‘भरधाव आलिशान मोटारीच्या धडकेत मोटरसायकलवरून निघालेले दोघे जण ठार’ ही बातमी परवा कळल्यापासून पुणेकर अस्वस्थ आहेत. एक अल्पवयीन मुलगा वडलांची अजूनही नोंदणी न झालेली आलिशान मोटार घेऊन ‘पार्टी’ करायला बाहेर पडतो काय, ‘पार्टी’ झाल्यावर १६० किलोमीटर प्रतितास वेगाने गाडी चालवतो काय, वेगामुळे नियंत्रण सुटून रस्त्यावरून चाललेल्या दुचाकीला उडवतो काय आणि त्या धडकेने दुचाकीवरील दोघे जण हवेत फेकले जाऊन मग जमिनीवर जोरात आपटल्याने मृत्युमुखी पडतात काय! सुन्न करणारा हा प्रकार ज्या कल्याणीनगर, कोरेगाव पार्क परिसरात झाला, तेथे अनेक पब, रेस्टॉरंट आहेत. विशेषत: शनिवारी रात्री तेथे तरुणाईची अलोट गर्दी असते. ही ‘पार्टी’प्रेमी तरुणाई ‘पार्टी’ करून बाहेर पडल्यानंतर मात्र अनेकदा इतकी बेधुंद होते, की आपल्यामुळे आजूबाजूच्यांना त्रास होत असेल वगैरे जाणवण्याइतपत ते भानावरच नसतात. ज्या तरुण लोकसंख्येच्या लाभांशाची ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ वगैरे म्हणून आपण चर्चा करतो, त्या पिढीचे हे सुटलेले भान रस्तोरस्ती आपल्या बेमुर्वतखोर वर्तनाने उच्छाद मांडते आहे.

कल्याणीनगरमध्ये घडलेला प्रकार यातीलच. यातील आरोपींना शिक्षा देण्याचे काम न्यायव्यवस्थेचे आणि त्यांना योग्य शिक्षा मिळेल, यासाठी योग्य पद्धतीने तपास करण्याचे काम पोलिसांचे आहे. मात्र, यानिमित्ताने एकूणच व्यवस्थेसमोर जे प्रश्न उभे ठाकले आहेत, त्यांची चर्चा करणे नितांत गरजेचे आहे. जेथे अपघात झाला, त्या परिसरातील रहिवासी, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आदींनी आंदोलने केली, मागण्या केल्या आणि अनेक प्रश्नही उपस्थित केले. त्यांची तड लावताना आपल्याला आणखी एका व्यापक प्रश्नाचे उत्तर शोधावे लागणार आहे, तो म्हणजे नियोजनबद्ध विस्ताराऐवजी सुजल्यासारखी वाढणारी शहरे खरेच व्यवस्थेच्या नियंत्रणात राहिली आहेत का? उदाहरणादाखल व्यवस्थेच्या नियंत्रणाचा या घटनेच्या अंगाने विचार करायचा, तर पुणे शहरात एकूण किती पब आहेत, हे कोणत्याच संबंधित यंत्रणेला माहीत नाही, अशी आजची स्थिती आहे. असे असेल, तर तेथे अल्पवयीनांना मद्या मिळणार नाही, ती दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ सुरू राहणार नाहीत, तेथे अवैध धंदे चालणार नाहीत आदी अपेक्षा व्यवस्थेकडून सामान्य माणूस करू शकेल का? बरे, त्यातून अपघातासारखी स्थिती उद्भवली, तर अपघात करणारा कुणा तरी बड्या बापाचा बेटा आहे, म्हणून त्याला व्यवस्थेकडूनच नियमांतील शक्य तेवढ्या पळवाटा शोधून दिले जाणारे ‘संरक्षण’ आणि बळी गेलेल्या सामान्यांकडे मात्र दुर्लक्ष, हेच वाट्याला येणार का? नियोजनबद्ध विस्तारात सामाजिक अनारोग्यावर उपाय तरी शोधता येतात, सूज असेल, तर मात्र ती ठुसठुसतच राहते. अशा सामाजिक अनारोग्यावर मोठी शस्त्रक्रियाच करावी लागते. पुण्यासारख्या शहरात सामाजिक संघटना आणि नागरिकांचा दबावगट अद्याप कार्यरत आहे म्हणून व्यवस्थेला त्याची दखल तरी घ्यावी लागते, हे त्यातल्या त्यात सुदृढ लक्षण. अर्थात, ही सुदृढता अधोरेखित करताना ती व्यापक असावी, अशी अपेक्षाही गैरलागू नाही. म्हणूनच, या घटनेच्या निमित्ताने एकदा समाज म्हणून आपल्या वर्तनाचेही अवलोकन करणे गरजेचे आहे.

kalyan shilphata road marathi news
मेट्रोच्या कामांमुळे शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहने पर्यायी रस्त्यावरून वळविण्याच्या हालचाली
Mumbai, Fraud,
मुंबई : बँकेच्या व्यवस्थापकाची फसवणूक
Ghodbunder Ghat Road, Ghodbunder Ghat Road Repairs, Ghodbunder Ghat Road Repairs to Conclude 7th June Evening, heavy traffic on ghodbunder road, thane news, ghodbunder road news,
घोडबंदर मार्गवर आज सायंकाळपासून कोंडीमुक्ती, घाट रस्त्याचे काम पूर्ण होणार
pune porsche crash case man arrested for delivering money to doctor in Sassoon hospital
कल्याणीनगर अपघात प्रकरण : ससूनमधील डॉक्टरला पैसे पोहोचविणारे अटकेत, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण
passengers huge rush in local train and in railway stations due to central railway mega block
आधी गर्दी स्थानकात, नंतर रस्त्यावर!; ब्लॉकमुळे अनेक आस्थापनांकडून कार्यालयांच्या वेळेत बदल; प्रवाशांच्या अडचणीत भर
Mahindra XUV 3X0
आनंद महिंद्राच्या ‘या’ नव्या स्वस्त SUV ने बाजारात उडविली खळबळ; २४ तासात १,५०० लोकांच्या घरी पोहोचली, किंमत…
Aarey to BKC Metro 3 will start soon MMRC trials to be completed within week
आरे ते बीकेसी मेट्रो ३ दृष्टीक्षेपात, आठवड्याभरात एमएमआरसीच्या चाचण्या होणार पूर्ण
Booze party in flamingo habitat When did beat marshals patrol
फ्लेमिंगो अधिवासात मद्य मेजवान्या? बीट मार्शलची गस्त व्यवस्था कधी?

घडलेल्या अपघाताची आणि मोडलेल्या नियमांची चर्चा करताना, सामान्यजनही आपापल्या पातळीवर नियमांची किती पायमल्ली करत असतात आणि नियम मोडण्याचे हे सार्वत्रिक आकर्षण कोठून येते, हेही पाहिले पाहिजे. बेदरकारपणे वाहने चालवणे किमान पुण्यात तरी आता सर्रास झाले आहे. सिग्नल मोडणे, दुचाकीवरून तिघातिघांनी प्रवास करणे, हेल्मेट न वापरणे आणि त्याचे समर्थन करणे, ‘नो एंट्री’तून येणे, ‘राँग साइड’ने जाणे, नियम पाळणाऱ्यांवरच अरेरावी करणे हे समाजाच्या अनारोग्याचेच लक्षण असते. ही नोंद महत्त्वाची अशासाठी, की समाजमाध्यमांतून या घटनेबद्दल रोष व्यक्त होताना, ‘पुण्याची संस्कृती रसातळाला जाते आहे,’ अशी ओरड होत आहे. काही जणांसाठी ती सोयीची असली, तरी शहरात नियमपालनाची संस्कृतीही महत्त्वाची आहे, मग ती पब किती वेळ चालू ठेवायचे, याबद्दल असो वा वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत. शहराची वाढ होत असताना, त्यात अनेकविध प्रकारची लोकसंख्या सामावून घेतली जात असताना, पूर्वीच्या एका विशिष्टच संस्कृतीचा आग्रह धरत बसणे अव्यवहार्य. शहर विस्ताराच्या प्रक्रियेमध्ये केवळ इमारती वाढून चालत नाहीत, तर सांस्कृतिक घुसळण आणि नंतर त्या मंथनातून नवोन्मेषाच्या शक्यता असाच प्रवास व्हावा लागतो. शहराच्या गरजा वाढतात, तसे त्या भागवणाऱ्या सेवांचाही विस्तार होणार. त्यांना घातलेल्या नियमांचे कुंपणच व्यवस्था खात नाहीत ना आणि त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपलाही सहभाग नाही ना, याची पडताळणी करत राहणे महत्त्वाचे.