‘बुकबातमी’ हे सदर कधीमधी प्रकटणारं. तेही नव्या पुस्तकाबद्दल किंवा लेखकाबद्दल काही सांगण्यासारखं असेल तरच. आजची ‘बुकबातमी’ ही तर नव्या वर्षांतल्या ‘बुकमार्क’मधली पहिलीवहिली! परंतु ती कुठल्या नव्या पुस्तक वा लेखकाबद्दल नाही किंवा कुठल्या ग्रंथाशी निगडित वादाबद्दलही नाहीय. बातमी आहे ती महात्मा गांधींच्या ग्रंथसंग्रहाविषयीची. हे वाचून ‘गांधींचा ग्रंथसंग्रह?’ असा कुतूहलमिश्रित प्रश्न सुरुवातीलाच काहींना पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण म. गांधींना समकालीन असणाऱ्या बऱ्याच महानुभावांच्या वाचनमहत्तेचे दाखले विविध संदर्भात वेळोवेळी दिले जात असले, तरी गांधींच्या वाचन-प्रयोगांबद्दलची अनभिज्ञता सर्वदूर आहे. त्यामुळे गांधीजींचा ग्रंथसंग्रह, त्यातली पुस्तकं, त्यांचे वाचन याबद्दल जनसामान्यांना माहिती असण्याची शक्यता तशी कमीच उरते.

मात्र ‘वाचक गांधीं’बद्दलचे अनेकांचे कुतूहल शमवणारी बातमी तीन दिवसांपूर्वी गुजरातेतील अहमदाबादहून आली आहे. अहमदाबाद महानगरपालिकेच्या एम. जे. ग्रंथालयाकडे असलेल्या गांधींच्या ग्रंथसंग्रहातील तब्बल १५८४ पुस्तकांचे डिजिटायजेशन पूर्ण झाले असून ती आता ऑनलाइन मोफत वाचण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

दोन वर्षांपूर्वी साबरमती आश्रम जतन व स्मारक संस्था आणि अहमदाबाद महानगरपालिका यांच्यात गांधींच्या ग्रंथसंग्रहाच्या डिजिटायझेशन करण्यासाठी करार झाला होता. त्यानुसार महापालिकेच्या एम. जे. ग्रंथालयाकडील गांधींच्या संग्रहातील पुस्तकांचा डिजिटायझेशन प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे सात हजारांवर पुस्तकांचा गांधींचा ग्रंथसंग्रह एम. जे. ग्रंथालयाकडे असून त्यातील १५८४ डिजिटाइज्ड पुस्तकं आता सर्वासाठी विनामूल्य उपलब्ध झाली आहेत.

दांडी यात्रेनंतर ब्रिटिश सरकारकडून सत्याग्रहींच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच आणण्यास सुरुवात झाली. ज्यांच्या मालमत्ता सरकारने ताब्यात घेतल्या, त्यांना सहवेदना म्हणून गांधींनी निगुतीने जपलेला स्वत:चा ग्रंथसंग्रह अहमदाबादमध्ये तेव्हा नुकत्याच स्थापन झालेल्या एम. जे. ग्रंथालयाला सुपूर्द केला. १९३३ मधल्या गांधींच्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या संग्रहातील पुस्तकांचा आकडा सुमारे ११ हजार इतका सांगितला होता. मात्र एम. जे. ग्रंथालयाकडे गांधींनी ९६५० पुस्तकं दिली असल्याची नोंद ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर आहे. आबाळ करण्याच्या आपल्या परंपरेनुसार, सुमारे साडेआठ दशकांपूर्वी भेट दिलेल्या या ग्रंथसंग्रहातील साऱ्याच पुस्तकांची नोंद ग्रंथालयाकडे झालेली नाही. यापैकी अनेक पुस्तकं  ग्रंथालयाच्या वाचकांनी वाचण्यास नेली, पण परत केलीच नाहीत. काही पुस्तकांची पाने सुटी सुटी झाली आहेत, तर काही अगदीच नाजूक अवस्थेत आहेत. त्यामुळेच जी पुस्तकं उपलब्ध आहेत, त्यांचं डिजिटायझेशन करून  ती जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला. गांधींच्या संग्रहातील ही पुस्तके पाहिली, की त्यांच्या विविधांगी वाचनाची प्रचीती येते. ‘नवजीवन’, ‘यंग इंडिया’मधील लेखन किंवा  सुहृदांना लिहिलेल्या पत्रांमधून गांधींच्या वाचनाचे संदर्भ काही प्रमाणात येतात. त्यांच्या साहाय्याने गांधींच्या वाचन-प्रयोगांचे दस्तावेजीकरण करणाऱ्या तीन प्रयत्नांबद्दल लिहिणे आवश्यक ठरते. त्यातला पहिला प्रयत्न होता तो धर्म वीर यांनी १९६५ मध्ये गांधींनी वाचलेल्या २५३ पुस्तकांच्या सूचीकरणाचा. अशीच दुसरी सूची १९९५ मध्ये आनंदा पंदिरी यांनी केली होती. त्यात ३५४ पुस्तकांचा समावेश होता.

मात्र गुजरात विद्यापीठाने २०११ साली प्रकाशित केलेला किरीट भावसार, मार्क लिंडले आणि पूर्णिमा उपाध्याय यांनी संपादित केलेल्या सटीप सूचीग्रंथात तर तब्बल साडेचार हजार पुस्तकांचा समावेश केला आहे. त्यात गांधींचे इंग्लंडमधील शिक्षण, आफ्रिकेतील कालखंड, पुढे भारतातील आगमन व स्वातंत्र्य चळवळीला समांतर गांधींचे जीवन अशा सुमारे सहा दशकभरांतील वाचन-प्रयोगांचा आढावा घेतला आहे. हे पुस्तक वरील डिजिटाइज्ड पुस्तके पाहताना, वाचताना हाती असायलाच हवे. http://links.gujaratvidyapith.org/publication/Bibliography_of_Books_Read_by_Mahatma_Gandhi.pdf  या संकेतस्थळावर ते वाचायला मिळेल. तर आतापर्यंत डिजिटाइज झालेली पुस्तके https://www.gandhiheritageportal.org/MKG-Collection-MJ-Library या दुव्यावर वाचायला मिळतील. गांधींनी वाचलेल्या, संग्रही ठेवलेल्या पुस्तकांना वाचण्याची संधी देणारा हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जावा, ही अपेक्षा!