अतुल सुलाखे

गांधीजी आणि विनोबांची दोन प्रकाशचित्रे लक्ष वेधून घेतात. फोनवर कुणाशी तरी बोलणारे गांधीजी आणि टाइपरायटरवर लेखन करणारे विनोबा. गांधीजींच्या हातात एखादे यंत्र आहे, हे पाहून आपण चकित होत नाही, मात्र विनोबांच्या समोर टाइपरायटर पाहून थोडा प्रश्न पडतो. कंदील आणि विनोबा हे चित्र समजून घेता येते, मात्र विनोबा आणि टाइपरायटर?

विनोबांना असंख्य लोक भेटत असत. यात टाइपरायटर कंपनीचे प्रतिनिधीही भेटल्याचा संदर्भ आढळतो. कंपनी बहुतेक रेमिंग्टन असावी आणि विनोबा हे यंत्र वापरत असावेत. त्या प्रतिनिधींनी कंपनीच्या या यंत्रात कोणते बदल सुचवाल, असे विनोबांना विचारले. ‘लिहिताना ज्या बोटाचा अधिक वापर होतो त्यानुसार यंत्राची रचना करा,’ असे विनोबांनी त्यांना सांगितले.

शिवणी जेलमध्ये असताना विनोबांनी नवीन लिपीची निर्मिती केली. तिचे नाव होते ‘लोकनागरी’. ही लिपी असणारा की-बोर्ड विनोबांनी तयार करून घेतला. ते तो टाइपरायटर वापरत. गांधीजी असोत वा विनोबा, या माणसांचे विचार कधी साचले नाहीत. काळानुरूप ते बदलत गेले. यानंतरही त्यांना तंत्रज्ञानाचे विरोधक म्हणायचे असेल तर ते अयोग्य ठरेल. स्वतंत्र भारतात व्यापक पातळीवर तंत्रज्ञानाचा कसा स्वीकार व्हावा याबाबत विनोबांच्या विचारांत कमालीची स्पष्टता दिसते.

यंत्रांना केव्हा विरोध करायचा आणि त्यांचा केव्हा स्वीकार करायचा याला विनोबा ‘यंत्र-विवेक’ म्हणतात. यंत्र आणि विज्ञान यातील फरक स्पष्ट केल्यावर ते म्हणतात, ‘यंत्र वेगळे आणि विज्ञान वेगळे. विज्ञानाचे तर सदैव स्वागतच आहे. परंतु यंत्राच्या बाबतीत विवेक आवश्यक आहे.’

ते पुढे लिहितात, ‘यंत्रे तीन प्रकारची असतात- संहारक यंत्रे, समयसाधक यंत्रे आणि उत्पादक यंत्रे. संहारक यंत्रे म्हणजे मशीनगन्स, तोफा इत्यादी. अशा संहारक यंत्रांना सर्वोदयात मुळीच स्थान नाही. त्यांना सर्वथा विरोधच आहे. समयसाधक यंत्रे म्हणजे मोटर, रेल्वे, विमान, इत्यादी. ही यंत्रे आम्हाला मान्य आहेत. त्यांना विरोध नाही.’ विनोबांची ही भूमिका स्पष्ट आणि अत्यंत महत्त्वाची आहे.

यंत्रांचे प्रकार सांगताना विनोबांनी उत्पादक यंत्रांचेही भेद नोंदवले आहेत. ‘एक प्रकार म्हणजे श्रमाची पूर्ती करणारी यंत्रे. हाताने जी कामे आपण करू शकत नाही, ती करण्यासाठी ज्यांची मदत होते त्यांना पूरक यंत्रे म्हणता येईल. हाताने सूत कातता येत नाही टकळी, चरखा यांच्या मदतीने कातता येते. अशा पूरक यंत्रांचे आम्ही स्वागतच करतो.

मात्र काही यंत्रे जास्त उत्पादन करतात व मजुरांची जागा घेतात. अशी उत्पादक यंत्रे मारक आहेत. त्यांना सर्वोदयात स्थान असू शकत नाही.

कोणते यंत्र पूरक आहे आणि कोणते यंत्र मारक आहे याचा निर्णय देश- काल- परिस्थितीनुसार बदलेल. आजचे मारक यंत्र उद्या पूरक यंत्र ठरू शकेल, असे त्यांचे म्हणणे होते. (संदर्भ- साम्यवाद की साम्ययोग? )

सर्वोदयाच्या या भूमिकेवर मतभेद असणार. म्हणूनच विनोबांची भूमिकाही कसाला लागणार. तिच्यावर टीका झाली आहे आणि होत राहील. तथापि हा दृष्टिकोन एकांगी, असा आरोप करणे फार अयोग्य होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

jayjagat24@gmail.com