scorecardresearch

व्यक्तिवेध : विक्रम किर्लोस्कर

विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनाने काळापुढची पावले ओळखणारा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला आहे.

व्यक्तिवेध : विक्रम किर्लोस्कर

मराठी माणसांमध्ये उद्योगासाठी आवश्यक असणारी प्रवृत्ती नाही, अशी टीका होत असतानाच्या काळात किर्लोस्कर या नावाला महाराष्ट्रातच नव्हे, तर देशपरदेशातही स्थान मिळवून दिलेल्या घराण्यात विक्रम किर्लोस्कर यांचा जन्म झाला. या उद्योगाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे पुत्र शंतनुराव यांनी या उद्योगाला जी झळाळी दिली, त्याने किर्लोस्कर हे नाव सर्वदूर पोहोचले. विक्रम त्यांचे नातू. शंतनुरावांनी जरी आपले उद्योग महाराष्ट्रात उभे केले, तरी पुढच्या पिढय़ांनी हा उद्योग देशातील अनेक शहरांमध्येही नेला. विक्रम किर्लोस्कर यांनी टोयोटा किर्लोस्कर ही मोटार उत्पादक कंपनी बंगळूरुमध्ये उभारली आणि त्यानंतर देशातील वाहन उद्योगात, त्यांच्या नावाला महत्त्व प्राप्त झाले.

गेली १३० वर्षे भारतीय उद्योगात नाव कमावलेल्या किर्लोस्कर समूहातील विक्रम यांनी प्रथमच जागतिक पातळीवरील टोयोटा या जपानी मोटार उत्पादक उद्योग समूहाबरोबर आपली नाळ जोडली आणि भारतातील रस्त्यांवर एक जागतिक दर्जाची प्रवासी मोटार दिसू लागली. विक्रम यांनी केलेले हे धाडस, त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक होते. मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीसारख्या जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीअरची पदवी मिळवल्यानंतर विक्रम यांनी आपल्या कौटुंबिक उद्योगात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सतत काही तरी नवे आणि लांब पल्ल्याचे स्वप्न पाहतानाच टोयोटाबरोबर भागीदारी करण्याच्या त्यांच्या कल्पनेने मूर्त स्वरूप घेतले.

बंगळूरु येथे या कारखान्याची स्थापना झाली. त्यामुळे भारतीय वाहन उद्योगाचे क्षेत्र अधिक रुंदावले. मोटार निर्मितीपूर्वी त्यांनी टोयोटाच्या वस्त्र उद्योगातही भागीदारी केली होती. त्याशिवाय विमा, घरबांधणी आणि आरोग्याच्या क्षेत्रातही त्यांनी टोयोटाबरोबर काम सुरू केले. व्यावसायिक निष्ठा पाळून उद्योगाची भरभराट कशी करता येईल, यावर भर दिल्यानेच जागतिक वाहन उद्योगातही त्यांना मानाचे स्थान मिळाले. १९८० मध्ये केंद्र सरकारच्या डेव्हलपमेंट कौन्सिल फॉर मशीन टूल्स या परिषदेत त्यांनी केलेले काम वाहन उद्योगासाठी नवसंजीवनी देणारे ठरले. कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स या संस्थेचे ते अध्यक्ष होते.

उद्योग क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल कर्नाटक सरकारने त्यांचा ‘सुवर्ण कर्नाटक’ हा पुरस्कार देऊन गौरवही केला. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या देशातील वाहन उद्योगातील सर्वात महत्त्वाच्या संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. हवामान बदलांच्या परिणामांना तोंड देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. वाहन उद्योगाने त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे त्यांचे म्हणणे होते. कर्नाटकातील बिदादी येथे अक्षय ऊर्जेचा वापर करण्याचा प्रकल्पही त्यांनी निर्माण केला. भविष्याची काळजी करणारा उद्योगपती ही त्यांची ओळख राहिली. त्यामुळेच कर्नाटकात त्यांनी विविध क्षेत्रांत काम करण्याचा ध्यास घेतला. आरोग्य व्यवस्थेतील त्यांचा सहभागही महत्त्वाचा राहिला. देशातील पहिला लोखंडाचा नांगर बनवणाऱ्या लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या व्यक्तीने स्थापन केलेल्या उद्योगाचे नंतरच्या काळात उद्योग समूहामध्ये रूपांतर करण्यासाठी शंतनुराव किर्लोस्करांच्या नंतरच्या पिढय़ांनी जगाबरोबर राहून नवनव्या उद्योगांत पाऊल ठेवले आणि या क्षेत्रातील आपले स्थानही अबाधित ठेवले.

विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनाने काळापुढची पावले ओळखणारा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला आहे.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 03:02 IST

संबंधित बातम्या