अतुल सुलाखे

कर्मीं अकर्म ज़ो पाहे

अकर्मीं कर्म ज़ो तसें

तो बुद्धिमंत लोकांत

तो योगी कृत-कृत्य तो

गीताई अध्याय ४-१८

भूदान हे गीताईचे प्रत्यक्ष रूप होते, असे खुद्द विनोबाच म्हणत. तथापि त्याची नेमकी उकल फारशी समोर आली नसावी. एरवी भूदान आणि ग्रामदान या चमत्कारांच्या माथी अपयशाचा शिक्का बसला नसता.भूदानाची मुळे पाहिली तर ती उपनिषदे, महाकाव्ये, आद्य शंकराचार्य, संत परंपरा, वैश्विक धर्मचिंतन, गांधीजी, स्वातंत्र्योत्तर भारताच्या समस्या आणि देशावर असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अंतिमत: आईचा उपदेश अशी दिसतात. थोडक्यात विनोबांनी हाती घेतलेल्या दानयज्ञाची बैठक विशाल आणि सखोल होती.

देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. आपल्या जवळची चांगली वस्तू दान म्हणून द्यावी इतक्या सोपेपणाने रुक्मिणीबाईंनी आपल्या मुलाला दानयोगाची ओळख करून दिली. त्याची प्रचीती गीता प्रवचनाची ‘द’ कार आणि देव, दानव आणि मानव या कथेवरून येते.

देव शब्दाची व्युत्पत्तीच देणारा तो देव अशी आहे. त्यांनी दयाभाव धारण केला. दुसरीकडे राक्षस म्हणजे राखतो तो. दानव म्हणजे दुष्ट लोभी. त्यांनी ‘द’चा अर्थ दया करा असा घेतला. मानवही तसेच सतत संचयाच्या मागे लागलेले. प्रजापतीचा उपदेश त्यांनी दान करा असा घेतला. प्रजापतीने हे सर्व अर्थ बरोबर मानले.

विनोबांची दानाची व्याख्या या कथेला जवळ जाणारी आहे. दान म्हणजे संविभाग, हा आचार्यानी सांगितलेला अर्थ विनोबांनी कोणताही किंतु न बाळगता ग्राह्य धरला. संतांची समाजाभिमुख मोक्षसाधना त्यांच्या समोर होती. गांधीजींनी आदर्शाना दिलेले व्यापक रूप त्यांना प्रमाण होते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर गांधीजींनी जगाच्या ऐक्याला आणि जमिनीच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. तथापि विनोबांवर सर्वात महत्त्वाचा संस्कार केला तो रुक्मिणीबाईंनी. आपल्या मुलाने साधना मार्गावर प्रगती करावी, वैराग्याची वाट धरावी, यासाठी तिने अथक प्रयत्न केले. स्वत:च्या जीवनातून तिने विनोबांना समाजाभिमुख केले. विनोबांनी हाती घेतलेल्या भूदान आणि ग्रामदान यांच्या पृष्ठभूमीची ही फक्त झलक आहे.

विनोबांना लाभलेले संस्कार अन्य भारतवासीयांवर झाले होते. त्यामुळे या दानयज्ञाचा त्यांनी स्वीकार आणि आदरही केला. भूदान आणि ग्रामदानाने जमिनीचा प्रश्न संपूर्णपणे सुटेल, अशी कुणाचीही अपेक्षा नव्हती. तरीही या यज्ञामुळे संसाधनांचा मुद्दा ठळकपणे समाजासमोर आला. देशाला स्थैर्य मिळाले आणि जगासमोर रचनात्मक कार्याचा आदर्श उभा राहिला. ‘सोशल आंत्रप्रिन्युअरशिप’ ही संकल्पना चर्चेत आली. सत्य, प्रेम आणि करुणा हा नवा अर्थ घेऊन जगासमोर अहिंसेचे मूल्य अवतरले. जगासाठी काही तरी करायला लावते, ती करुणा हे मूल्य प्रतिष्ठित झाले. बुद्धी आणि कृतार्थता यांच्या व्याख्या सर्वासमोर आल्या. कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहणारा एक योगी जगाने अनुभवला. कोणत्याही पाशात न अडकता विनोबांनी हा पराक्रम करून दाखवला. सत्पुरुष आणि समाजपुरुषांना नवा मार्ग शोधावाच लागतो. विनोबा त्याला अपवाद नव्हते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

jayjagat24@gmail.com