माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार राहिलेल्या संजय बारू यांचे दिल्लीच्या ‘दरबारी राजकारणा’वर प्रकाश टाकणारे नवे पुस्तक प्रकाशित होत आहे. या दरबाराला बारूंनी ‘सत्तेच्या दरबारातील अभिजन’ असे म्हटले आहे; पण सर्वज्ञात असलेला शब्द म्हणजे ‘ल्युटन्स दिल्ली’! नवी दिल्लीच्या या गल्लीबोळांमधून सत्तेतील ‘भागीदार’ निवास करतात. हे भागीदार फक्त सत्ताधारी पक्षाचे असतात असे नव्हे. विरोधी पक्षांचे नेते, सरकारी बाबू, वकील, न्यायाधीश, अभ्यासक, धोरणकर्ते, संस्था-संघटनांचे मालक, देशी-परदेशी हितसंबंधांचे ‘रक्षणकर्ते’, उद्योग क्षेत्राशी निगडित मध्यस्थ, पत्रकार आणि उघडपणे वावरणारे दलालही त्यात असतात! इतक्या सगळ्यांनी ‘ल्युटन्स दिल्ली’ बनवलेली आहे. हे दरबारी राजकारण गेल्या काही दशकांमध्ये कसे बदलत गेले, याची ‘दिवाण-ए-खास’ कहाणी बारू यांच्या पुस्तकात वाचायला मिळेल.

दिल्लीतील सत्तेच्या राजकारणाचे अंतरंग उलगडून दाखण्याचा प्रयत्न बारूंनी ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम-मिनिस्टर’ या पुस्तकातून केला होता. त्यावर यथावकाश चित्रपटही काढण्यात आला आणि काँग्रेसविरोधात भाजपने पुस्तक आणि चित्रपटाचा वापरही करून घेतला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पहिल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत संजय बारू यांनी माध्यम सल्लागाराची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयातील निर्णयप्रक्रिया आणि यूपीए अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ‘१०, जनपथ’ या निवासस्थानी असलेले समांतर सत्ताकेंद्र तसेच यूपीए काळातील आघाडीच्या राजकारणाचे प्रत्यक्षदर्शी वर्णन बारूंनी केले होते. त्यानंतर काँग्रेसचा ºहास होत गेला आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सत्ताकेंद्रात येऊन बसला. हा निव्वळ राजकीय बदल नव्हता, तर जातीय-धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तन होते. इंग्रजी बोलणाऱ्या उच्च-मध्यमवर्गीय आणि खुल्या आर्थिक-राजकीय विचारांच्या ‘ल्युटन्स दिल्ली’ला मोदींनी नाकारले. मग भाजपने तथाकथित ‘ल्युटन्स दिल्ली’ला बदलवले का आणि ती कशी बदलली, याचा धांडोळा बारू नव्या पुस्तकात घेतील असे दिसते.

A case has been registered against the girlfriend who killed her boyfriend Nagpur crime news
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल; हुडकेश्वर पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
lokmanas
लोकमानस: धार्मिकतेला धर्मांधतेकडे वळविण्याचा प्रयत्न

त्यामुळेच दिल्लीतील नवे दरबारी ‘अभिजन’ कोण असू शकतील, त्यांचा दरबार कसा भरलेला असेल, त्यांच्या दरबारातील हौशेनवशे कोण असतील, याची उत्सुकता! बारू म्हणतात की, ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम-मिनिस्टर’मधून ‘आतली गोष्ट’ बाहेरच्या जगाला सांगितली, तसाच प्रयत्न नव्या पुस्तकात असेल. तेव्हादेखील दरबारी राजकारणातील घडामोडींचा कानोसा लोकांना घेऊ दिल्याबद्दल बारूंवर ‘ल्युटन्स दिल्ली’तील ‘दरबारी’ वैतागलेले होते. कदाचित आताही तसेच होऊ शकेल. पण या वेळी संतापणारे कदाचित वेगळ्या सांस्कृतिक धाग्यातून आलेले असतील. संजय बारू यांचे ‘इंडियाज् पॉवर एलिट : क्लास, कास्ट आणि कल्चरल रिव्होल्युशन’ हे पुस्तक ‘पेंग्विन रॅण्डम हाऊस इंडिया-व्हायकिंग’द्वारे या महिन्यात बाजारात येईल.