अतुल सुलाखे

सत्याग्रहाचे संशोधन केले आणि त्यामध्ये नवीन आशय ओतला तरीही विनोबांनी गांधीप्रणीत सत्याग्रहाचा मार्ग सोडला नाही. त्यांनी गांधीजींच्या नंतर दोन मोठे सत्याग्रह केले. त्यातील एक सत्याग्रह चित्रपटगृहाबाहेरील अशोभनीय पोस्टर्सच्या विरोधात होता. इंदूरसारख्या नगरीत म्हणजे अहिल्यादेवींच्या भूमीत अश्लीलतेचे असे सार्वजनिक प्रदर्शन पाहून विनोबा व्यथित झाले. त्यांनी त्याविरोधात सत्याग्रह केला. हा प्रश्न तत्कालीन राष्ट्रपतींपर्यंत जाईल, असेही पाहिले.

दुसरा सत्याग्रह गोवंश हत्याबंदीसाठी केला. विनोबांच्या सूचनेवरून अच्युतभाई देशपांडे यांनी देवनारच्या कत्तलखान्यासमोर सत्याग्रह सुरू केला. आजही तांत्रिकदृष्टय़ा तो सत्याग्रह सुरू आहे, असे सांगितले जाते. इथे एक प्रश्न उभा राहतो, गोवंश रक्षण आणि अश्लीलता याविरोधात ठामपणे उभ्या राहिलेल्या विनोबांनी भूमिहीनांच्या समस्यांच्या संदर्भात सत्याग्रहाचा मार्ग का चोखाळला नाही, या प्रश्नाचे उत्तरही विनोबांनी दिले आहे.

‘सर्वोदयाची भूमिका अशी आहे, की एखादा सिद्धांत सर्वमान्य आहे आणि त्याचा अनादर होत आहे तर त्यासाठी सत्याग्रह केला जाऊ शकतो. परंतु जो सिद्धांत सर्वमान्य नाही आणि आम्हाला मान्य आहे, तो शिक्षणाचा विषय आहे. म्हणून त्याबाबत आम्ही प्रचार करत राहतो. व्यक्तिगत मालकी असू नये, ही गोष्ट सर्वमान्य झालेली नाही. काही लोक त्याविरोधात आहेत म्हणून हा सत्याग्रहाचा विषय होऊ शकत नाही. हा प्रचाराचा विषय आहे.

अशोभनीय पोस्टर्सच्या विरोधात सगळी जनता आहे. मूठभर भ्रमिष्ट सोडले तर त्याबाबत सर्वाचे एकमत आहे. अशी घाणेरडी चित्रे आपल्या मुलाने पाहू नयेत अशी प्रत्येक आईची इच्छा आहे. म्हणून याबाबत प्रचाराची गरज नाही. याबाबत सरकारविरुद्ध सत्याग्रह होऊ शकतो.

आज जर मी म्हटले की जोपर्यंत भूमिहीनांना जमीन मिळत नाही तोपर्यंत मी उपवास करेन तर माझी इच्छा अत्यंत शुद्ध असली आणि माझी भावना प्रामाणिक तरीही माझे पाऊल चुकीचे ठरेल. त्यासाठी प्रथम वातावरण तयार करायला हवे. लोकांची सहानुभूती प्राप्त करायला हवी. जितक्या लोकांकडून जमीन मिळवली जाऊ शकते तितक्या लोकांकडून ती मिळवायला हवी आणि जमीन मिळेल असेच मानायला हवे.

एखादी गोष्ट कायद्याने मान्य केली आहे, जनमतही तिला अनुकूल आहे आणि तरीही तिचा अंमल होत नसेल तर अशा वेळी सत्याग्रह केला जाऊ शकतो. तमिळनाडू व विदर्भाच्या कार्यकर्त्यांना बेदखलीविरुद्ध सत्याग्रह करण्याची अनुमती मी दिलीच होती..

‘दारूबंदी तर देशभरात झाली पाहिजे. हे मूलभूत काम आहे. सर्व पापांच्या मुळाशी अर्थ-लोभ आहे. अर्थ-लोभ येतो तेव्हा सरकारही दारूच्या बाजूने युक्तिवाद मांडू पाहाते. घटनात्मक मार्ग चोखाळून झाल्यावर गरज पडली तर त्यासाठी सत्याग्रहही केला पाहिजे. गोहत्या बंदी भारतीय संस्कृतीचा आदेश आहे. भारतीय संविधानाचा निर्देश आहे. भारत सरकार त्यासाठी वचनबद्ध आहे आणि भारतीय संसदेचा तसा संकल्प आहे. म्हणून संपूर्ण भारतात त्वरित गोहत्या बंदी झाली पाहिजे. कोणत्याही वयाचे गाय बैल कापले जाऊ नयेत म्हणून देवनारला सत्याग्रह करा.’

विनोबांचा सत्याग्रह-विचार अमान्य होऊ शकतो तथापि तो समजावून घेणे गरजेचे आहे आणि त्यातील सामाजिक साम्ययोगही!

jayjagat24@gmail.com