scorecardresearch

साम्ययोग : असो नमस्कार सहस्रवार..

नाथांची समाजाभिमुखता आणि अध्यात्म याने विनोबा इतके प्रभावित झाले होते की एकनाथ म्हणजे ‘बाप’ अशी त्यांची धारणा होती.

साम्ययोग : असो नमस्कार सहस्रवार..
विनोबा भावे

अतुल सुलाखे

वर्षभर आपण साम्ययोगाचे अध्ययन केले. आज हा स्वल्पविरामाचा लेख. लेखमालेमधील हा अंतिम लेख असला तरी प्रत्यक्ष आयुष्यात साम्ययोगाचे निरंतर अध्ययन आणि त्याचे अनुसरण सुरूच राहणार आहे. खुद्द विनोबांनी याची काळजी घेतली आहे. त्यांनी पुढील परंपरा त्या दृष्टीनेच आपल्यासमोर ठेवली. अध्यात्म, विज्ञान, समाजकारण, राजकारण आदिंचा त्यांनी घेतलेला वेध म्हणजे साम्ययोगाचा भव्य पट आहे.

‘महाराष्ट्र धर्म’ सांगणारे ज्ञानोबा त्यांचे प्रमुख प्रेरणास्थान. आचार्य शंकर आणि महात्मा गांधी यांचे स्मरण आहेच. तरीही आरंभ माउलींच्या स्मरणाने करायचा. ज्ञानेश्वरीच्या पायावर विनोबांच्या गीतेचे परिशीलन उभे आहे. साम्ययोग हा पसायदानाचा उत्तरार्ध आहे.

विनोबांनी उदंड यात्रा केली, ती सत्य, प्रेम आणि करुणेच्या प्रसारासाठी होती. तिला साथ मिळाली ती भूदान यज्ञाची. साम्ययोगाची पारमार्थिक आणि ऐहिक अंगे या अनुषंगाने पाहता येतात. या दोहोंचा विचार करताना नामदेव आणि रामदास या संत द्वयीचा आठव होतो. नामदेवांचा प्रेमयोग आणि समर्थाचा वैराग्ययोग यांचा आविष्कार म्हणून भूदानाकडे पाहायला हवे. नामदेवांच्या खांद्यावर बसून विनोबांनी समर्थाचे वैराग्य अंगीकारले.

एकनाथ महाराजांच्या समाजप्रवण वृत्तीचा त्यांना लाभलेला वारसा चकित करणारा आहे. नाथांची समाजाभिमुखता आणि अध्यात्म याने विनोबा इतके प्रभावित झाले होते की एकनाथ म्हणजे ‘बाप’ अशी त्यांची धारणा होती.

नाथबाबांच्या वारसदारांमध्ये त्यांनी न्यायमूर्ती रानडे पाहिले. एकदा रानडे आले की पाठोपाठ गोखले, विठ्ठल रामजी आणि गांधीजी येतातच. गोखले आणि शिंदे या धुरंधर नेत्यांचा विनोबांनी फारसा उल्लेख केला नसला तरी त्यांची समंजस राजकीय भूमिका आणि सर्वहारा वर्गाच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या नेत्यांच्या विचार परंपरेशी जवळीक साधणारे आहेत. भूदानाचा आर्थिक अंगाने विचार केला तर गोखले यांचे अर्थकारण नजरेसमोर येते. आध्यात्मिक बाजू बाजूला ठेवली तर विनोबा ग्रामीण अर्थव्यवस्थेचे श्रेष्ठ भाष्यकार होते हे जाणवते.

ही नामावली लक्षात घेता भागवत धर्म आणि काँग्रेस नावाची राजकीय संस्कृती यांचे नाते लक्षात येते. पंडित नेहरू आणि इंदिराजी इथवर हा प्रवास आहे. तुकोबा आणि लोकमान्य यांचा विनोबांवर प्रभाव होता. विनोबांचा गीतेच्या अध्ययनावर टिळकांच्या गीतारहस्याचे मोठेच ऋण होते. 

तुकोबा म्हणजे विनोबांची आई. प्रत्यक्ष आयुष्यातही त्यांना त्याच तोडीची आई मिळाली. तुकोबा, रुक्मिणीबाई आणि गांधीजी यांचा विनोबांवर असणारा प्रभाव शब्दातीत आहे. या त्रयीने विनोबांचा सांभाळ केला यातच सर्वकाही आले. साम्ययोगाच्या प्रस्थापनेत विनोबांना आणखी दोघांची साथ मिळाली. बाळकोबा आणि शिवबा या त्यांच्या बंधूंनी विनोबांच्या विचार प्रसारात मोठी साथ दिली. हा ‘ऋषिवंश’  जपायला हवा. वर्तमानात ही परंपरा पवनारच्या साध्वींनी सांभाळली आहे. तिनेच या लेखमालेला शिस्त लावली. आदरणीय कालिंदीताईंनी हे काम केले. या सर्वाच्या ऋणात राहणे इष्ट. या भव्य परंपरेची जाण ठेवणारा ‘लोकसत्ता’ परिवार, या लेखमालेची पाठ थोपटणारा वाचक या सर्वाना, जय जगत्!   (समाप्त) –  

jayjagat24 @gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 05:11 IST

संबंधित बातम्या