हाइम टोपोल या इस्रायली अभिनेत्याच्या प्रसिद्धीची तुलना आजच्या काळातील कोणत्या इस्रायली कलावंताशी करायची झाली, तर ‘फौडा’ या नेटफ्लिक्स मालिकेनंतर त्यातील डोरॉन या पात्रामुळे सध्या त्रिखंडात गाजत असलेल्या लिओ हाज याच्याशीच होऊ शकेल. पण नेटफ्लिक्स आदी मनोरंजन- फलाटांचा मागमूसही नसण्याच्या काळात ‘फिडलर ऑन द रूफ’ चित्रपटातील ‘टॅव्हिया’ची व्यक्तिरेखाआयुष्यभर वठवल्याने तीच ओळख बनलेल्या टोपोल यांचे कार्यकर्तृत्व अट्टल इस्रायली म्हणून खूपच उजवे आहे. शालोम अलाखेम यांनी १८९४ या सालात लिहून ठेवलेल्या यिडिश कथांमधून अवतरलेल्या ‘टॅव्हिया द मिल्कमन’ पात्रावर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पहिले नाटक आले. १९६७ ते २००९ या कालावधीत जगभरात या नाटकाचे ३५००हून अधिक प्रयोगांत टोपोल यांनीच ‘टॅव्हिया’ साकारला. ही व्यक्तिरेखा तब्बल डझनभर इतर कलाकारांनीही करून पाहिली, पण त्या कुणाचेही नाव टोपोलइतक्या प्रखरतेने गौरवले गेले नाही. तेल अवीवमध्ये रशियातून स्थलांतरित दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या टोपोल याचे अभिनयगुण शाळेतल्या शिक्षिकेने हेरून त्याला नाटिका, अभिवाचनांत गुंतवूून ठेवले. पुढे वृत्तपत्रातील छपाई विभागात काम करून त्याने रात्रशाळेतून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर टोपोल लष्कराच्या मनोरंजनवृंदात दाखल झाला. लष्करी सेवेनंतर किबुत्झमध्ये त्याने रंगकर्मीना गोळा करून थिएटर अॅकेडमी स्थापन केली आणि सिनेमा आणि रंगभूमी या दोन्ही डगरींवर मजबूत स्थान निर्माण केले. ‘सालह शबाटी’ या विनोदी चित्रपटातील भूमिकेसाठी १९६४ साली टोपोल यांना गोल्डन ग्लोब पारितोषिक मिळाले. पहिल्यांदा या भूमिकेतून इस्रायलेतर जगाला टोपोल यांची ओळख झाली आणि ‘फिडलर ऑन द रूफ’ चित्रपटातील ‘टॅव्हिया द मिल्कमन’ ही पाच मुलींच्या बापाची रांगडी व्यक्तिरेखा साकारण्याची तयारी सुरू झाली.
कुटुंब, परंपरा, समुदाय आणि बदल या वैश्विक संकल्पना साकारणाऱ्या कथानकामध्ये ‘ट्रॅडिशन’ किंवा ‘इफ आय वेअर रिच मॅन’ ही गाणी गाणारा टोपोल सार्वकालिक आणि सार्वत्रिक सत्यकथा म्हणून आवडू लागतो. या भूमिकेला ऑस्कर मिळाले नसले, तरी गोल्डन ग्लोबवर टोपोल यांनी दुसऱ्यांदा आपले नाव कोरले. पण या ‘टॅव्हिया’ म्हाताऱ्याची भूमिका त्यांना हयातभर चिटकून राहिली. पुढे त्यांनी केलेल्या कुठल्याही भूमिकेला ती पुसून काढता आली नाही. ‘फॉर युअर आइज ओन्ली’ या बॉण्डपटापासून ते ‘फ्लॅश गॉर्डन’, ‘द पब्लिक आय ’ या बिग बजेटी सिनेमांमधील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांऐवजी ‘टॅव्हिया’च लोकांच्या लक्षात राहिला. या भूमिकेसाठी त्याने जगभर प्रवास केला. अभिनयासह ‘व्हरायटी इस्रायल’ नावाची सामाजिक संस्था त्याने स्थापन केली. पश्चिम आशियाई देशांतील आजारी/ व्यंग असलेल्या मुलांवर शस्त्रक्रिया, लहान मुलांवर मोफत औषधोपचार ही संस्था करते. याशिवाय अनेक इस्रायली उपक्रमांमध्ये त्याचा कायम पुढाकार राहिला. इस्रायली सरकारचा परमोच्च सन्मान प्राप्त केलेला हा रंगभूमी बहाद्दर या आठवडय़ात निवर्तला. मात्र त्याने साकारलेला ‘टॅव्हिया’ रंगभूमीवर अजरामर म्हणूनच कायम राहील.