‘निसर्गानेच डायनोसॉरना नामशेष करण्यासाठी निवडले’ असे वाक्य ‘ज्युरासिक पार्क’ या सुप्रसिद्ध चित्रपटात एका पात्राच्या तोंडी आहे. याचा अर्थ निसर्ग किंवा पर्यावरण किंवा पृथ्वी हे निव्वळ सजीवांचे महाकाय वस्तीस्थान नसून, स्वतंत्र परिचालन असलेली आणि सजीवांच्या संख्येत आणि उपद्रवमूल्यात काटछाट करणारी एखादी शक्तीच असते, असा तो विचार. परंतु त्या चित्रपटाच्या किंवा त्याचा मूलाधार असलेल्या कादंबरीच्या कितीतरी आधी असेच अनेक अद्भुत आणि कालविसंगत परंतु भविष्यवेधी विचार मांडून प्रस्थापित सिद्धान्त आणि गृहीतकांना मुळासकट हादरवणारे रसायन शास्त्रज्ञ, पर्यावरण शास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. जेम्स लव्हलॉक यांचे अलीकडेच निधन झाले. ‘गाया हायपॉथेसिस’ हा त्यांनी मांडलेला विलक्षण सिद्धान्त अजूनही मोठय़ा प्रमाणावर अभ्यासला आणि चर्चिला जातो. १०३ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य त्यांना बहुधा ‘गाया’ या ग्रीक पुराणातील पृथ्वी देवतेनेच दिले असावे!

 डॉ. लव्हलॉक यांच्या मते, पृथ्वी एक महासजीव म्हणून ‘जगत-वागत’ असते. या पृथ्वीवरील सजीव हे भवतालच्या परिसंस्थेशी आणि परस्परांशी स्वनियमन केल्यासारखे वागत असतात आणि त्यांतून सगळय़ांचाच फायदा असल्याची जाणीव त्यांना उपजत असते. ही प्रक्रिया पृथ्वीवरील जीवनिर्मितीपासून सुरू असल्याचेही निरीक्षण डॉ. लव्हलॉक नोंदवतात. या दाव्याला वैज्ञानिक वर्तुळातीलच अनेकांनी गूढ कल्पित आणि छद्मविज्ञान म्हणून धिक्कारले. परंतु डॉ. लव्हलॉक यांची कारकीर्दच खणखणीत प्रयोगशील वैज्ञानिकाची आणि विचारवंताची असल्यामुळे छद्मविज्ञानाचा आरोप एका मर्यादेपलीकडे चलनात येऊ शकला नाही.

duvartanacha vedh marathi book
वर्तन कारणांचे उत्खनन
lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण

आज वातावरणीय बदलांमुळे पृथ्वीचे आयुर्मानच धोक्यात येऊ लागल्याची जाणीव सार्वत्रिक आणि सर्वमान्य आहे. क्लोरोफ्लुओरोकार्बनमुळे वातावरणातील ओझोनच्या वलयाला छिद्र पडल्याचेही आपण जाणतो. डॉ. लव्हलॉक यांनी याविषयीचे प्रयोग १९५० च्या दशकात केले. त्यांनी विकसित केलेल्या इलेक्ट्रॉन कॅप्चुअर डिटेक्टरच्या साह्याने वातावरणातील क्लोरिनच्या रेणूंचे अस्तित्व आढळून आले. याच प्रकारे त्यांनी जमीन, वायू आणि पाण्यातच नव्हे, तर जवळपास सर्वच सजीवांमध्ये कीटकनाशकांचे अंश असल्याचेही सप्रमाण मांडले. प्रदूषण ही समस्या किती ऊग्र आणि सर्वव्यापी बनत होती याविषयी पहिला ठोस विचार त्यांनी मांडला. गोठणिबदूखाली एखाद्या सजीवाचे शारीरिक तापमान आणून त्याला ऱ्हास किंवा मृत्यूपासून वाचवता येऊ शकते का, या अत्यंत भन्नाट विषयातही डॉ. लव्हलॉक यांनी संशोधन केले. त्यांनी निव्वळ वैज्ञानिक प्रयोगांमध्ये आणि संशोधन-नियकालिके-परिषदा या चक्रात अडकून न राहता, पृथ्वी आणि निसर्गसंवर्धन शास्त्राला तत्त्वज्ञानाची जोड दिली. निर्जीव गोष्टींमध्ये (उदा. प्राणवायू) जीवसंकेत शोधण्याचा प्रयत्न केला.

आज सुदूर विश्वातील जीवांश शोधण्याच्या अनेक मोहिमांमध्ये डॉ. लव्हलॉक यांनी मांडलेल्या विचारांचा आधार घेतला जातो. पृथ्वी एखादा महाजीव असेल, तर विश्वही तसेच काहीसे असू शकेल का असे विलक्षण विचार निव्वळ कल्पित आणि छद्मविज्ञान म्हणून दुर्लक्षिले जाऊ शकत नाहीत. एक दिवस आपली पृथ्वी लाखो वर्षांपूर्वीच्या तापमानाकडे जाऊन सारे काही भस्मसात करेल, असा इशारा त्यांनी नवीन सहस्रकात दिला होता. शालेय जीवनात ग्रंथालयातील विज्ञानविषयक पुस्तकांत त्यांचा जीव रमला आणि त्या तुलनेत शालेय वर्गातील विज्ञानाचे धडे त्यांना कंटाळवाणे वाटले! त्यांचा जीवनपटच प्रस्थापित वाटांशी फटकून वागणारा कसा ठरला, याची ती चुणूक होती.