अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूदान यज्ञाचा अस्सल दस्तावेज म्हणून भूदान गंगा या पुस्तक-मालेचा उल्लेख अटळ आहे. याशिवाय महाराष्ट्रातील पदयात्रेचा आढावा घेणारे चार भाग ‘महाराष्ट्रात विनोबा’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध आहेत. आळंदी, देहू, नरसी, पैठण या भक्तिपीठांना एकेक भाग समर्पित झाला आहे. अंतिमत: स्थितप्रज्ञपीठ आणि महायोगपीठ म्हणून ‘पंढरपूर’!

विनोबांची महाराष्ट्राची पदयात्रा १८४ दिवस चालली. १७३ गावांत ती मुक्कामी होती. दोन हजार ३०० किलोमीटर चाल झाली. ४३२ ग्रामदाने मिळाली. महाराष्ट्रात प्रवेश करताना विनोबांनी आपले हृदय मोकळे केले.

‘मी या प्रदेशामध्ये सर्व प्रकारे मोकळा होऊन आलेलो आहे. माझ्यापाशी मते नाहीत; माझ्यापाशी विचार आहे आणि प्रेम आहे. विचारांची देवघेव होत असते. ते देता येतात आणि घेता येतात. अशा रीतीने विचारांची वाढ होत जाते. त्याचा मला निरंतर अनुभव येतो. मी कुणाचाही विचार पटवून घ्यायला तयार आहे.

‘प्रेमात आणि विचारात जी शक्ती आहे, ती दुसऱ्या कशातही नाही. कुठल्याही संस्थेत नाही, सरकारात नाही, कोणत्याही वादात नाही, शास्त्रात नाही. अनेक राज्ये आली व गेली, धुळीला मिळाली, वर चढली, खाली पडली. काही हिशेबच नाही, त्या यमुनेच्या पाण्यात किती राज्ये गडप झाली! बाळकृष्णाची लीलाच फक्त भारताला माहीत आहे. एवढी विचाराची आणि प्रेमाची सत्ता आपल्या देशावर आहे. आणि त्या विज्ञानयुगात विचाराची जी सत्ता चालणार, ती दुसऱ्या कशाचीही चालणार नाही.

ज्यांनी विचार दिला, त्यांनी जगाला आकार दिला. इतर कोणीही जगाला आकार दिला नाही, देऊ शकत नाही. निरनिराळय़ा क्रांत्यांचे इतिहास ज्यांनी अवलोकिले त्यांना माहीत आहे की, प्रत्येक क्रांतीच्या मुळाशी विचार देणारे ऋषी होते, आणि त्यांचे विचार होते. माझ्यापासून तुम्ही बांधीव मतांची अपेक्षा करू नका; विचाराची अपेक्षा करा. मी इथे निरुपाधिक होऊन आलो आहे. मी त्या सबंध भारतात जिथे जिथे जाऊ शकलो, तिथे तिथे मला अनुभव आला की, मागितल्यावर लोकांनी मला भरपूर दिले. आता मी दुसरा प्रयोग करणार आहे- न मागण्याचा. महाराष्ट्रात मला हृदयप्रवेश हवा आहे. माझे हृदय मी सताड मोकळे सोडले आहे. विचाराला माझा दरवाजा अगदी मोकळा आहे.’

विनोबांची पंढरपूर यात्रा आणखी एका पांडुरंगाचे स्मरण करणारी होती. या वेळी पांडुरंग सदाशिव साने या गुरुजींचा आठव विनोबांना आला नसता तरच नवल. त्यांच्यासाठी गुरुजींचे स्थान सच्चिदानंदबाबांचे होते. नकळत विनोबांनी आपलाही परिचय करून दिल्याचे जाणवावे, असे हे नाते होते. योग्याची समत्व बुद्धी आणि मातेची उत्कटता असा या महानुभावांचा संगम होता. भागवतांच्या या महामेळाव्याची विठोबाच्या नित्योपचार पूजेत आळवणी असते. विष्णुदासाची ही अजरामर रचना म्हणते.

अनुपम्य नगर पंढरपुर

भीमा मनोहर संताचें माहेर

अव्यक्त आदिमूर्ति

परब्रह्म साकार।

विटेवरी उभें नीट

कटी ठेवूनिया कर।

जय देवा पांडुरंगा

जय आनंद कंदा ।।

ग्रामदानाच्या रूपातील आनंदकंद घेऊन विनोबा निघाले.. जगताचा जयघोष करत निघाले..

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyayog bhudan sacrifice land donation ganges book of walking maharashtra vinoba ysh
First published on: 13-12-2022 at 00:02 IST