भावेश ब्राह्मणकर
जगातील सर्वात उंच (२१ हजार फूट) रणांगण असलेल्या सियाचीन हिमखंडाच्या परिसरातील शक्सगाम खोऱ्यात चीनने रस्ते बांधल्याची बाब आता उघड झाली असून यासंदर्भात भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील या प्रदेशात चीनने पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करणे आक्षेपार्ह असल्याचे भारताने म्हटले आहे. पण, चीनने एका रात्रीत हा रस्ता बांधला का? पाकिस्तान आणि चीनची आगळीक नेमकी कशासाठी? चीनचा यामागे काय डाव आहे? भारताला सामरिकदृष्ट्या खिंडीत गाठण्यासाठी हे आहे का? या सर्वाचा साकल्याने विचार होणे आवश्यक आहे.

शक्सगाम खोऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी इतिहासात डोकावावे लागेल. ब्रिटिश काळातच भारत-चीन सीमावादाची बीजे रोवली गेली आहेत. रशिया आणि चीनपासून चार हात लांब राहण्याचे धोरण ब्रिटिशांनी अवलंबले. त्यासाठी भारतासह लगतच्या देशांचा त्यांनी वापर केला. त्यामुळेच भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भारत आणि चीन सीमेचा प्रश्न निकाली निघाला नाही. १८व्या शतकात लाहोरमधील शीख राजेशाहीचे प्रमुख सरदार गुलाबसिंग हेच जम्मू राज्याचे प्रशासक होते. पहिल्या आंग्ल-शीख युद्धात त्यांनी ब्रिटिशांना मदत केली. १८४६ मध्ये ब्रिटिशांनी जम्मू-काश्मीर हे नवे संस्थान मान्य करून गुलाबसिंगांकडे जम्मू-काश्मीरचे महाराजपद दिले. याबदल्यात गुलाबसिंगांनी ब्रिटिशांना ७५ लाख रु. दिले. त्यावेळी लडाखसुद्धा गुलाबसिंग यांच्या अधिकारात होते. या राज्याचा विस्तार ते करतील हे ब्रिटिशांना माहीत होते. तिबेट जिंकून पुढे चीनवर गुलाबसिंग चालून जातील की काय, अशी शंका वाटू लागल्यामुळेच ब्रिटिशांनी गुलाबसिंगांशी अमृतसर करार केला. त्यानुसार, जम्मू-काश्मीरचा पुढे विस्तार न करण्याचे निश्चित झाले. मात्र जम्मू-काश्मीरच्या सीमेचा स्पष्ट उल्लेख या करारात नव्हता.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China has built roads in the shaksgam valley in the vicinity of the siachen iceberg is revealed amy
First published on: 09-05-2024 at 04:49 IST