भक्ताच्या जीवनातील प्रसंगांतून आध्यात्मिक तत्त्वांचंच सहज दर्शन घडतं. पण जोवर त्या तत्त्वांचं मनन आणि त्यायोगे स्वत:च्या जगण्यात आचरण सुरू होत नाही, तोवर स्वानुभवानं ती तत्त्व आपल्या जगण्यात पक्की होत नाहीत. तेव्हा, भक्ताच्या जीवनातील प्रसंगातून लखलखीतपणे समोर आलेल्या तत्त्वाचं मनन, परिशीलन आणि आचरण घडत गेलं पाहिजे. तरच खरी विरक्ती उदय पावू लागेल, असं संत सांगतात. आता ‘विरक्ती’ या शब्दाच्या आकलनाबाबत बराच गोंधळ असतो. या विरक्तीच्या अनेक अर्थछटा असल्या, तरी साधकासाठीची विरक्ती म्हणजे व्यक्तिगत जीवनात वाटय़ाला आलेल्या परिस्थितीचा आंतरिक वाटचालीत आणि विकासात कणमात्रही प्रभाव न उरणं! मग भले ती परिस्थिती पूर्ण अनुकूल का असेना!! आता आपल्याला वाटेल की, परिस्थिती प्रतिकूल असेल, तर आंतरिक वाटचालीवर तिचा प्रभाव पडणं स्वाभाविक आहे. अनुकूल परिस्थिती कशी काय आंतरिक वाटचालीच्या आड येऊ शकते? वरकरणी असं वाटणं बरोबर आहे, पण अनुकूल परिस्थितीही माणसाला अलगद अडकवत असते. इतकंच नाही, तर परिस्थिती अनुकूल आहे खरी, पण ती प्रतिकूल तर होणार नाही ना, या सुप्त भीतीतही ती गुंतवते. ‘रामचरित मानस’मध्ये तुलसीदास म्हणतात की, भक्ताला साधनेत कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी भगवंत कृपा करतो आणि त्याच्या प्रपंचात अनुकूलता निर्माण करतो. म्हणजे परिस्थिती आणि प्रपंचातली माणसं  त्याला अनुकूल राहातात. पण भगवंतानं केलेली ही सोय लक्षात न आल्यानं भक्त केवळ साधनेत रमायचं सोडून प्रपंचातली अनुकूलता टिकवण्यासाठीही परिश्रम करीत राहातो! म्हणजेच जीवनात माणसं आपल्याला अनुकूल आहेत ही भगवंताची कृपा आहे, हे लक्षात न घेऊन तो ती माणसं कधी प्रतिकूल तर होणार नाहीत ना, या भीतीने कधीकधी झाकोळतो. मग तो ही माणसं सदोदितच अनुकूल राहावीत, यासाठी वृथा धडपडत राहतो. भगवंतानं गोवर्धन एका करंगळीवर तोलला होता पण त्यावर विश्वास न बसून, तो डोंगर आपल्यावर पडू नये, यासाठी आपल्या हातातल्या काठय़ांनी तो तोलून धरण्याच्या धडपडीत गोकुळवासी प्रथम पार थकून गेले होते! तसा साधक प्रपंचातली अनुकूलता टिकवण्याच्या धडपडीत गुंतून साधनेलाही प्रसंगी दुय्यम महत्त्व देतो! कुंती म्हणाली ना? की, ‘हे भगवंता माझ्या जीवनातलं दु:खच कायम ठेव. म्हणजे मग तुझं स्मरण सदोदित राहील.’ ते काही कुणाला झेपणारं नाही! पण निदान अनुकूल परिस्थिती असताना साधनेबाबत अधिक जागरूक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण खरं तर जीवनात अनुकूलताही कायमची नसते. त्यामुळे शरीर साथ देत आहे, परिस्थिती साथ देत आहे तोवर साधना मन:पूर्वक करण्याचा अभ्यास चिकाटीनं केलाच पाहिजे. कबीर म्हणतात ना? ‘दुख मे सुमिरन सब करै, सुख मे करै न कोय, जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होय?’ अनुकूलता असतानाच जर शुद्ध स्मरण साधलं, शुद्ध तत्त्वाचं मनन आणि आचरण साधलं, तर मग प्रतिकूलता आली तरीही तिचा स्वीकार थोडा अधिक समंजसपणे करता येईल. तेव्हा विरक्ती म्हणजे अनुकूलता असो वा प्रतिकूलता असो, आपल्या आंतरिक वाटचालीच्या अभ्यासात खंड पडू न देणं आणि आत्मिक विकासालाच सदोदित प्राधान्य असणं. मग भौतिक जीवन बाहेरून कितीही भरभरून जगत का असेना!

– चैतन्य प्रेम

duvartanacha vedh marathi book
वर्तन कारणांचे उत्खनन
homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?

chaitanyprem@gmail.com