कोणतीही गोष्ट हवी असेल तर ती प्राप्त करून घेण्यासाठी तिची किंमत द्यावी लागते. तिच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा लागतो. व्यवहारात या गोष्टीचा आपल्याला अनुभव आहेच. एखादी वस्तू हवी असली तर बाजारात जाऊन तिची किंमत चुकती करूनच ती आणता येते. उच्च पदवी हवी तर त्यासाठी मन ओतून कित्येक तास अभ्यासासाठी द्यावे लागतात. मग परमार्थ साधायचा असेल तर प्रयत्न नकोत? त्यासाठीची किंमत चुकती करायला नको? ही किंमत म्हणजे प्रपंचातली आसक्ती देऊन टाकायची आणि आसक्ती देऊन टाकण्याची प्रक्रिया सहजतेने व्हावी आणि परमात्म्याच्या आधाराची जाणीव दृढ व्हावी यासाठीची साधना म्हणजेच प्रयत्न! या प्रपंचाच्या आसक्तीचा उगम मनात आहे, तसाच परमात्म्याचा अर्थात सद्गुरूंचा आधारही मनालाच घ्यायचा आहे. प्रपंच तर सुटणार नाहीच पण त्यातली आसक्ती सुटली पाहिजे. ती सुटायची तर मनाला प्रपंचाचा जो आधार वाटतो त्या जागी परमात्म्याच्या आधाराची जाणीव रुजली पाहिजे. त्या आधाराची जाणीव आधी कल्पनेनं पक्की व्हावी आणि नंतर अनुभवाने कायमची दृढ व्हावी, यासाठीच साधना आहे. त्या साधनेचा प्रारंभ आणि परिपूर्णता नामात आहे. आज मन प्रपंचात पूर्ण रूतून आहे, त्यामुळे ‘प्रपंच’ की ‘परमार्थ’ हा प्रश्नच या मनाला नकोसा वाटतो. काहीजण म्हणतील, ‘आम्हाला परमार्थच हवा आहे हो, पण प्रपंचातली जबाबदारी तर टाळता येत नाही ना?’ काहीजण श्रीमहाराजांनीही प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही साधायचीच कशी शिकवण दिली होती, याचेही दाखले देतील. पण श्रीमहाराजांना जो आणि जसा प्रपंच अभिप्रेत आहे, त्याकडे सर्वचजण दुर्लक्ष करतील. एकानं श्रीमहाराजांना प्रश्न विचारला की, महाराज कोणता प्रपंच चांगला मानावा? हा प्रश्न करतानाच, ‘खाऊन-पिऊन सुखी राहाता येईल’, असाच प्रपंच प्रश्नकर्त्यांला उत्तरात अभिप्रेत असतो. श्रीमहाराज तात्काळ म्हणाले, ‘कोणत्या रंगाची विष्ठा चांगली आहे, असं विचारण्यासारखं आहे हे!’ म्हणजे विष्ठा ती विष्ठाच तसा प्रपंच तो प्रपंचच. मग तो श्रीमंताचा असो की गरिबाचा. विद्वानाचा असो की अडाण्याचा. प्रपंच म्हटला की स्वार्थ आलाच. स्वार्थ आला तिथे आसक्ती आलीच. मग कमी-अधिक प्रमाणात सर्वाचाच प्रपंच आसक्तीच्या पातळीवर एकसारखाच असतो. ज्याचा त्याचा प्रपंच ज्याला त्याला नेहमीच गुंतवणाराच असतो. कुणाचाच प्रपंच कधीच पूर्ण होत नाही. त्यातला अपुरेपणा कधीच सरत नाही. थोडक्यात माणूस कोणत्याही स्थितीतला, कोणत्याही पातळीवरचा असो; त्याचा प्रपंच हा आसक्तीयुक्तच आहे. तो जर परमार्थयुक्त करायचा तर त्यासाठी मनातली प्रपंचाची आसक्ती सुटून तिथे परमात्म्याची ओढ रुजली पाहिजे.  त्या परमात्म्याचं खरं स्वरूप जरी आम्हाला माहीत नसलं तरी जो प्रपंच आम्ही जन्मापासून करीत आहोत, त्या प्रपंचाचं खरं स्वरूप तरी आपल्याला कुठे माहीत आहे? ते माहीत नाही, कारण आम्ही डोळे मिटून प्रपंच करतो आणि साधना डोळे उघडे ठेवून करतो!