जो आपल्या डोळ्यांनी आपल्या देहबुद्धीचं मरण पाहील त्याला तो सोहळा अनुपम्य वाटेल. त्यालाच, ‘‘आनंदें दाटलीं तिन्ही त्रिभुवनें। सर्वात्मकपणे भोग झाला।।’’ हा अनुभव येईल. तन, मन आणि धनाची त्रिभुवने आनंदानं दाटतील. सर्व काही परमात्मसत्तेनंच व्यापून आहे. माझं आत्मस्वरूपही त्याचाच अंश आहे. त्यामुळे कर्ता, भोक्ता सारं काही मीच आहे, या जाणिवेनं जीवन सर्वात्मक होईल. कुणी म्हणेल, अहो गणपती अथर्वशीर्ष काय, तुकाराम महाराज यांचा अभंग काय, हे चैतन्य चिंतन कसं म्हणावं? तर श्रीगोंदवलेकर महाराज यांच्याच एका वाक्यातून हा विचारप्रवाह आला ते वाक्य म्हणजे, ‘वासनेत जन्माला येऊन देवाला दत्तक गेल्यावर आपले मरण आपल्या डोळ्यांना दिसेल!’ माणसाचा जन्म वासनेच्या पोटी झाला आहे. आता देहाला दत्तक जायचं की देवाला दत्तक जायचं, हे आपल्याला ठरवायचं आहे. आपण श्रीमहाराजांपाशी आलो आहोत, स्वत:ला श्रीमहाराजांचे मानतो आहोत, त्यामुळे आपण देवाला दत्तक जायचा निर्णय घेतला आहे. आता ही दत्तकविधानाची प्रक्रिया म्हणजेच देहबुद्धीची देवबुद्धी करण्याची प्रक्रिया आहे. देवाला दत्तक जाणं म्हणजेच देहाची गुलामी सोडून देवाचे दास होणं. देहाच्या गुलामीमुळेच मी माझं खरं स्वरूप विसरून भ्रामक ‘मी’च्या गुलामीत अडकलो आहे, असं संत सांगतात. मी देवाचा दास झालो तर माझा भ्रामक ‘मी’ जिंकला जाईल. तो जिंकला गेला की त्या भ्रामक ‘मी’च्या आधारावर निर्माण झालेलं ‘माझं’ भ्रामक जगही जिंकलं जाईल. ‘‘ज्याने प्रपंच जिंकला त्याने जग जिंकले, ज्याने आपल्याला जिंकले त्याने प्रपंच जिंकला. मी देवाचा दास झालो तर मी जिंकला जाईन’’ (बोधवचने, क्र. ८६२), या श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या बोधवचनाच्या निमित्ताने गेले २४ भाग आपण ही प्रदीर्घ चर्चा केली. देवाचा दास होणं म्हणजे देवाला दत्तक जाणं, देवाला दत्तक जाणं म्हणजे आपल्या देहबुद्धीचं मरण स्वतच्या डोळ्यांनी पाहाणं, हे आपल्या या चर्चेचं सार होतं. या भ्रामक ‘मी’ला जिंकण्याची लढाई, हाच आपल्या चिंतनाचा अखेरचा टप्पा आता सुरू होत आहे. आता प्रश्न असा की, या लढाईची गरज काय? याचं प्राथमिक पातळीवरचं उत्तर असं की त्यामुळे जगणं अधिक स्वतंत्र, मुक्त आणि आनंददायी होईल. तसंही आपलं जीवन म्हणजे एक लढाईच आहे, असं प्रत्येकाला वाटतं. आपल्या मनात काही अपूर्त इच्छा असतात, आपली काही स्वप्नं असतात. त्यांच्या पूर्तीसाठी आपल्याला जितकं बाह्य़ परिस्थितीशी व प्रसंगी व्यक्तींशीही झगडावं लागतं, तितकंच आपल्या आंतरिक क्षमतांमधील उणिवांशीही लढावं लागतं. तेव्हा हा जीवनसंघर्ष, जगण्याची ही लढाई कुणालाच सुटलेली नाही. फरक इतकाच की भ्रामक ‘मी’च्या जोरावर आणि त्याच्याच अपेक्षापूर्तीसाठी या लढाईसाठी आपण आपली शक्ती पणाला लावतो, त्याऐवजी आपल्या वास्तविक स्वरूपाच्या प्राप्तीसाठी या भ्रामक ‘मी’विरुद्धच ही लढाई लढण्याकडे आपल्याला शक्ती वळवायची आहे. लढणार आपणच आहोत आणि लढाई आपल्याविरुद्धच आहे!

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!