‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार। शास्त्रग्रंथ विलोकत, मनुजा चातुर्य येत असे फार।।’ कवी मोरोपंतांच्या या काव्यपंक्तींचे चपखल उदाहरण म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. जगप्रवासी की गावगोसावी असे देशाटन. सभा संमेलनात संचार तसाच गायक, वादक, चित्रकारांच्या मैफली रंगविणारे नि मैफलीत रंगणारेही. वेद, शास्त्र, कोश निपुणता तर जगप्रसिद्ध. चातुर्य हजरजबाबीपणात तसेच लेखनातही. कुमार गंधर्वांच्या मैफली वाईत आणि इंदूरमध्ये आयोजित करणारे तर्कतीर्थ! पु. ल. नि तर्कतीर्थ या उभयतांमध्ये एकप्रकारचे अद्वैतच होते. पु. लं.ना तर्कतीर्थ मायावी भाषांतरकार नि आचार्य पुरुषोत्तम म्हणत, तर पु. ल. तर्कतीर्थांचे वर्णन ‘विद्वत्तेतील शीतल चांदणे’ असे करत. फ्रान्सिस्को जोशे द गोया, मायकेल एन्जेलोसारख्या चित्रकारांवर रॉयवादी दैनिक ‘संग्राम’मध्ये ‘युरोपातील कीर्तिशाली थोर चित्रकार’ माला लिहिणारे तर्कतीर्थ.
८ मे, १९८४ ला कुमार गंधर्वांच्या षष्ट्यब्दीपूर्तीचा समारंभ देवास (मध्य प्रदेश) मध्ये संपन्न झाला होता. विशेष म्हणजे तिथे प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाईतर्फे कुमार गंधर्वांची मैफल तर्कतीर्थांनी योजली होती. त्या मैफलीचे तर्कतीर्थांनी केलेले प्रास्ताविक म्हणजे कुमार गंधर्वांच्या गायकीचे रसग्रहण ठरले होते. त्यात ते म्हणतात की, ‘कुमार गंधर्व हे भारतीय संगीताला नवा मार्ग दाखविणारे कलाकार आहेत. त्यांनी नवे राग निर्माण केले, नवीन बंदिशी बांधल्या. गायकीला नवा आकृतिबंध दिला. त्यांनी जुन्या रागांमध्ये केलेले काही बदल संगीताच्या विशेषज्ञांनी मान्य केले आहेत. त्यांच्या अशा नवरचनांचा संग्रह म्हणजे ‘अनुपरागविलास’ ग्रंथ होय.
संगीतकारांनी चीज म्हणून जी कविता रचलेली असते, तिला काव्य म्हणून तितकेसे महत्त्व नसते; पण अशा मान्यवर संतांच्या काव्यरचना बंदिशीची सूर व लयाची आरास घेऊन प्रकटते, तेव्हा तिचे सौंदर्य असाधारण आविष्काराचे रूप धारण करते. ती रचना तो कवी रागविलासाकरिता करीत नसतो; पण गायक तिचे रूपांतर मोक्षगीतात करतो. कुमार गंधर्वांनी अशी कितीतरी गीतं संगीताच्या परमानंदात गुंफून स्वत: मोक्षानंदाचा आस्वाद घेत त्यात श्रोत्यांना भागीदार बनवले आहे. त्यासाठी कुमार स्वररचना आणि शब्दार्थांचा मेळ बसवत ते सादर करतात. ईशस्तवन, शंकराराधना, सरस्वतिस्तवन, गुरूभजन, संगीतमहिमा, ऋतुवर्णन, शृंगार, विरहिणीची व्यथा (विराणी), शामसुंदराची बासरी या सर्वांत सुसंवाद साधावा तो कुमार गंधर्वांनीच.
भारतीय संगीत विकास आणि विस्तार पावत आहे किंवा नाही, हे केवळ परंपरागत व्यक्तिनिष्ठ किंवा व्यक्तिप्रधान एकांतिक बंदिशीतच बंदिस्त होऊन पडलेले राहणार काय? या प्रश्नांची उत्तरे कुमारांच्या अनन्यसाधारण नवनिर्मितीत मिळतात. त्यांनी भारतीय संगीताला विकासाचा नवा मार्ग दाखवून दिला आहे. कुमार गंधर्वांनी माळवा प्रांतातील सामान्य जनसंगीताच्या (लोकसंगीत) लयी, स्वररचना आणि भावाविष्कार यांचे सार आत्मसात केले होते, त्यामुळे त्यांना एक विशेष आविष्कार असलेली रागरचना स्फुरली.
भिन्न जाती-जमाती, प्रांत, संस्कृतीचे वेगळे व विशिष्ट आकृतिबंध असतात. त्या समाजातील लोक तो विलक्षण कलानुभव, त्यांचा आस्वाद घेत असतात. मनाचे यौवन चिरंतन करण्याचे सामर्थ्य संगीतात असते. त्या भिन्न स्वररचनांची मूल्ये आत्मसात करत पाश्चात्त्य संगीत विकसित झाले आहे. उदाहरणार्थ अमेरिकेने अनेक आफ्रिकी जमातींना गुलाम बनविले; पण या जमातींचे संगीत अमेरिकी संगीतात केव्हा मिसळून गेले, हे अमेरिकनांना समजलेसुद्धा नाही. कुमार गंधर्वांनी लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत, संत रचना आणि नव्या राग, बंदिशींमध्ये असाच मिलाफ करत भारतीय संगीताचा विकास केला.
भारतीय संगीत प्रयोगशील बनविण्यातील कुमार गंधर्वांचे योगदान वादातीत आहे. ते ग्वाल्हेर घराण्याचे संस्कारित गायक; पण पुढे त्यांनी गायनाची स्वत:ची स्वतंत्र शैली निर्माण केली. लोकधून, भजन, निर्गुण पंथी गायन कला विकासातील त्यांची भागीदारी अविस्मरणीय ठरली. ऋतुगीतांची त्यांची शृंखला अजरामर ठरली. संगीतास ‘अनुभव’ मानणारा हा गायक नवसर्जक कलाकार होता. कुमार गंधर्वांची कन्या आणि संगीत नाटक अकादमी विजेत्या कलापिनी कोमकली आणि रेखा साने-इनामदार संपादित ग्रंथ ‘कालजयी कुमार गंधर्व’मध्ये तर्कतीर्थांचे हे भाषण आवर्जून अंतर्भूत केले आहे. drsklawate@gmail.com