डॉ. उज्ज्वला दळवी

मधुमेह, दमा, रक्तदाब यांसारखे आजार डॉक्टरी सल्ला आणि रुग्णाचा सकारात्मक प्रतिसाद यांतूनच आटोक्यात ठेवता येतात..

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

‘‘पाच वर्षांपूर्वी मला मधुमेह झाला होता. तेव्हा दोन महिने औषध घेऊन तो बरा झाला. आता डोळय़ात कचरा गेलाय. घालायला थेंब द्या,’’ आप्पासाहेबांनी डॉक्टरांना ठणकावून सांगितलं. त्यांच्या रक्तातल्या साखरेने डबल सेंच्युरी मारली होती! नेत्रपटलाला सूज होती. आप्पांनी कस्पटासमान लेखलेल्या मधुमेहाने इंगा दाखवला होता.  

फ्लूचा ताप, साधं गळू, डोळय़ात गेलेला कचरा हे चार दिवसांचे पाहुणे असतात. डॉक्टर सांगतील त्या औषधांनी त्यांचा आठवडाभर पाहुणचार केला की ते विनापरतीच्या मार्गाने निघून जातात. पण मधुमेह, वाढलेला रक्तदाब, हृदयविकार वगैरेंसारखा आजार जन्मभर वळचणीला राहायच्या इराद्याने आलेला नाठाळ वळू असतो. तो कुठल्याही उपायाने तिथून निघत नाही. त्याची उसाभर जन्मभर चालू ठेवावी लागते.

त्याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं बरोबरच आहे. वेळोवेळी डोळे, किडनी, हृदय वगैरेंचा तपासही व्हायलाच हवा.  पण डॉक्टर फारतर दोनतीन महिन्यातून एकदा भेटतील. गळेपडू आजार-वळू रात्रंदिवस सोबत राहातो. त्याला वठणीवर आणायला घडोघडी वेगवेगळे निर्णय झटपट घ्यावे लागतात. त्या प्रत्येक निर्णयासाठी डॉक्टरांची वाट बघणं शक्य नाही. पण निर्णय योग्यच असायला हवा. म्हणून दमा, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार वगैरे आजारांमध्ये डॉक्टरांनी मास्तर म्हणूनही काम करणं, पेशंटांना त्यांच्या आजाराची माहिती देणं आणि रोजचे चढ-उतार आपल्या आपण सांभाळायला शिकवणं अत्यंत गरजेचं असतं.  

पण इतकं समजावायला डॉक्टरांना वेळ कुठे असतो? मग खात्रीलायक माहिती कुठून मिळवायची? व्हॉट्स अ‍ॅपवर तर खोटय़ानाटय़ाला ऊत येतो!

अधिकृत व्याख्यानां-पुस्तकांतून, परिसंवादांतून तशी खात्रीलायक माहिती मिळते. काही डॉक्टर तशी माहिती देणारी शिबिरं घेतात. तीन-चार दिवस पेशंटसोबत राहून मार्गदर्शन करतात. आकृत्या-चित्रं असलेली छापील माहितीपत्रकंही वाटतात. पण मार्गदर्शनाची गरज तर सततच असते. त्याच्यासाठी पर्याय शोधणं चालू आहे.

मुंबईच्या एका नामांकित डॉक्टरांनी तशा पेशंटशी बोलण्यासाठीच दीपक नावाचा एक डॉक्टर-मदतनीस ठेवला. चालूच राहणाऱ्या, बऱ्या न होणाऱ्या आजाराचं निदान ऐकून पेशंट हवालदिल होई. काही जण निराश होत. तर काही जण डॉक्टरांविरुद्ध बंड करून उठत. ‘एकदा त्या गोळय़ा सुरू केल्या की ते जोखड जन्मभर मानेवर बसतं! म्हणून मी त्या सुरूच नाही करणार!’ असाही हट्ट असे. म्हणून ते निदान सांगताना दीपक पुन्हापुन्हा सविस्तर बोलून त्यांच्या भीतीचं, कुशंकांचं निरसन करी. ते स्वीकारायला त्यांना पुरेसा अवधी देई. माहिती, जाण आणि स्वीकार हे टप्पे पार झाले की मगच तो त्यांना त्या आजाराची आणि उपचारांची माहिती सांगे. भविष्यातल्या अटळ दुष्परिणामांचीही पूर्वसूचना देई. मूळ आजारच कायम चालू राहणार असल्यामुळे त्याच्यावरचे उपचारही चालू ठेवणं आवश्यक असतं. त्यात त्या उपचारांचा दोष नसतो हेही सांगे.

त्या माहितीत कठीण काहीच नसतं. आजाराची लक्षणं, त्यांच्यामागची कारणं आणि त्यांच्यावरच्या औषधांचं कामकाज सोपं करून सांगायचं असतं. आजार बळावल्याची चिन्हं आणि त्याच्यावर आपल्याआपण ताबडतोब करण्याजोगे उपाय समजायला आणि समजवायला कठीण नसतात. पेशंटना  समजवायचं काम करायला डॉक्टर-मदतनीसांना, शिवाय कंपाऊंडर वगैरेंनाही काही ठरावीक आजारांपुरतं तसं शिकवून तयार करता येईल. शिकाऊ डॉक्टरांनी, नर्सेसनी वरिष्ठांच्या देखरेखीखाली ते काम केलं  तर त्यांचा अभ्यासही चांगला होईल आणि पेशंटनाही फायदा होईल.

अमेरिकेच्या ‘व्हेटेरन्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ने केलेल्या अभ्यासावरून आणि स्कॉटलंडमधल्या एका संशोधनावरून नवी गोष्ट ध्यानात आली. डॉक्टर-मदतनीस, शिकाऊ डॉक्टर आणि नर्सेस मोठय़ा डॉक्टरांपेक्षा अधिक वेळ देऊन, बोजड शब्द न वापरता, सोप्या भाषेत, विस्ताराने माहिती सांगतात. त्यांनी आजार समजावला की पेशंटनाही दडपण नसतं, ते मोकळेपणाने अधिक प्रश्न विचारतात आणि त्यांना माहिती अधिक चांगली समजते. आजार अधिक कह्यात राहातो.

दमा, मधुमेह, रक्तदाब यांच्यासारखा आजार प्रत्येकाचा वेगळा असतो, वेगळा वागतो. तो ज्याचा त्यालाच समजू शकतो. त्याचा अंदाज सतत घेत राहावं लागतं. तो कशाने बिथरतो, किती िधगाणा घालू शकतो, काय केल्याने शांत होतो हे पेशंटच जाणतो. भोवतालची परिस्थिती बदलली तर आजारावर तिचा काय परिणाम होईल, आपल्याच चुकांमुळे, कुपथ्यामुळे काय बिनसलं ते जाणणं, त्यासाठी आपल्या आहार-व्यायाम-दिनचर्येत गरजेचे फेरफार करणं हे सारं पेशंटनेच, वेळच्यावेळी जमवायला हवं. इन्सुलिन, दम्याचे फवारे वगैरे औषधांची मात्रा गरजेप्रमाणे आपल्याआपण कमीजास्त करणं त्याला जमायला हवं. पेशंटची जीवनशैलीच आजाराला अनुसरून बदलायला हवी. काही पेशंट मात्र आजार जाणून घ्यायला, त्यांच्याबद्दलचे निर्णय घ्यायला निरुत्साही असतात. 

रोज रक्तदाब मोजायला मुलाने आणून दिलेलं यंत्र जनाक्कांनी कपाटात जपून ठेवलं. ‘मुलाला त्रास नको,’ म्हणून औषधं संपल्याचं आठवडाभर सांगितलंच नाही. ‘पायांना सूज येते,’ म्हणून एक गोळी आपल्याआपणच बंद केली. रक्तदाब वाढला. त्याच्याशी झुंजून हृदय थकलं (cardiac failure) रात्री लागणारी धाप त्या थकल्या हृदयाची कैफियत होती. जनाक्कांनी ती चुपचाप सोसली. डॉक्टर तीन महिन्यांनी बघणार होते. पण बेजबाबदारपणामुळे अक्कांना आधीच हॉस्पिटलवारी घडली. 

दीर्घकालीन आजारांचे इलाज ही डॉक्टर आणि पेशंट या दोघांचीही जबाबदारी असते.

आजार कह्यात ठेवणं महत्त्वाचं आहेच. पण त्याखेरीज चारचौघांसारखं जगणं, इतर क्षेत्रांतलं हवं तसं यश मिळवणं हेही पेशंटला जमायला हवं. तसं जमलं तरच तो अधिक हिरिरीने आजाराची काळजी घेईल.

पारुपल्ली कश्यप लहानपणी श्वसनाच्या त्रासाशी झुंजत बॅडिमटन खेळत राहिला. २००४साली, वयाच्या अठराव्या वर्षी त्याच्या दम्याचं योग्य निदान झालं. त्याला डॉक्टरांनी औषध-फवाऱ्यांचा वापर शिकवला. त्यानंतर त्या फवाऱ्यांची संख्या आणि ते घ्यायची वेळ आपल्या गरजेशी आपणच जुळवून घेत कश्यपने दमा आटोक्यात आणला. धावल्यानंतरची कासाविशी, जिना चढतानाची धाप, पहाटेचा गुदमरवणारा दमा या साऱ्यांवर मात करून त्याने बॅडिमटनमध्ये प्रगती केली. २०१२मध्ये तो अर्जुन पुरस्काराचा आणि २०१४मध्ये राष्ट्रकुल खेळांतल्या बॅडिमटनच्या सुवर्णपदकाचा मानकरी झाला. आता तो दम्याविरुद्धच्या सिपलाच्या मोहिमेचा मोहरा बनून अनेक दमेकऱ्यांना त्यांच्या आजारावर मात करायला शिकवतो.

सरलामावशींनी आपला मधुमेह समजून घ्यायचा प्रयत्न केला. आंतरजालावर काही विश्वासार्ह वैद्यकीय संस्था, काही तालेवार विद्यापीठं जनसामान्यांसाठी विनामूल्य माहिती देतात. मावशींनी ती वाचली. चालू असलेल्या औषधांचे दुष्परिणामही वाचले. डॉक्टरांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं.

‘येवढुस्साच तर मुरांबा खाल्ला’, ‘आठवडाभरच तर गोळी चुकली’, ‘उपवासाच्या दिवशीही इन्सुलिनचा नेहमीचाच डोस घेतला’ तर कशी गडबड होते ती त्यांची त्यांनाच समजली. रक्तातली साखर अव्वाच्या सव्वा वाढली किंवा फारच घटली तर काय करायचं ते जाणून त्यांनी स्वत:वर  लक्ष ठेवलं. घाईघाईने डॉक्टरकडे धावणं कमी झालं.  पण गरजेला वेळीच हॉस्पिटलात पोहोचणंही जमलं. आहारात, व्यायामात, औषधं घेण्यात जाणीवपूर्वक शिस्त आली. योग्य निर्णयाचा आत्मविश्वास आला.

तसं ज्ञान अंगवळणी पडलं की आजार चांगलाच कह्यत राहातो हे अनेक संशोधनांतून सिद्ध झालं आहे. मधुमेह, रक्तदाब वगैरे आजारांचे काही अटळ दुष्परिणाम असतात. सज्ञान, सजग पेशंटमध्ये त्यांचा त्रासही लवकर सुरू होत नाही. पण त्यांच्यावर लक्ष ठेवणं ही डॉक्टरांची जबाबदारी असते. म्हणून डोळे, हृदय, किडनी, वगैरेंची डॉक्टर दरवेळी कसून तपासणी करतात. त्याच्यात काही काळंबेरं आढळलं तर औषधांत बदल करताना तेही समजावून सांगतात. 

दीर्घकालीन आजार ही धुमसणारी युद्धं असतात. त्या युद्धांच्या डावपेचांची आखणी सेनापती म्हणजे डॉक्टर करतात. पण सीमेवरच्या रोजच्या चकमकी सैनिकांनी म्हणजे पेशंटांनी आपल्या आपणच निभावून न्यायच्या असतात. मधुमेहासाठी ग्लुकोमीटर आणि इन्सुलिनची सीरिंज, रक्तदाबासाठी मापकयंत्र,  दम्यासाठी औषधी फवारा ही त्या युद्धांत वापरायची शस्त्रं आहेत. ती जवळ न बाळगणं, न वापरणं हा अक्षम्य निष्काळजीपणा आहे.

सेनापती आणि सैनिक यांनी आपापली कर्तव्यं नीट निभावली तर कुठल्याही घनघोर यु्द्धात विजय मिळवणं कठीण नाही.

लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.

ujjwalahd9@gmail.com