scorecardresearch

सृष्टी-दृष्टी : पिकांची मूळ वसाहत

आताच्या पाळीव वानसांचे माणसाचा पाळीव सहवास उगवण्याआधीचे अलीकडचे पूर्वज मात्र धुंडाळता येतात.

सृष्टी-दृष्टी : पिकांची मूळ वसाहत

प्रदीप रावत

अन्नदायी वनस्पतींच्या रानटी पूर्वजांची वसती प्रामुख्याने उष्ण कटिबंधी आणि पर्वतराजीयुक्त भूभागांत एकवटली आहे. या भूभागांतील ऋतूंच्या वैविध्यपूर्ण ठेवणीमुळे अधिक जाती-प्रजातींना जगण्या-तगण्याचा अवसर मिळतो..

उत्क्रांतीच्या ओघात इतर जीवांप्रमाणेच वानसांची रूपेही बदलली. त्यांचा जीवनक्रम, त्यांच्या तगण्याच्या क्षमता आणि त्यांची दृश्य रूपे पालटत गेली. आधुनिक माणसाच्या उत्क्रांतीपूर्वीदेखील वानसे होतीच. माणसाच्या उत्क्रांतीनंतरची वानसांची घडामोड हा एक तुलनेने छोटा अलीकडील काळातील हिस्सा आहे. पण त्यातले आरंभीचे टप्पे अगदीच धूसर आहेत. आताच्या पाळीव वानसांचे माणसाचा पाळीव सहवास उगवण्याआधीचे अलीकडचे पूर्वज मात्र धुंडाळता येतात. माणसाच्या पाळीवपणाची सावली पडण्याअगोदरचे त्यांचे रूप हेच त्यांचे रानटी रूप! त्याच्या अगोदरचे रानटी अवतार उपलब्ध नाहीत. पृथ्वीवरील भूखंडाची हालचाल, त्या भूभागांत पडत गेलेली फूट, त्यातून अवतरलेली भूखंडाची जडणघडण या सगळय़ाचा वानसांच्या ठेवणीशी फार गाढ संबंध आहे. कुंभाराच्याही अगोदर ‘माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा’ हे वर्णन खरे तर वानसांचे आहे! पृथ्वीगोलाचा फुगीर वक्रपणा आणि तिचा कललेला आस यामुळे ऋतुचक्र घडते. त्या चक्राशी मिळतेजुळते होऊ शकणारे वानसजीव त्या त्या भूभागात तगतात, फोफावतात आणि बदलत जातात. याचा पडताळा आताच्या प्रचलित खाद्यवनस्पतींचे रानटी पूर्वजदेखील देतात.

या रानटी पूर्वजांचादेखील एकमेवाद्वितीय अवतार नसतो. आजघडीलासुद्धा आफ्रिका खंडातील भूभागात ज्वारी या पिकाचे ३००-४०० रानटी पूर्वज सहजी मिळतात. प्रचलित पीक वनस्पतींच्या रानटी रूपांचे टप्पे सापडल्याने ती वानसे कोणत्या शैलीने पालटली, त्यांची लक्षणे आणि गुणावगुण कोणते, कोणते गुण पाळीवपणाच्या ओघात विरळले, कोणते शिरजोर ठरले याचा छडा लागतो. बाह्य परिस्थितीचे दबाव आणि तगण्याच्या ओघात सर्वच जीव धडपडतात. काहींमध्ये सोयीस्कर लाभकारी उपटसुंभी बदल (म्युटेशन) घडतात. ते तगण्यात अधिक यशस्वी होतात. माणूस प्राण्याने हेच हेरले! असे हेरण्यात खर्ची पडलेले कालावधी फार मोठे होते. वानसांना बाह्य परिस्थितीनुसार स्वत:च्या वाढीचा जोम लवचीकपणे जुळवून घेण्याची अंगभूत रासायनिक क्षमता असते. ज्वारीचे काही प्रकार असा लवचीकपणा मोठय़ा ठाशीवपणे मिरवतात. पाऊस आणि मुळांच्या आवाक्यातल्या पाण्याचा अभाव झाला तर आपली अवघ्या शरीरभरची वाढ खुरटून धरण्याची क्षमता त्यांच्यात असते. अशा पाण्याच्या अवकाळात जणू काही ती वानसे स्वत:चे लघुरूप वा बोनसाय बनवितात! याउलट उदंड पाणी मिळाले तर उसापेक्षा उंच वाढणारी ज्वारीसुद्धा असते. अशा रानटी ज्वारीच्या प्रकारांमधील क्षमता आणि वैशिष्टय़े प्रचलित वाणात आणता येईल का? असा हा खटाटोप करणारे पैदासकार हे खरे शेतीचे शिल्पकार!

दुष्काळावर मात करायची तर वानसाचे असे बहुगुणी अवतार पाहिजेत. आणि त्यांची अधिक हमखास अधिक यशस्वी अशी पैदास करायला त्यांचे भिन्न ठेवणींचे रानटी पूर्वज कामी येतील! हा उत्क्रांतीचा धडा लक्षात घेणारा द्रष्टा वानसतज्ज्ञ आणि पैदासकार झाला. त्याचे नाव निकोलाय वाविलोव्ह रशियन क्रांतीपूर्वी (म्हणजे १९१८ ची. १९९१ची नव्हे!) झारच्या राजवट काळातच त्याने पिकांच्या रानटी पूर्वजांचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. खाद्य पिकांच्या रानटी पूर्वज प्रकारांचे बियाणे गोळा करायचा ध्यास घेतला. त्यासाठी त्याने अनेक खंडांतून प्रवास केला. सर्व प्रवासामध्ये जिवावर बेतणारे अडथळे होते. त्याची कहाणी स्वतंत्र चरित्रग्रंथांचा विषय ठरली. (जिज्ञासूंनी गैरी पॉल नबहान यांचे ‘व्हेअर आवर फूड कम्स फ्रॉम’ हे पुस्तक आणि पीटर िप्रगल यांचा ‘मर्डर ऑफ निकोलाय वाविलोव्ह’ हा चरित्रग्रंथ वाचावा.)

वाविलोव्हने  केलेल्या भ्रमणातून रानटी अवस्थेतील पिकांचे उगमस्थान म्हणावे असे आठ मोठे भूभाग आणि स्थळे आढळली. अर्थातच हे वाविलोव्हच्या संग्रह आणि निरीक्षणांतून उपजले आहेत. त्याने ज्या काळात हे संशोधन-भ्रमण केले तेव्हा अनेक भूभागांमध्ये बहुधा आजच्या तुलनेने रानटी रूप सांभाळलेल्या अधिक वनभूमी होत्या. अधिक विस्तृत आणि अधिक बारकाईने केलेले वर्गीकरण पत्करले तर या भूभागांचा नकाशा काहीसा बदलेल.

१. चीन केंद्र : प्रमुख पिकांपैकी तृणधान्ये बक व्हीट शेंगवर्गी वनस्पती सुमारे १३८ जाती

२. हिंदूस्तान केंद्र (पूर्ण उपखंड) : तांदूळ, ज्वारी-बाजरीवर्गी तृणधान्ये, डाळवर्गीय वनस्पती सुमारे ११७ जाती

२ अ. हिंदी मलयन केंद्र (इंडोनेशिया मलेशियासहित) : मुख्यत: कंदवर्गी (सुरण, आळूसारखी) अनेक फलप्रकार, ऊस, मसाले, पिके सुमारे ५५ जाती

३. आशिया अंतर्भाग (ताजिकिस्तान उझबेकिस्तान) : गहू, नाचणी, द्विदल वेल, झुडूप, बीजपेर मुळाकार पिके, फळे इत्यादी सुमारे ४२ जाती

४. आशिया मायनर (ट्रान्स कॉकेशिया इराण तुर्कमेनिस्तान) : गहू प्रकार, नाचणी, ओट्स, फळे, अन्य चारापिके इ. सुमारे ८३ जाती

५. मध्यपूर्व केंद्र : गहू, बार्ली, भाज्या, फळे, सुगंधी पिके, तेलवर्गी पिके, मसाला वर्गी पिके, ८४ जाती

६. अबिसिनिआ (इथिओपिआ) : अन्य प्रांतातून उगम पावलेले बिगर-प्रमुख धान्य प्रकार, गहू व बार्ली प्रकार, स्थानिक धान्ये, फळे, तंतुवर्गी वनस्पती, ३८ जाती

७. दक्षिण मेक्सिको आणि मध्य अमेरिका : सर्वात मुख्य मका जाती व त्यांचे प्रकार, द्विदल आणि कर्कटी/भोपळावर्गी वानसे, मसाला पिके, फळे, तंतुवर्गी वनस्पती इ. ४९ जाती

८. दक्षिण अमेरिका अँडिज पर्वत विभाग (बोलिविआ पेरू इक्वेडोर) : मुख्यत: बटाटा आणि अन्य मूळवर्गी पिके, अँंडिज पर्वतामधील तृणधान्ये, फळे आणि औषधीवर्गी तंबाखू, कोकेन, क्विनिन इ. सुमारे ४५ जाती

८ अ. चिली विभाग : तुलनेने छोटा विभाग मुख्यत: अँडिज पर्वत विभागातील बटाटय़ांचे रताळय़ांचे प्रकार

८ ब. ब्राझील पॅराग्वे परिसर : इतर मध्य अमेरिका अँडिजच्या मानाने छोटा परंतु विशेषत्वाने कोको, भुईमूग, मानिओत् (एक सुरण प्रकार), अननस या पिकांचा अधिवास

आपण आज उपभोगत असलेल्या अन्नाचा इतिहास जाणून घेताना आधी ही यादी पाहावी! अन्नदायी वनस्पतींच्या रानटी पूर्वजांची वसती कुठे अधिक दाटलेली दिसते? तर त्यामध्ये मकर आणि कर्कवृत्तांतील उष्ण कटिबंधी आणि पर्वतराजीयुक्त भूभाग यांचा वाटा मोठा आहे. या भागांमध्ये वर्षभरात निरनिराळय़ा ऋतूंच्या कालावधीत पाणी, दमट कोरडेपणाच्या छटा, तापमान, दिवसभरातला सूर्यप्रकाशाचा अवधी यांच्या निरनिराळय़ा ठेवणींमुळे अधिक जाती प्रजातींना जगण्या-तगण्याचा अवसर मिळतो. खेरीज तेथील जमिनींचा मगदूर अधिक पोषक आहे. पण पाळीवपणाची दुसरी पाख मनुष्य आणि प्राणीसृष्टीची! ती पाखाडी जेथे जशी कमी-जास्त उलगडली तसतशी भावी प्रचलित आणि संभाव्य वानसांची शक्यता बळावली. त्यांचा प्रचार बहरला. तुलनेने विविधतेने बहरणाऱ्या या भागांमध्ये पाणी, वारा, पक्षी, प्राणी आणि ‘भटका व्याप आणि व्यापार’ असणारा माणूस यामुळे अचल वानसांचेही स्थलांतर बळावले. ही प्रक्रिया अलीकडच्या काळात आणि आजही सुरूच आहे!

सध्या उपवासासकट रोजच्या कित्येक खाद्यजिन्नसांत हजर असलेला आणि जेवणाच्या पंगतीमध्ये उदबत्ती टोचून मिरवणारा बटाटा फक्त ५०० वर्षांपूर्वी भारतात अवतरला! आज आपल्या नजरेला पडते ती अन्नाची ठेवण या वेगवेगळय़ा उत्क्रांतीक्रमांचे फलित आहे. स्थलांतर झाल्यावरदेखील नैसर्गिक उपटसुंभी बदल (म्युटेशन) आणि पाळीव उलाढाल या जोडगोळीमुळे वानसांचे नवे प्रकार संख्येने आणखी वाढत राहिले. तांदूळ नावाच्या भल्यामोठय़ा प्रजाती- जाती दालनात हिंदी, आफ्रिकी, चिनी आणि जपानी अशा चार मोठय़ा उपशाखा आहेत. त्या प्रत्येक शाखेला फुटलेल्या उपशाखांचे धुमारे म्हणून आपण तांदळाच्या अनेक प्रकारांची चैन उपभोगतो! हे सर्व घडून गेले त्यालाही चार हजार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीच्या चरकसंहितेमध्ये वर्षांकालीन ‘शाली’ ऊर्फ ‘साळी’ आणि शरदोत्तर काळातल्या ‘व्रीही’ अशा दोन मोठय़ा वर्गातल्या अनेक प्रकारांची नोंद आहे.

अलीकडच्या काळात जनुके न्याहाळण्याची, चोखाळण्याची किंवा त्यांना विलग करून अन्य वानसात बेमालूम मिसळण्याची कला उपलब्ध आहे. त्यामुळे नव्या किंवा अनोख्या गुणधर्माचा प्रकार आढळला तर त्या लक्षणांचा जनुक समूह हेरणे आणि त्यांचा मिलाफ संलग्न प्रकारांबरोबर करण्याची शक्यता अधिक सुदृढ झाली आहे. त्यातून अन्नस्रोत अनेक पटींनी वाढण्याच्या शक्यता क्षितिजावर उगवत आहेत. नवे तंत्रज्ञान नवे प्रश्न, उत्क्रांतीच्या नव्या पायवाटा हे चक्र धिमेपणाने अव्याहत चालत आले आहे, त्यातल्या काही तिढय़ांबद्दल पुढच्या वेळी!

लेखक माजी खासदार आणि ‘‘रावत’स नेचर अ‍ॅकॅडमीचे संस्थापक आहेत.

pradiprawat55@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 04:14 IST

संबंधित बातम्या