डॉ. श्रीरंजन आवटे

स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मूल्यत्रयी लोकशाहीची पूर्वअट आहे. बंधुतेला त्यापासून वेगळे करता येणार नाही.

peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
cabinet minister nitin gadkari news
पुढील पंतप्रधान तुम्ही होणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं…
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
Reactions of Political Leaders of Maharashtra in Famous Dialogues in Hindi Cinema
बाइट नव्हे फाइट…

स्वातंत्र्य आणि समानता ही दोन्ही मूल्ये परस्परविरोधी नाहीत; मात्र स्वातंत्र्याचा अतिरेक झाला की समानतेच्या मूल्यावर गदा येते. समानतेला गरजेपेक्षा अधिक महत्त्व दिले, तर स्वातंत्र्यात बाधा येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्याचा उद्घोष केला; पण समानतेच्या मूल्याचा बळी दिला. रशियन राज्यक्रांतीने समानतेचा जयजयकार केला, पण स्वातंत्र्याच्या मूल्याला तिलांजली दिली. स्वातंत्र्य आणि समानता यांचे सहअस्तित्व टिकवणे हे स्वतंत्र भारतासमोर आव्हान आहे, हे सांगतानाच ते म्हणाले होते की स्वातंत्र्याला आणि समानतेला बंधुतेपासून वेगळे करता येणार नाही. स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मूल्यत्रयी लोकशाहीची पूर्वअट आहे. या तिन्हीपैकी एकही मूल्य नसेल तर लोकशाहीचा पराभव अटळ आहे. संविधानाच्या उद्देशिकेत बंधुतेचे मूल्य आहे. स्त्रीवादी विचारवंतांनी ‘बंधुता’ हा शब्द पितृसत्ताक असल्याचे सांगत त्याऐवजी ‘बंधुभगिनीभाव’ असा शब्दप्रयोग केला.

‘व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता’ असा संविधानाच्या उद्देशिकेत उल्लेख आहे. याचा अर्थच असा की व्यक्तीची प्रतिष्ठाही राखली जाईल आणि त्याच वेळी राष्ट्राच्या एकतेला आणि एकात्मतेला बाधा येणार नाही असा ‘सहभाव’ गरजेचा आहे. एकता म्हणजे एकीची भावना, सर्व जण एक आहोत, अशी भावना. देश अखंड टिकवून ठेवण्याचा निर्देश ‘एकात्मता’ या शब्दात आहे. त्यामुळेच ४२ व्या घटनादुरुस्तीने ‘एकात्मता’ हा शब्द जोडला गेला. देशाची अखंडता टिकवून ठेवण्याचा निर्धार त्या शब्दातून व्यक्त होतो.

स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही मूल्यत्रयी आपण फ्रेंच राज्यक्रांतीतून उसनवारीने घेतली नसून बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून ही मूल्ये उगवली आहेत, असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा युक्तिवाद होता. ‘मेत्ता’ असा शब्द बुद्धाने वापरला असून त्याचा अर्थ आस्थापूर्ण, प्रेमळ मैत्री. स्वातंत्र्य आणि समानतेला या मैत्रीशिवाय, सहभावाशिवाय काहीही अर्थ नाही. सहभाव या शब्दामध्ये आस्था (एम्पथी), करुणा, प्रेम अशा साऱ्या भावनांचा अंतर्भाव आहे. जात, धर्म, लिंग, वंश, वर्ग, भाषा सारे वेगवेगळे असले तरी परस्परांविषयी आस्था असायला हवी. वेगवेगळ्या संस्कृतींच्या लोकांमध्ये मैत्री निर्माण व्हायला हवी हे देशातील विविधता अधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, हे सहभावाचे तत्त्व अधोरेखित करते.

आफ्रिकेत ‘उबुंटु’ हे तत्त्वज्ञान उदयाला आले. त्याचे मुख्य घोषवाक्य ‘आय अॅम बिकॉज यू आर’ असे आहे. अर्थात आपण अस्तित्वात आहोत, जिवंत आहोत कारण इतर लोक अस्तित्वात आहेत. इतरांचे अस्तित्व ही आपल्या जगण्याची पूर्वअट आहे. हे तत्त्वज्ञान एका सोप्या उदाहरणातून सहज समजू शकेल- एका अभ्यासकाने आफ्रिकेतल्या मुलांची धावण्याची स्पर्धा घेतली. जो सर्वांत वेगात धावेल त्याला बक्षीस म्हणून टोपलीतील सगळी फळे मिळतील, असे त्याने सांगितले. त्याने मुलांना ‘पळा’ असे सांगितले तेव्हा गंमत झाली. मुलांनी पळण्याऐवजी एकमेकांचे हात हातात धरले आणि ते टोपलीपाशी पोहोचले. मिळालेली फळे त्यांनी वाटून खाल्ली. अभ्यासकाने विचारले, ‘‘तुमच्यातला जो सर्वांत आधी पोहोचला असता त्याला सगळी फळे मिळाली असती, तुम्ही असे का केलेत?’’ त्यावर मुले म्हणाली, ‘‘बाकीचे दु:खी असताना आमच्यातल्या एकालाच कसा काय आनंद झाला असता ?’’ या मुलांचे उत्तर सहभावाचे तत्त्व सांगते. सहकार्य स्पर्धेहून मोलाचे आहे. करुणा आकांक्षेहून मोठी आहे आणि प्रेम ही जगण्याची शैली आहे, द्वेष नाही. उबुंटु म्हणा की सहभाव, संविधान याहून वेगळं काय सांगतं?

poetshriranjan@gmail.com