विचारी काँग्रेसजनांना मनमोहन वा पृथ्वीराज यांच्या मानहानीपेक्षा पक्षाच्या नुकसानीची चिंता आहे. पक्षास राहुल वा सोनिया यांच्याकडून दोन परस्परविरोधी दिशांना ओढले जात आहे किंवा काय, असा प्रश्न पडावा इतके गोंधळाचे वातावरण पक्षात आहे.
स्वत:च्या अंगाला काहीही खार न लागता आयते सगळे मिळाले की जे एखाद्याचे होते ते राहुल राजीव गांधी यांचे सध्या झाले आहे. त्यामुळे कधी मनमोहन सिंगांना ढुशी दे तर कधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एक रट्टा लगाव असे करणे त्यांना परवडते. जबाबदारी कसलीही नाही त्यामुळे उत्तरदायित्व काहीही नाही. काही असे भाग्यवान असतात ज्यांना कोणालाही कसलाही हिशेब द्यावा लागत नाही आणि कोणी त्यांना तो मागत नाही. राहुलबाबा हे अशा नामांकित भाग्यवंतांतील एक. वास्तविक अशा भाग्यवंताने जे काही आपल्या ताटात आयते पडते आहे त्यावर आनंद मानावा. पण तेही नाही. फुका उपदेशाचा कंड. बरे ज्या क्षेत्रात आपण उपदेश करीत आहोत, त्या क्षेत्रात आपण काय दिवे लावले आहेत, हा प्रश्न स्वत:च्या मनास विचारण्याइतका प्रामाणिकपणाही नाही. त्यामुळे जीभ उचलायची आणि मनाला येईल तेव्हा आणि तसे उपदेशामृत पाजत सुटायचे अशी या राजपुत्राची गत झाली आहे. मध्यंतरी या अजाण बाळाने पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा असाच अपमान केला. पंतप्रधान सिंग हे सुखदु:खे समे कृत्वा अशाच बाण्याने वागत असल्यामुळे त्यांना सन्मानाने आनंद होत नाही आणि अपमानाने त्यांचा हिरमोड होत नाही. त्यामुळे ते या अजाण बाळाचा कसलाही प्रतिवाद करण्याच्या फंदात पडले नाहीत. किंबहुना या अजाण बालकाचे नक्की काय करायचे हे कोणत्याही काँग्रेसजनास समजत नाही, हे वास्तव आहे. या समस्त काँग्रेसजनांची पंचाईत ही की चि. राहुलबाबा जे काही उद्योग करीत आहेत त्यास मातोश्री सोनियांचा आशीर्वाद आहे किंवा नाही, हे त्यांना कळावयास मार्ग नाही. तेव्हा या अजाण बाळाविरोधात तक्रार समजा ते करावयास गेले आणि वर उलट मातोश्री सोनियांनीही चार शब्द सुनावले तर काय घ्या, असे विचार हे काँग्रेसजन करतात आणि उगा आगीची परीक्षा कशाला घ्या असे स्वत:च्या मनास बजावून गप्प बसतात. या आधी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही असे गप्प बसावे लागले आणि आता ती वेळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही आली आहे. या अजाण बाळाने आपल्या जिभेच्या दुगाण्या पृथ्वीराज चव्हाण यांना देऊन त्यांना तर घायाळ केले आहेच पण त्याच्याहीपेक्षा अधिक नुकसान त्याने आपल्या पक्षाचे केले आहे. याची जाण असण्याइतका प्रौढ विचारीपणा या अजाण बाळाकडे नसल्यामुळे त्यास याची जाणीव नाही. परंतु अन्य विचारी काँग्रेसजनांना पृथ्वीराज वा मनमोहन यांच्या मानहानीपेक्षा पक्षाच्या नुकसानीची अधिक चिंता आहे. त्यामुळे प्रश्न फक्त या दोघांच्या अपमानाचा नाही. त्या पक्षाच्या भविष्यातील दिशेचा आहे.
याचे कारण असे की पक्षास राहुल वा सोनिया यांच्याकडून दोन परस्परविरोधी दिशांना ओढले जात आहे किंवा काय, असा प्रश्न पडावा इतके गोंधळाचे वातावरण काँग्रेस पक्षात आहे. अशोक चव्हाण आणि अन्य काँग्रेसी मान्यवरांचे कार्यकर्तृत्व केवढे उंच आहे याचा मापदंड ठरलेल्या आदर्शचा अहवाल राज्य सरकारने फेटाळला तो काँग्रेस पक्षo्रेष्ठींच्या सल्ल्यानेच. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना राज्य सरकारच्या या निर्णयाची पूर्ण कल्पना होती. इतकी की अशोक चव्हाण यांच्यावरील खटल्यास परवानगी नाकारा असा सल्ला त्यानुसार मंत्रिमंडळाने राज्यपाल शंकरनारायणन यांना दिला. हा अहवाल फेटाळला गेला नसता तर आदर्श चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्या सर्वच काँग्रेसजनांच्या झाडाझडतीची वेळ काँग्रेसवर आली असती. कारण आदर्शचे पाप एकटय़ा अशोक चव्हाणांचे नाही. आपापल्या गरजांप्रमाणे अनेक नेत्यांनी आपापला वाटा या पापात उचलला. मग शिक्षा फक्त एकटय़ा अशोक चव्हाणांनाच का असा प्रश्न निर्माण झाला असता. तेव्हा पक्षाचे व्यापक हित लक्षात घेऊन या अहवालाला मूठमाती देण्याचा निर्णय काँग्रेसला घ्यावा लागला, हे सत्य आहे. त्याचबरोबर हेही सत्य की आदर्शच्या अहवालाचे काय करायचे हा प्रश्न काँग्रेसo्रेष्ठींनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकटय़ावरच सोडला असता तर मुख्यमंत्र्यांनी तो फेटाळला नसता आणि पुढील कारवाई सुरू केली असती. परंतु तसे करणे काँग्रेसला परवडणारे नसल्याने हा अहवाल दडपा अशी मसलत मुख्यमंत्र्यांना दिली गेली. वास्तविक जे झाले ते अयोग्यच होते. कोणाही काँग्रेसजनास त्याचे समर्थन करता येणार नाही. तरीही ते करण्याची वेळ काँग्रेसo्रेष्ठींनीच मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर आणली आणि ती तशी येणार असे भाकीत खुद्द चौकशी आयोगाचे प्रमुख न्या. पाटील यांनीही व्यक्त केले होते. तेव्हा त्या अहवालातील सत्याची धग त्या पक्षास किती लागेल याचा अंदाज सर्वानाच होता. अशा वेळी जे करायची इच्छा नाही ते करावयास लावल्यानंतर वास्तविक काँग्रेस नेतृत्वाने आपल्या मुख्यमंत्र्याच्या पाठीशी उभे राहावयास हवे होते. काहीही झाले, कितीही सत्य उजेडात आले तरी आपल्या पक्षाच्या नेत्यास वाचवावे कसे याचे धडे राहुलबाबांना खरे तर त्यांच्या पक्षाचे सहकारी शरद पवार यांच्याकडून घेता आले असते. परंतु तेवढेही चातुर्य त्यांच्याकडे नाही आणि या राहुल गांधींच्या अजाण बाळलीला इतक्या अगाध की त्यामुळे आपल्या पक्षाचाच अनावृत पाश्र्वभाग आपण जगासमोर आणत आहोत हे कळण्याइतकेही भान त्यांना नाही.
हे त्यांच्याबाबत वारंवार घडते याचे कारण त्यांना फक्त फुकाचा सल्ला देत हिंडायचे आहे. त्यामुळे ते सत्ताधारी असूनही आपला पक्ष स्वयंसेवी संस्थेप्रमाणे हाकीत असतात. बरे, त्याबाबतही त्यांचे भूमिकासातत्य नाही. सध्या बाजारात लोकपाल नाव असलेल्या मालास उठाव आहे काय, मग जा मागे लोकपालाच्या किंवा सध्या भ्रष्टाचारविरोधी बोंब ठोकल्यास आपला माल लवकर खपतो असे दिसल्यावर मग ठोका आरोळी भ्रष्टाचारविरोधात असे त्यांचे चालले आहे. कोणत्याही प्रश्नावर सातत्य नाही. लोकपाल मुद्दा त्यांना इतका जवळचा होता तर इतके दिवस ते अण्णा हजारेंना उपोषणाची संधी मिळावी यासाठी वाट पाहत होते की काय? गेल्या नऊ वर्षांत त्यांना या प्रश्नाची उपरती कधी आणि किती वेळा झाली होती? भ्रष्टाचाराने त्यांच्या हृदयास घरे पडत असतील तर ते जेथे राहतात त्याला खेटून असलेल्या हरयाणातील भूपेंदरसिंग हुडा या मुख्यमंत्र्यांच्या उद्योगांशी त्यांचा परिचय नाही काय? या हुडा यांनी जमीन व्यवहारात कमरेचे सोडून डोक्याला बांधायचे तेवढे ठेवले आहे. तेव्हा त्यांच्या उद्योगांविषयी राहुल गांधींनी कधी निषेधाचा ब्रदेखील काढल्याचे ऐकिवात नाही. कदाचित प्रियांकाताईच्या सासुरवाडीचा प्रश्न असल्यामुळे ते गप्प बसले असावेत. कारण काहीही असो. मुद्दा हाच की भ्रष्टाचाराचे वावडे राहुल गांधी यांना आहे, असे मानायचे कारण नाही.
तसे ते असते तर आपल्या वागण्यामुळे महाराष्ट्रात स्वपक्षाचे नुकसान होऊन भ्रष्टशिरोमण्यांच्या राष्ट्रवादीची सरशी होत आहे, हे समजण्याइतका शहाणपणा त्यांनी दाखवला असता. एक पृथ्वीराज चव्हाण सोडले तर महाराष्ट्रात काँग्रेसच्या जमा खात्यात शून्य आहे. तेव्हा त्याच पृथ्वीराजांचे नाक कापण्याचे पुण्यकर्म या राहुलबाबाने केले आहे. त्यांचा पुण्यसंचय असाच होत राहिला तर काँग्रेसला अन्य शत्रूची गरज राहणार नाही. हे चि. बाबामहाराज स्पर्धकाची उणीव एकहाती भरून काढण्याइतके नक्कीच समर्थ आहेत.