इस्रायली हद्दीतील काही भागांत ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या नृशंस हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इस्रायलने गाझा पट्टीभर सुरू ठेवलेली कारवाई मानवतेच्या परिसीमा ओलांडणारी ठरत आहे. या कारवाईबद्दल एकीकडे आंतरराष्ट्रीय न्यायालये इस्रायलवर नरसंहाराचा ठपका ठेवू लागली आहेत. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय मदत आणि पुनर्वसन संघटनांनी अन्नधान्याच्या तुटपुंज्या आणि विलंबाने होणाऱ्या पुरवठय़ापायी गाझा पट्टीत भूकबळींची समस्या उग्र बनत चालल्याचा इशारा दिला आहे. स्वसंरक्षणाचा आणि प्रतिसादात्मक हल्ल्याचा इस्रायलचा हक्क कोणी नाकारू शकत नाही. पण हमासला संपवण्याच्या नादात इस्रायली सरकार आणि सैन्य पॅलेस्टिनींचा संहार घडवत आहे ही बाब कोणत्याही नैतिक वा कायदेशीर चौकटीत मान्य होण्याजोगी नाही. आता तर राफा या गाझा पट्टीतील जवळपास शेवटच्या मोठय़ा शहरावरही लष्करी कारवाई करण्याचा निर्धार इस्रायलने व्यक्त केला आहे. तसे झाल्यास आणखी मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता दिसते. या सगळय़ा घटनांचे पडसाद गेल्या काही दिवसांत अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये उमटू लागले आहेत. या विद्यापीठांतील शेकडो विद्यार्थी इस्रायलच्या दमनशाहीविरोधात आणि पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ विद्यापीठाच्या आवारांत तसेच रस्त्यावर उतरले. त्यातील अनेकांना अटक झाली, काही ठिकाणी लाठीमार झाला. काही विद्यापीठांत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ प्राध्यापक मंडळीही निदर्शनांत उतरली. ही निदर्शने अद्याप थंड झालेली नाहीत. उलट  काही ठिकाणी पोलीस धाडल्याबद्दल विद्यापीठ व्यवस्थापनाविरोधात संताप समाजमाध्यमांतूनही व्यक्त होऊ लागलेला दिसतो.

कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, जॉर्जिया, टेक्सास, कोलोरॅडो, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, इंडियाना, मॅसॅच्युसेट्स, मिशिगन, मेन अशा अनेक राज्यांमध्ये दिसून आलेल्या या निदर्शनांची व्याप्ती मोठी आहे. कोलंबिया, प्रिन्स्टन, सदर्न कॅलिफोर्निया, ओहायो स्टेट, येल, टेक्सास युनिव्हर्सिटी अशा अनेक मोठय़ा विद्यापीठांमध्ये निदर्शने सुरू आहेत. त्यांना ‘प्रो-पॅलेस्टिनी’ असे सरसकट संबोधले जात असले, तरी ती थोडी शाब्दिक चतुराई ठरते. सगळेच काही पॅलेस्टाइन समर्थक आहेत अशातला भाग नाही. यांतील अनेकांना इस्रायल-पॅलेस्टाइन या भू-राजकीय वादाशी देणेघेणे नाही. पण इस्रायली हल्ल्यांमध्ये जखमी वा ठार होणारे पॅलेस्टिनी नागरिक व विशेषत: लहान मुले, लाखोंनी बेघर आणि बेरोजगार झालेले पॅलेस्टिनी युवक, रोजच्या अन्नासाठी प्राण पणाला लावावे लागणारे गाझातील म्हातारे-कोतारे, अपत्यांची कलेवरे पोटाशी कवटाळून उद्विग्न, हताश बसलेले पॅलेस्टिनी पालक पाहून त्यांची मने द्रवतात आणि संतप्तही होतात. अशी संवेदनशीलता जगात कोणत्याही विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतेच. पण ती इतक्या मोठय़ा प्रमाणात व्यक्त होण्यासाठी आवश्यक स्वातंत्र्य आणि पैस अमेरिकी विद्यापीठांमध्ये आजही उपलब्ध होते, हे महत्त्वाचे. खरे तर अनेक बडय़ा अमेरिकी विद्यापीठांची व्यवस्थापने आणि चालक-मालक यहुदी किंवा इस्रायलधार्जिणे आहेत. या विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना इस्रायलची दमनशाही आणि अमेरिकेचा अशा इस्रायलला आजही मिळत असलेला पाठिंबा मंजूर नाही. या आंदोलनांना काही ठिकाणी अँटी-सेमायटिक किंवा यहुदीविरोधी वळण मिळाले आहे किंवा तसे भासवले जात आहे. कोलंबिया विद्यापीठात सहभागी निदर्शकांपैकी अँटी-सेमायटिक ‘घुसखोरां’ना हाकलून देण्यात आले. अँटि-सेमायटिक, प्रो-पॅलिस्टिनी असा कोणताही ‘रंग’ या निदर्शनांमध्ये मिसळणे बहुसंख्य निदर्शकांना मंजूर नाही. ही या आंदोलनांची खरी ताकद ठरते. आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अमेरिकी नागरिक असलेलेही आहेत. तेव्हा ‘बाहेरून आलेल्यांनी इथल्या विद्यापीठांचा लाभ घेताना गडबड करण्याचे काम नाही’ वगैरे गर्जनाही फार परिणामकारक ठरत नाही.

Disbanded Israel War Cabinet The decision follows MP Benny Gantz exit from the government
इस्रायलचे युद्ध मंत्रिमंडळ बरखास्त; खासदार बेनी गँट्झ सरकारमधून बाहेर पडल्यानंतर निर्णय
Suspected terrorist killed in Russian prison operation by security forces
रशियाच्या तुरुंगात ओलीसनाट्य; सुरक्षा दलांच्या कारवाईत संशयित दहशतवादी ठार
hezbollah fires 200 rockets at Israel after senior commander killed
हेजबोलाचे इस्रायलवर रॉकेट हल्ले; युद्धविरामाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्यानंतरही प्रादेशिक तणाव वाढण्याची भीती
reasi terror attack combing operation underway
चौकशीसाठी २० जण ताब्यात; रियासी हल्ल्यातील दहशतवाद्यांचा तपास अजूनही सुरू
274 Palestinians killed in Israeli attack
इस्रायलच्या हल्ल्यात २७४ पॅलेस्टिनी ठार; हमासच्या ताब्यातील ४ ओलिसांची सुटका करण्यात यश
memory chip Intel logic chip Pat Gelsin Andy Grove
चिप-चरित्र: धाडसी निर्णयाची फलश्रुती
Israel attacks school in Gaza
गाझातील शाळेवर इस्रायलचा हल्ला, ३३ जण ठार
Prajwal revanna diplomatic passport
प्रज्ज्वल रेवण्णा डिप्लोमॅटिक पासपोर्टच्या बळावर देशातून फरार; हा पासपोर्ट कोणाला मिळतो?

ही आंदोलने अमेरिकेच्या राजकारणात दूरगामी राजकीय परिणाम करणारी ठरू शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन इस्रायलला मदत जाहीर करताना, त्यातला काही भाग गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींसाठीही कबूल करून घेतात. अनेक वेळा इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहूंना सौम्य ताकीद देतात. याचे प्रमुख कारण म्हणजे, आंदोलने सुरू होण्यापूर्वीच विशेषत: मुस्लीमधर्मीय डेमोक्रॅटिक समर्थकांकडून बायडेन यांच्याकडे इस्रायलविषयीची नाराजी पोहोचलेली आहे.

हे सगळे तेथे घडत असताना, ‘आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत’, असे आपले सरकार येथून सांगते. त्याची गरज नाही. ‘विद्यापीठातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्या’ची संस्कृती तेथे नाही. तेवढा बोध आपण येथे घेतला तरी पुरेसे आहे!