रंग लालच!

स्वातंत्र्य चळवळीपासूनच बंगाल प्रांतातील राजकारणी किंबहुना राजकारणात रस असणारी मंडळी ही कट्टर मानली गेली आहेत

प्रसाद मोकाशी

कादंबरीच ही.. पण एका पक्षाचे धिंडवडे काढू पाहताना, राजकारणाचा रंगही दाखवणारी!

देशात सर्वसामान्यांचे राज्य यावे आणि त्यासाठी धडपडणारा पक्ष हाच आपल्या स्वप्नांची पूर्तता करेल असे वाटून त्या पक्षात कार्यरत राहणाऱ्या एका महाविद्यालयीन युवकाच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो आणि त्याचा एकूणच राजकीय पक्षांच्या कार्यशैलीवरचा विश्वास उडतो, याची कहाणी म्हणजे हे पुस्तक! राजकारणात प्रबळ व्हायचे  तर गुंडगिरी पाहिजेच, या धारणेचीही उलटतपासणी या कादंबरीच्या कथानकातून करण्याची संधी वाचकांना मिळते.

स्वातंत्र्य चळवळीपासूनच बंगाल प्रांतातील राजकारणी किंबहुना राजकारणात रस असणारी मंडळी ही कट्टर मानली गेली आहेत. त्यामध्ये कोणत्या एका पक्षाचे नाव घेता येणार नाही. ही कट्टरता हा बंगालच्या मातीचा गुण आहे, असे मानायला हरकत नाही. बाल्यावस्थेपासूनच येथील तरुण-तरुणींना राजकीय विचारांचे धडे दिले जात असावेत. रजत लाहिरी हाही असाच एक तरुण. महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्याचा डाव्या चळवळीशी संबंध येतो. डाव्या विचारांच्या ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेमध्ये तो काम करू लागतो. महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुकीमध्ये तो सक्रिय होतो आणि ज्येष्ठांच्या नजरेत भरतो. या निवडणुकीत काही विद्यार्थी हिंसाचाराचा अवलंब करतात. हे चुकीचे आहे, हे त्याला जाणवत असले तरी आपल्याला निवडणुकीचे यश मोहवते आहे, हे त्याच्या मनाला जाणवते. मात्र तरीही त्याला त्याच्या पक्षाचा हाच मार्ग असल्याने तो त्या मार्गाचा अवलंब करत राहतो. समाजकारणाची आवड आणि त्याचबरोबर राजकारणाची जाण असलेल्या रजतला विद्यार्थी संघटनेत राहून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात आनंद वाटत राहतो. त्याच्या पक्षाच्या प्रत्येक टप्प्यावर असलेल्या वेगवेगळ्या संघटनांमधील राजकारणाचा, त्यातील एकमेकांवर कुरघोडी करत पुढे जाण्याचा अनुभव तो जवळून घेतो. त्याच वेळी पक्षाच्या एककल्ली कार्यक्रमामुळे अन्य राजकीय विचारधारांच्या पक्षांना पाठबळ मिळते आहे, हे त्याला जाणवते. मात्र हेच कोणाशी बोलू पाहताच त्याला गप्प केले जाते. स्थानिक निवडणुकीत आंतरराष्ट्रीय प्रश्न वा मुद्दे मांडून मते नव्हे टाळ्या मिळतात, हे रजतला जाणवत असले तरी त्याचे पक्षातील वरिष्ठ हे मान्य करत नाहीत. साम्यवादी चळवळी, विचार संपुष्टात येण्याचे, त्या पक्षाचे हसे होण्याचे हेच कारण आहे, हे या पुस्तकातून बिंबविण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.

रजत हा या कादंबरीचा कथानायक म्हणजेच खुद्द लेखकच असणार, हे सांगावे लागत नाही. त्याने त्याला आलेले आपले अनुभव मांडताना बंगालमधील साम्यवादी चळवळीची ओहोटी आणि तृणमूल काँग्रेसचा उदय यांचे दर्शन घडवले आहे. लेखक विद्यार्थी चळवळीच्या मुशीत घडला आहे. त्याला बंगालमधील डाव्या चळवळीविषयी, मार्क्‍सवादी विचारांविषयी ममत्व आहे. पण बदलत्या काळानुसार पक्षाने आपले विचार बदलले नसल्यामुळे त्यांची सर्वसामान्यांशी असलेली नाळ तुटल्याचे त्याला जाणवते. आपल्या पुढील आयुष्याच्या प्रगतीसाठी कथानायक कोलकाता सोडून दिल्लीला येतो. तेथे तो पत्रकारितेचे शिक्षण घेतो आणि पुन्हा राजकीय पत्रकार म्हणून तो कोलकातामध्ये येतो. मार्क्‍सवादी पक्षाच्या मुख्यालयात तो जातो तेव्हा त्याला जाणवते की आता सारीच परिस्थिती बदललेली आहे. पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आपल्या नेत्यांची वाट पाहात मुख्यालयातच बसले आहेत. कोणतेही नियोजन नाही की निवडणूक प्रचाराची आखणी नाही. त्याबद्दल कोणालाही विशेष काही वाटत नाही. प्रचाराचा धुरळा सर्व पक्ष उडवत असताना मार्क्‍सवादी पक्षाचे मुख्यालय थंडच. याचाच फायदा घेऊन बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्ता काबीज करते आणि भाजपचाही उदय होतो. एकेकाळी काँग्रेस व मार्क्‍सवादी या परंपरागत राजकीय प्रतिस्पध्र्यासोबत आता अन्य पक्षांचा उदय झाला,  त्यांच्याच हातात एकूण राजकारणाची दोरी गेली, हे सर्व पाहून आपण एका भ्रामक दुनियेची स्वप्ने तर पाहिली नाहीत, असा प्रश्न कथानायकाला पडतो. आजचे वास्तव काही वेगळे आहे, हे त्याला जाणवते.

सत्तेवर असलेल्या किंवा राज्यात तसेच केंद्रात प्रबळ असलेल्या सत्ताधारी पक्षाचा उदय कसा झाला आणि त्यांचीच ध्येय धोरणे कशी योग्य आहेत, हे सांगताना आधीच्या पक्षांचे किंवा त्यांच्या नेत्यांचे कसे चुकले, ते कसे चुकीचेच होते असे सांगण्याची एक नवी लाट सध्या साहित्यामध्ये वाचायला मिळते. जुन्या किंवा अनेक वर्षे सत्तेत असलेल्या पक्षांनी कसे समाजाला लुटले, मतदारांना भुलवले असे रंजक पद्धतीने सांगून आताचे पक्षच कसे योग्य आहेत, ते कसे योग्य धोरणे राबवत आहेत, असे सांगत विद्यमान सत्ताधाऱ्यांची तळी उचलून धरण्याचे कामही अनेक मंडळी करताना दिसतात. लेखक, पत्रकार सौज्र्या भौमिक यांनीही बहुधा हीच वाट चोखाळलेली दिसते. बंगालमधले राजकारण हे टोळीयुद्धासारखे आहे, तेथे प्रत्येक पक्षाच्या टोळ्या आहेत आणि हे संपूर्ण राज्य एका गुन्हेगारांचे राज्य आहे, असा आविर्भाव या कादंबरीतून व्यक्त होताना दिसतो.  सध्याचे प्रस्थापित केंद्रीय पक्ष हे सातत्याने बंगालबाबत, महाराष्ट्राबाबत हेच चित्र रंगविताना दिसतात. ‘बंगालमधील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष हा एक गुंडांचा, दहशतवाद्यांचा पक्ष आहे आणि त्यांना स्थानिक प्रश्नांशी विशेष ममत्व नाही, त्यामुळेच त्यांची निवडणुकीमध्ये धूळदाण झाली आहे,’ असेच काहीसे सांगण्याचा प्रयत्न लेखकाने या कादंबरीच्या माध्यमातून केला आहे. मात्र एके ठिकाणी कथानायक असलेल्या रजतला त्यांच्याच पक्षातला एक पुढारी सांगतो की, आपण सर्वसामान्यांसोबत आहोत आणि त्यांचा आपल्यावर विश्वास आहे, हीच आपली जमेची बाजू आहे, हे लक्षात घे. अर्थात निवडणुका असोत वा राजकारण त्यातील झुंडीचे समाजशास्त्र बंगालमधील प्रत्येक पक्षाने पक्के केले आहे. त्यामुळेच बंगालमध्ये निवडणुकांचा रंग लालच असतो आणि तो सर्व पक्ष मान्य करतात. मार्क्‍सवादी पक्षाची पिछेहाट समाजाशी असलेली नाळ तुटल्यामुळे झालेली नाही तर साम्यवादी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात आलेल्या अपयशामुळे झाली आहे, हे ध्यानात घेतले तर ही साहित्यकृती कादंबरी म्हणून वाचनीय ठरते.

‘गँगस्टर स्टेट’

लेखक : सौज्र्या भौमिक

प्रकाशक : मॅकमिलन

पृष्ठे : ३४४; किंमत : ६५० रु.prasad.mokashi@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gangster state book review by journalist sourjya bhowmick zws

Next Story
व्यवस्थेचीच ‘जुगाड’बाजी
ताज्या बातम्या