अभिजात साहित्याचे भाषांतर आणि साहित्याचे अभिजात भाषांतर अशा दोन्ही अंगांनी ‘भाषांतर’ प्रक्रिया व स्वरूप यावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा एक शोधनिबंध आहे. तो त्यांनी राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत या नवी दिल्लीतील संस्थेच्या ग्रंथोत्सवातील एका परिसंवादात जो ६ व ७ डिसेंबर १९८२ ला पुण्यात झाला होता, त्यात वाचला होता. भाषांतर ही मूलत: जोखीम व जबाबदारीची गोष्ट असल्याची जाणीव करून देणारा निबंध मुळातून वाचण्याइतका प्रगल्भ आहे. तो सोदाहरण (डेमॉस्ट्रेटिव्ह) असल्याने दृष्टांत प्रत्यक्षाहून सुंदर असल्याची प्रचीती देणारा आहे.

‘क्लासिक’ या इंग्रजी शब्दाला मराठी पर्यायपद म्हणजे ‘अभिजात’ होय. त्यात त्या साहित्याच्या दीर्घ जतन, वाचन, संदर्भमूल्याचा संकेत असतो. साहित्याच्या सर्व प्रकारांत अभिजात साहित्यकृती आढळतात, तशाच त्या सर्व भाषांतही दिसून येतात. साहित्याची भाषा संवादाचे माध्यम असते, तर भाषांतर भिन्न भाषांतील संवादाचे. भाषेने मानवाचे सामाजिकीकरण होते, तर भाषांतराने साहित्याचे सांस्कृतीकरण. विश्वमानव समाजनिर्मिती भाषांतराने शक्य होते, होईलही! भाषांतर सर्वंकष हवे. पद, वाक्य असा सुटा व्यवहार भाषांतरमारक ठरतो. त्याने भाषांतर बेंगरूळ (विद्रूप) होण्याची शक्यता अधिक.

अभिजात साहित्याचे भाषांतर करताना कालभान महत्त्वाचे असते. कालौघात भाषेमध्ये पडलेला फरक भाषांतर करतानाच्या कालसंदर्भात महत्त्वाचा असतो. समकालीन भाषेशी सायुज्य निर्माण झाल्याशिवाय झालेले भाषांतर कुचकामी ठरण्याची शक्यता अधिक. तीन हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृत वेदांचे भाषांतर पंधराव्या शतकात कळेनासे झाले होते. ग्रीक भाषेतील होमरच्या ‘इलियड’ वा हिब्रू भाषेतील ‘बायबल’चा ‘जुना वा नवा करार’च्या भाषांतराची अशीच स्थिती झाली होती. मराठी भाषांतराचे उदाहरण द्यायचे झाल्यास ‘कुराण’चे मराठी भाषांतर १९१६ सालचे. १९७३मध्ये त्याचे पुनर्मुद्रण हाती घेण्यात येणार होते. त्या वेळी ए. यू. शेख शिक्षण सचिव होते. भाषांतरकार होते डॉ. मौलवी हकीम सूफी मीर मुहंमद याकूब खान. ते आरबी भाषेचे जाणकार. त्यांनी केलेल्या भाषांतरात जागोजागी विद्वत्तापूर्ण टिपा घातल्या. भाषांतर कुराण, इस्लाम धर्माच्या अध्ययनाच्या दृष्टीने बहुमोल होते खरे; पण त्याची मराठी शैली ओबडधोबड व अवघड होती, असे खेदाने नमूद करावे लागते. भाषांतरकाराने धर्मग्रंथांचे भाषांतर म्हणून प्रत्येक शब्दाचे पावित्र्य जपण्याचा आग्रह धरलेला. उपवाक्य पदक्रमही मूळबरहुकूम राखला होता तो पावित्र्य अट्टहासापोटी. अशीच गोष्ट ‘बायबल’ भाषांतराचीही झाली होती. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘सुत्तनिपात’, ‘धम्मपद’, ‘भगवद्गीता’ यांची प्रारंभिक भाषांतरे याच पठडीतील दिसून येतात.

अभिजात साहित्यकृतीची अभिजात भाषांतरे जोखीम व जबाबदारीचे कार्य असल्याची जाणीव करून देणारे हे भाषण आपणास समजावते की, प्रमाण भाषांतर, अभिजात भाषांतर यांपेक्षा ज्या काळाच्या वाचकांसाठी ते केले जाते, त्यांची वाचनक्षमता, शब्दसंपत्ती, समज, कालौघात भाषेत झालेले बदल लक्षात घेऊन केले, तरच ती उपयुक्त ठरतात. अभिजात साहित्यकृतीचे तत्कालीन आशय, विषय, भाषासौंदर्य वर्तमान व भविष्यकालीन वाचकांप्रत पोहोचविण्याच्या उद्देशाने ते भाषांतर झाले, तर समकाल व भविष्यकाळात उपयोगी वा आकलनक्षम सिद्ध होणार. मूळ कृती असो वा भाषांतर, ते वाचकांप्रत भिडत, भावत नसेल, तर अशा भाषा वा साहित्य व्यवहारास फार अर्थ उरत नसतो, हे तर्कतीर्थांनी या शोधनिबंधातून भाषांतरांचे नमुने-जुने व नवे पेश करत आपली भूमिका विशद केली आहे. त्यातून तर्कतीर्थांची भाषिक व साहित्यिक समज प्रकर्षाने लक्षात येते, तसेच भाषांतरपटुत्वही!

तर्कतीर्थ कुशल भाषांतरकार होते. भाषांतरकाराची मूळ योग्यता स्राोतभाषा व लक्ष्यभाषा अशा उभय भाषांवरील अधिकार, प्रावीण्य हीच असते. तर्कतीर्थांनी मानवेंद्रनाथ रॉय, आयझॅक बेहावीस सिंगर, निसिम इझे किल, फिलीप स्पॅट, वर्नर हाइसेनबर्ग, डॉ. मायकेल पोलॅनी यांच्या अनेक कथा, लेख, भाषणे यांची भाषांतरे केली आहेत. संस्कृत व मराठी भाषांवर त्यांचा समाधिकार होता. भाषांतरकाराचे बहुभाषी असणे, ही कुशल भाषांतराची पूर्वअट म्हणून सांगता येईल. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, आचार्य काका कालेलकर, प्रा. प्रभाकर माचवे हे बहुभाषी होते म्हणून भारतीय साहित्यिक, नेते, प्रबोधक होऊ शकले तसेच तर्कतीर्थही!