एल. के. कुलकर्णी

यस्येमे हिमवन्तो महित्वा

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
impact of us foreign policy on semiconductor industry
चिप-चरित्र : चिप उद्योगाचे ‘पूर्व’रंग
Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…

यस्य समुद्रं रसया सहाहु:।

यस्येमा: प्रदिशो यस्य बाहू

कस्मै देवाय हविषा विधेम॥

ऋग्वेद १०- १२१- ४

(नद्यांबरोबर समुद्र, हिमालय पर्वत व संपूर्ण दिशा परमात्म्याचे महत्त्व दर्शवीत आहेत…) ऋग्वेदकाळात हिमालयाला ‘हिमवंत’ म्हणत. वरील ऋचेत हिमालय, समुद्र व दिशा यांचा एकत्र उल्लेख आहे. परंतु त्यानंतर हजारो वर्षे हिमालय, त्यातील वनस्पती, प्राणी, शिखरे, भूविज्ञान यांचा शोध आपण घेतला नाही. पुढे हूकर, एव्हरेस्ट इ. संशोधकांनी ते काम हाती घेतले. हिमालय हा भूतलावर सर्वांत अचल पर्वत असल्याची पारंपरिक कल्पना होती. पण त्याच्या परिसरात वारंवार होणारे भूकंप व भूस्खलन, यावरून तो स्थिर- अचल नाही हे स्पष्ट होऊ लागले. पुढे वेजेनर व इतरांनी ‘हिमालयाचा जन्म’ हे धरित्रीच्या इतिहासातले सर्वांत अद्भुत पर्व प्रकाशात आणले. १८५६ मध्ये ‘सर्व्हे ऑफ इंडिया’मधील डब्लू. टी. ब्लाँडफोर्ड व एच. एफ. ब्लाँडफोर्ड यांना ओडिसामधील तालचीर येथे काही शिलाखंडांवर हिमनदीच्या घर्षणाच्या खुणा आढळल्या. ध्रुवापासून एवढ्या दूर, भारतासारख्या उष्ण देशात कधी तरी हिमनद्या होत्या, हे तसे कल्पनातीतच होते. पुढे सर्व्हे ऑफ इंडियाचेच फ्रान्सिस फेडन यांना चंद्रपूरजवळ इरई नदीकाठी विशेष फरसबंदी दगड असलेली जमीन आढळली. या जमिनीवर हिमनदीच्या घर्षणाच्या नि:संदिग्ध खुणा होत्या. हा एवढा स्पष्ट पुरावा होता की, त्यामुळे प्राचीन काळी भारतात हिमनद्या होत्या हे निर्विवादपणे सिद्ध झाले. यावरूनच फार पूर्वी सर्व खंड एकत्रित असावेत या आल्फ्रेड वेजेनर यांच्या सिद्धांताला पुष्टी मिळाली. त्या सिद्धांताचेच रूपांतर १९६० नंतर ‘प्लेट टॅक्टॉनिक्स’ सिद्धांतात झाले. तात्पर्य भूगोलातील क्रांतिकारक खंडनिर्मिती व प्लेट टॅक्टॉनिक्स सिद्धांताची नांदी भारतातच झाली.

हिमालयाची निर्मिती कशी झाली, हेही पुढे याच सिद्धांताच्या आधारे स्पष्ट झाले. पृथ्वीवर असलेल्या ‘पँजिया’ या एकाच संयुक्त भूखंडाचे सुमारे २० कोटी वर्षांपूर्वी तुकडे पडण्यास सुरुवात झाली. १८ कोटी वर्षांपूर्वी उत्तरेकडील लॉरेशिया व दक्षिणेकडील गोंडवना अशा दोन तुकड्यांच्यामध्ये ‘टेथिस’ हा समुद्र तयार झाला. त्यावेळच्या गोंडवना या भूखंडात आजचा ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका व भारतीय द्वीपकल्प यांचा समावेश होता. म्हणजे त्याकाळी भारत हा दक्षिण ध्रुवाजवळ अंटार्क्टिका खंडाला जोडलेला होता. त्यामुळेच तेथील हिमनद्यांच्या घर्षणाच्या खुणा भारतातील खडकांवर आढळल्या. गोंडवनाचे पुढे विभाजन होऊन दक्षिण अमेरिका, आफ्रिका इ. खंड तयार झाले. यापैकी भारत व ऑस्ट्रेलिया ज्या भूखंड प्लेटवर होते, तिचे नाव ‘इंडोऑस्ट्रेलियन प्लेट’. पुढे भारतीय द्वीपकल्पही ऑस्ट्रेलियापासून वेगळे होऊन उत्तरेकडे सरकू लागले. आठ कोटी वर्षांपूर्वी ते आशियाच्या दक्षिणेस सहा हजार ४०० किलोमीटर अंतरावर होते आणि त्याचा उत्तरेकडे सरकण्याचा वेग दरवर्षी ९ ते १६ सेंटिमीटर एवढा होता. पाच ते चार कोटी वर्षांपूर्वी भारत उत्तरेकडील युरेशियन प्लेटला येऊन धडकला. यानंतर या दोन्ही प्लेट परस्परांना रेटा देऊ लागल्या. त्यामुळे भारताचा वर सरकण्याचा वेग दरवर्षी चार ते सहा सेंटिमीटर एवढा कमी झाला.

हेही वाचा >>> कलाकारण : लोकांपर्यंत पोहोचणारी दलित कला..

भारत व आशिया या दोन्हींच्या मध्ये टेथिस हा समुद्र होता. कोट्यवधी वर्षांपासून आजूबाजूच्या भूभागावरून वाहून आलेल्या गाळाचे थर त्याच्या तळाशी साचले होते. त्या थरांची जाडी सुमारे ५० हजार फूट झाली होती. त्यातील वरच्या थरांच्या वजनामुळे गाळाचे रूपांतर स्तरीत खडकात झाले होते. भारत व युरेशिया या दोन खंडांची टक्कर झाली. त्यात टेथिसच्या तळाशी असलेल्या त्या खडकांच्या थरावर दाब पडून त्याला घड्या (वळ्या) पडत गेल्या. त्यातून जो ‘वलीपर्वत’ किंवा ‘घडीचा पर्वत’ तयार झाला, तोच हिमालय होय. हिमालय निर्मितीची प्रक्रिया कोट्यवधी वर्षे सुरू होती व त्याची उंची वाढत होती. वातावरणात पाच हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर पाण्याचे रूपांतर बर्फात होते. त्यामुळे ज्या रांगा पाच हजार मीटरपेक्षा अधिक उंच झाल्या त्या हिमाच्छादित झाल्या. अशा प्रकारे हा पर्वत ‘हिमालय’ झाला.

हिमालय निर्मितीची ही प्रक्रिया एकदम नव्हे तर टप्प्याटप्प्याने झाली. ४० ते ५० लक्ष वर्षांपूर्वी हिमालयाला सध्याचे स्वरूप मिळून त्याच्या रांगा तयार झाल्या. या क्रमात शिवालिक टेकड्या या सर्वांत उशिरा तयार झाल्या. त्यानंतर उत्तरेला हिमालय व द्वीपकल्पाच्या तीन बाजूंना समुद्र अशी भूरचना तयार झाली. यातूनच भारतीय उपखंडाला सध्याचे भौगोलिक रूप व हवामान प्राप्त झाले. ही सर्व प्रक्रिया कोट्यवधी वर्षांपासून सुरू आहे. विशेष हे की भारतीय द्वीपकल्प उत्तरेकडे सरकत असताना व त्यापूर्वीही त्यावर वारंवार ज्वालामुखीचे उद्रेक होऊन लाव्हारसाचे थर साचत होते. त्यातून १० ते १२ कोटी वर्षांपूर्वी दख्खनचे पठार व सह्याद्री पर्वत तयार झाला. हे पठार, सह्याद्री व इतर पर्वत, नद्या इ.सह हे द्वीपकल्प उत्तरेकडे सरकत होते. ते आशिया खंडाला येऊन धडकल्यानंतर सुमारे दीड दोन कोटी वर्षांपूर्वी टेथिसचा तळ उचलला जाऊन हिमालयाची निर्मिती होऊ लागली. म्हणजेच सह्याद्री व इतर पर्वतांच्या तुलनेत हिमालय वयाने कमी आहे. यामुळे त्याला सर्वांत तरुण पर्वत असे म्हणतात.

हेही वाचा >>> बुकबातमी : ऑस्करमध्ये रोआल्ड डाल…

आशिया व भारत या दोन्ही प्लेट्स अजूनही एकमेकांना विरुद्ध दिशेने दाबत असल्याने हिमालय निर्मितीची प्रक्रिया आजही सुरूच आहे. अशा दोन क्रियाशील भूखंड प्लेट्सच्या सीमेवरील क्षेत्र सतत दाब व ताणाखाली असते. त्यामुळे अशी क्षेत्रे भूकंपप्रवण होतात. हिमालय हा प्लेट्सच्या सीमेवरच्या भूकंपप्रवण क्षेत्रात असल्याने तिथे वारंवार भूकंप होतात. तसेच तो गाळाच्या स्तरीत खडकांनी तयार झालेला असल्याने तो अतिशय ठिसूळ आहे. याचमुळे हिमालयात वारंवार भूस्खलनाचे प्रकार घडतात.

या भागात प्लेट्सचे घर्षण, दाब व निर्मिती प्रक्रिया अजूनही सुरूच असल्याने आजही एव्हरेस्ट शिखरांची उंची दरवर्षी सुमारे एक सेंटिमीटर गतीने वाढत आहे. त्याचा अर्थ असा की, एक दशलक्ष वर्षात त्याची उंची सुमारे हजार मीटरने वाढते. इथे हिमालयाची निर्मिती व प्राणिसृष्टीची उत्क्रांती याची तुलना मनोरंजक ठरेल. लॉरेशिया व गोंडवन यांच्यामध्ये टेथिस तयार होत होता, त्या वेळी पृथ्वीवर प्राणीसृष्टीच्या आगमनाची चाहूल लागत होती. सहा कोटी वर्षांपूर्वी भारताने उत्तर गोलार्धात प्रवेश केला, त्या वेळी पृथ्वीवरून डायनोसॉर नामशेष होत होते. टेथिसच्या तळाला घड्या पडून हिमालयाची जन्मप्रक्रिया सुरू झाली, तेव्हा मानवजातीचे पूर्वज पृथ्वीवर नांदत होते. हिमालयाची निर्मिती पूर्ण होऊन भारतीय उपखंडास सध्याचे भूरूप व हवामान निर्माण झाले, तेव्हा मानवजात नुकतीच पृथ्वीवर अवतरली होती.

‘ब्रिफ हिस्टरी ऑफ अर्थ’ या पुस्तकात अँर्ड्यू नॉल यांनी मॅक फी यांचे एक वाक्य दिले आहे.‘‘मला कधी एका वाक्यात पृथ्वीच्या गुंतागुंतीच्या इतिहासाचा सारांश सांगायचा असेल, तर ते वाक्य असेल- हिमालयाच्या शिखरावर सागरतळाचे चुनखडक आहेत!’’ समुद्रतळातून हिमालयाची निर्मिती होते ही गोष्ट तशी कल्पनातीतच. त्याच कालखंडात एका वानर जातीपासून मानवाची उत्पत्ती होत होती, हेही तेवढेच विलक्षण. भूतलावरचे सर्वोच्च शिखर आणि उत्क्रांतीच्या शिखरावर असणारा माणूस, या दोघांचीही निर्मिती एकाच वेळी होत होती हा केवढा योगायोग! म्हणजे भूगोलावरील महानाट्याचे दोन समांतर व अद्भुत शिखरअंक (क्लायमॅक्स) पृथ्वीवर एकाच वेळी सुरू होते.

‘भूगोलकोशा’चे लेखक आणि भूगोलाचे निवृत्त शिक्षक

lkkulkarni.nanded@gmail.com