अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूदान यज्ञाऐवजी विनोबांनी भूमी सत्याग्रह का केला नाही किंवा उद्योगांच्या राष्ट्रीयीकरणाचा आग्रह का धरला नाही, असे प्रश्न विचारले जातात. कॉ. बी. टी. रणदिवे यांनी ‘गांधीजींचा जनतेला जागे करणारा सत्याग्रहाचा मार्ग विनोबांनी का नाकारला,’ असा सवाल केला आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. कारण विनोबांनी सत्याग्रहाच्या मार्गाचे कितीही शोधन केले असले तरी त्यांनी तो मार्ग अगदीच सोडला नव्हता. त्यांनी अश्लील पोस्टर विरोधात आणि गोवंश हत्याबंदीसाठी आंदोलनाचा म्हणजेच सत्याग्रहाचा मार्ग पत्करला होता. मग हाच न्याय त्यांनी जमिनीच्या प्रश्नाला का लावला नाही?

या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या सत्याग्रह विचारात सापडते. त्यांची या विषयावरची भूमिका म्हणजे साम्ययोगाच्या आध्यात्मिक आणि भौतिक रूपांचा समन्वय आहे. विनोबांनी असे चिंतन केले म्हणून गांधीजींच्या नंतर सत्याग्रह मार्गाला नवा आयाम मिळाला. विनोबांच्या मते कोणताही प्रश्न सोडवण्याचे तीन मार्ग असतात. कत्तल, कायदा आणि करुणा. सत्याग्रहाला पहिले दोन मार्ग वर्ज्य आहेत शिवाय ते व्यावहारिकही नाहीत. कत्तली करून जुलूम संपत नाही. त्याचे रूप तेवढे बदलते. कायदे करावेत यासाठी आंदोलन करत राहिलो तर एखादा कायदा झाला की त्या आंदोलनाची ताकद कमी होते.

निवडणुका लढवून सत्तेत जाणे किंवा सत्य, प्रेम, करुणेच्या आधारावर प्रतिपक्षाचे हृदय परिवर्तन करणे. विनोबांना हे दोन्ही मार्ग मान्य होते. सत्तेत जाण्याची त्यांची भूमिका नव्हती आणि तशी कुणाची अपेक्षाही नव्हती. त्यांचा मार्ग करुणेचा होता. समोरच्यासाठी काहीतरी करणे म्हणजे करुणा. तिला त्यांनी सत्य आणि प्रेमाची जोड दिली. या समन्वयामुळे करुणा म्हणजे ‘काहीतरी’ नव्हे तर सत्कृत्यच करण्याची जबाबदारी असा अर्थ होतो. सत्य, प्रेम आणि करुणा या त्रयींमधे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे ‘अहिंसा’.

समाज परिवर्तन करू पाहणाऱ्या व्यक्तीने मी अनैतिक वागत नाही एवढेच म्हणणे पुरेसे नसते. त्याला कोणतीही किंमत मोजून नैतिक आचरण करावे लागते. गांधीजींना एकदा प्रश्न विचारण्यात आला. कसाई गाईचा पाठलाग करत असल्याचे तुम्ही पाहिले आहे. त्याची त्या कसायाला जाणीवही आहे. अशा स्थितीत गाय कोणत्या दिशेला गेली, हे त्याने विचारले तर तुम्ही काय उत्तर द्याल? उत्तर दिले तर गोहत्या आणि नाही तर असत्य वचन म्हणजे दोन्हीकडून तत्त्वाला बाधा येणार.

गांधीजी शांतपणे म्हणाले, ‘‘गाय कुठे गेली हे मला माहीत आहे पण मी ते तुला सांगणार नाही.’’ विनोबांनी या पद्धतीने अहिंसा तत्त्वाची फेरमांडणी केली. अहिंसा म्हणजे हिंसेला नकार हा पुन्हा हिंसेच्या अंगाने अर्थ झाला. तथापि अहिंसा म्हणजे ‘सत्य-प्रेम-करुणा’. चराचर सृष्टीशी या तत्त्वत्रयीने वागले की अहिंसा साधली. स्वराज्य, सत्याग्रह, अहिंसा, सर्वोदय आदि तत्त्वांचा पुनशरेध घेतला. साम्ययोगासारखे दर्शन विकसित केले. गांधीजींनी सत्याचे प्रयोग केले तसे विनोबांनी सत्याग्रहाचे प्रयोग केले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyayog experiments in satyagraha land donation vinoba gandhiji nationalization ysh
First published on: 28-09-2022 at 00:02 IST