामपणे सांगतो. विशेषत: पाठय़पुस्तकांतील इतिहासलेखन राष्ट्राविषयीचे आकलन आकाराला आणते ते कसे, हे सांगणे या पुस्तकाचे सूत्र आहे.

सहा प्रकरणांत विभागलेल्या या पुस्तकाची प्रस्तावनादेखील तितकीच व्यापक आहे. शीर्षकावरून पुस्तकाची व्याप्ती भारताच्या  वासाहतिक कालखंडापर्यंत मर्यादित आहे असे वाटले, तरी लेखकाने आजपर्यंतचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आणि त्यातील मुस्लिमांचे स्थान, भूमिका अशा विविध पैलूंवर धावती चर्चा केली आहे.

उलेमांचे योगदान आणि ‘जिहाद’

‘जिहाद’ या घटिताचा आज लागणारा अर्थ केवळ आणि केवळ नकारार्थी आहे. ‘जिहाद’चा अर्थ आहे- स्वसंरक्षणासाठी केलेले युद्ध! आज आपण त्याचे जे स्वरूप पाहात आहोत, ते या अर्थाच्या पूर्णत: विरुद्ध आहे. स्वत:च्या जिवाची कोणतीही पर्वा न करता धर्मासाठी बलिदान देणे (याला कुराणाचा आधार नाही) आणि अपुऱ्या आकलनापायी आणि कल्पित शत्रूच्या भीतीपोटी, असुरक्षिततेच्या भावनेपोटी त्याला संपवून टाकण्याची अधीरता, असे काहीसे या संकल्पनेचे आजचे स्वरूप दिसते. लेखकाच्या मते, याला दोन घटक कारणीभूत आहेत : एक म्हणजे, इस्लाममधील मूलतत्त्ववादी धागा आणि दुसरा म्हणजे, मुस्लीम आणि पाश्चात्त्यांचे संबंध. हे दोनही घटक ‘जिहाद’चा मूळ उद्देश मातीत मिसळण्यास कारणीभूत आहेत. त्यात भर घातली आहे ती पाश्चात्त्य अभ्यासकांनी आणि त्यांच्या वरवरच्या आकलनाने.

हे सर्व पूर्वग्रह पूर्वपदाला आणण्यासाठी लेखकाने सहा प्रकरणांमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या उलेमांचा इतिहास बारीकसारीक तपशिलांसह सांगितला आहे. या इतिहासाचे तीन टप्पे दिसतात. सन १८५७ पूर्वीचा इतिहास, १८५७ चा उठाव आणि पुढे भारताची फाळणी. मुघल कालखंडामध्ये धार्मिक कार्य सांभाळणारे हे उलेमा वासाहतिक राजवटीविरुद्ध लढवय्ये म्हणून पुढे आले. त्यांच्याबरोबरीने १९ व्या शतकापासून अस्तित्वात असणाऱ्या ‘वहाबी’ आणि त्यातून निर्माण झालेल्या ‘फरेझी’ आणि ‘तितुमीर’ या चळवळी आणि ‘देवबंद’ या प्रमुख चळवळीचे अनेक पैलू उलगडतात. त्यामध्ये १८५७ पूर्वी ब्रिटिश राजवटीविरुद्ध जिहाद पुकारणारे सय्यद अहमद बरेलवी, लखनौच्या लढय़ातील (१८५७ चा उठाव) फैझाबादचे मौलवी अहमदुल्ला शाह ऊर्फ डंका शाह यांचे योगदान वर्णन केले आहे. त्यापुढील प्रकरणामध्ये देवबंद चळवळ आणि खिलाफत चळवळ यांची परस्परपूरकता, देवबंद चळवळीचा भारतातील राष्ट्रवादी चळवळीला पाठिंबा आणि उलेमा मौलाना बरकतुल्ला खान यांचा लढा हे कथानक आहे. त्यानंतर सिल्क कटाची माहिती मिळते. हा कट म्हणजे भारतातील ब्रिटिश राजवट उखडून टाकण्यासाठी राजा महेंद्र प्रताप या क्रांतिकारकाने अफगाणिस्तानच्या राजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न. यात राजा महेंद्र प्रताप यांना जर्मनीचा राजा कैसर विल्यम आणि तुर्कस्थानच्या सुलतानाने मदत केली होती. हे सारे घडले ते पहिले महायुद्ध सुरू होण्याच्या अगदी काही वर्षे आधी! यातून अफगाणिस्तान, अरेबिया आणि भारत यांच्यातील आठव्या शतकापासून असणारे संबंध, मुस्लीम उलेमांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान आणि मक्केच्या शेरीफने केलेला त्यांचा छळ याचा इतिहास समजतो. ब्रिटिश अभ्यासकांच्या मते, ही घटना तुलनेने महत्त्वपूर्ण नाही. मात्र, यातून इस्लाममधील सुधारणावादी चळवळ आणि विलगतावादी चळवळ यांच्यातील संबंध लक्षात येतात.

फाळणीनंतरचा अपेक्षाभंग

यानंतरचा शेवटचा टप्पा येतो तो म्हणजे भारताची फाळणी आणि मुस्लीम उलेमांचे योगदान. फाळणीपूर्वी भारतीय मुस्लीम राष्ट्रीय काँग्रेस आणि सरदार पटेल यांच्या धोरणामुळे नाराज होते. तरीदेखील, फाळणी निश्चित झाल्यावर मौलाना मदानी व त्यांच्या समविचारी उलेमांनी फाळणीला केलेला विरोध आणि भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तानात जाऊ नये यासाठी त्यांची मनधरणी याबाबतचे तपशील दिले आहेत. लेफ्टनंट कर्नल इलाही बक्ष यांच्या ‘विथ द कायदे-आझम डय़ुिरग हिज लास्ट डेज्’ या पुस्तकामध्ये म्हटल्याप्रमाणे, नवीन पाकिस्तानची निर्मिती झाली खरी, मात्र त्याची उभारणी जीनांच्या परिकल्पनेप्रमाणे होत नव्हती हे त्यांना अखेपर्यंत सलत राहिले. एकूण काय, तर फाळणी जशी मुस्लिमांसाठी सुखावह नव्हती, तसे पाकिस्तान हे त्यांचे नवे राष्ट्रदेखील त्यांच्या हिताचे ठरत नव्हते. इकडे भारतामध्ये महात्मा गांधींच्या खुनाने केवळ हिंदू नाही, तर मुस्लिमांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते पंडित नेहरूंच्या धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) राजकारणाकडे डोळे लावून बसले. इथपर्यंत येऊन लेखक आपले निरूपण थांबवतो.

परखड, पारदर्शक आणि समतोल

लेखकाच्या मते, भारतीय मुस्लीम समुदायाच्या स्थितीला येथील हिंदुत्ववादी पक्ष आणि राजकारण जसे जबाबदार आहेत, तसेच स्वत:स ‘सेक्युलर’ म्हणविणारे पक्षदेखील त्यांच्या लोकानुरंजनवादी कार्यक्रमामुळे जबाबदार आहेत. याशिवाय इस्लाममधील मूलतत्त्ववाद कोणत्याही प्रकारे समर्थनीय व उपयोगाचा नाही, हे लेखक ठामपणे मांडतो. मुस्लीम समाजाच्या परिस्थितीला देशांतर्गत राजकारण जितके जबाबदार आहे, तितकेच स्वत: मुस्लीमदेखील आहेत, याची प्रांजळ कबुलीही लेखक देतो. असा संतुलित अभ्यास आणि विचार वाचकाला प्रश्नांचे गांभीर्य समजून घेण्यास भाग पाडतो.

मुस्लीम आणि आजचा भारत

बाबरी मशिदीच्या उद्ध्वस्तीकरणानंतर गढूळ झालेले देशातील वातावरण, सन २००२ च्या गुजरात दंगली आणि अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यानंतर ‘मुस्लीम म्हणजेच दहशतवाद’ हे समीकरण गृहीतच धरले जात आहे. ही परिस्थिती गंभीर असल्याची धोक्याची सूचना देत, यासाठी भारतीय राजकारणी, पक्ष आणि एकूण राजकीय व्यवस्थेने यावर आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे लेखक अधोरेखित करतो. असे न झाल्यास आणि भारतीय मुस्लिमांच्या इतिहासाचा विसर पडल्यास या समुदायाचे रूपांतर ‘उपऱ्या टोळ्यां’मध्ये होण्यास वेळ लागणार नाही, हे सूतोवाच लेखक करतो.

इस्लाम आणि पश्चिमेकडील देश यांचा विचार करता इस्लाम, ख्रिस्ती आणि यहुदी या धर्मामध्ये अब्राहमचे अनुयायी, एकेश्वरवादी तत्त्वज्ञान आणि परस्परांतील युद्धे हा समान धागा आहे. तरीदेखील, आपापल्या धर्माविषयी असणारा दंभ आणि प्रदेश जिंकण्याची स्पर्धा यामुळे हे धर्म युद्धखोर ठरले आहेत. आजच्या मुस्लिमांनी एकीकडे अमेरिकेचे नववसाहतवादी धोरण, केवळ आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी मध्यपूर्वेतील हस्तक्षेप, अमेरिका-सोव्हिएत रशिया यांच्यातील वैमनस्यातून तालिबानला मिळालेले खतपाणी, तर दुसरीकडे ‘इस्लाम धोक्यात आहे’ असे सांगणारा मूलतत्त्ववाद अधिकाधिक ताठर आणि उग्र होत आहे, हे लक्षात घ्यावे असे लेखकाचे सांगणे आहे.

पुस्तक का वाचायचे?

इतिहासाचा मोठा टप्पा, त्याचे रंजक आणि सुटसुटीत कथन, ओघवते व नेमके लेखन आणि त्या जोडीला समर्पक विश्लेषण या प्रस्तुत पुस्तकाच्या जमेच्या बाजू नक्कीच आहेत. मात्र, पुस्तकाची प्रस्तावना आणि शेवटी ‘तात्पर्य’ म्हणून मांडलेले चिंतन हा आणखी एका पुस्तकाचा ऐवज आहे हे लक्षात घेतले पाहिजे. हे सर्व एकाच पुस्तकाचा भाग झाल्याने वाचकांसाठी ते वाचणे काहीसे आव्हानात्मक होऊ शकते. इतिहास सांगतानादेखील अवतरणांचा वापर हा काहीसा अतिरिक्त वाटतो. सध्या करोना विषाणूने पसरवलेल्या महामारीच्या संकटकाळी तबलिगी जमातकडून झालेले निष्काळजी वर्तन तटस्थपणे पाहण्यासाठी हे पुस्तक नक्कीच हाती असावे असे आहे.

लेखिका राज्यशास्त्राचे अध्यापन करतात.

‘कलोनिअ‍ॅलिझम अ‍ॅण्ड द कॉल टु जिहाद इन ब्रिटिश इंडिया’

लेखक : तारिक हसन

प्रकाशक : सेज

पृष्ठे : २१४, किंमत : ७२५ रुपये