आपल्याकडे गावच्या लेखनात शोषण दिसते पण शोषकांचा चेहरा दिसत नाही. दुख, शोषण यांना गोंजारणे, सजवणे यापेक्षा आपल्या परीने त्याचे कलात्म  पातळीवर निर्मूलन करणे, शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहणे, एका चांगल्या जगाची आस पाहणे हाच कोणत्याही श्रेष्ठ प्रतिभावंताचा धर्म असतो.
खेडय़ापाडय़ाचे दर्शन घडविणाऱ्या साहित्याच्या दोन मळवाटा ठरलेल्या होत्या. पहिली मळवाट खेडय़ांचे उदात्तीकरण, गौरवीकरण करण्याची आणि दुसरी मळवाट भडक अशा चित्रणाची. पहिल्या मळवाटेत शेतकरी ‘दिस माथ्यावर’ आल्यानंतरही न्याहरी करताना दिसायचा, तर दुसऱ्या मळवाटेवर (अ)वास्तवालाच बाजारात मांडलेले. एकदा वाटा निश्चित झाल्या आणि त्यावर जाणारांची रीघ सुरू झाली की नवा विचार लवकर होतच नाही. मळवाट जिकडे नेईल त्याच दिशेने जायचे. रस्ता ठरतो आणि त्याच्याबरोबर पूर्वग्रहही घट्ट होतात. सध्या अशा मळवाटा नाकारणारे प्रयोग दिसू लागले तरीही आधीचे संस्कार, पूर्वग्रह आजही अवशेषाच्या रूपाने कुठे कुठे दिसतात.
ग्रामीण भागाच्या उद्ध्वस्तीकरणाची सगळी मुळे जणू आधुनिकीकरणातच आहेत हा त्यातलाच एक पूर्वग्रह. खेडय़ापाडय़ात आधी सगळे गुण्या-गोिवदाने नांदत होते, आधुनिकीकरण आले आणि खेडय़ांचा चेहराच विद्रूप झाला. आधुनिकीकरणाच्या लाटेत गोकुळच हरवले असा या पूर्वग्रहांमधूनच येणारा एक सूर. आधुनिकीकरणाने खेडय़ांची समृद्धी लुबाडली, ओरबाडली, त्यामुळे खेडी नागवी झाली असे म्हणताना आपण किती तरी गोष्टींकडे सतरंजीखाली कचरा ढकलल्याप्रमाणे सहज डोळेझाक करतो. उद्ध्वस्तीकरणाला केवळ आधुनिकीकरणच जबाबदार आहे काय? दुबळ्या माणसाला टाचेखाली रगडणाऱ्यांचे सत्तांध डावपेच, सडत चाललेल्या राजकारणाने घुसमटणारा सर्वसामान्यांचा जीव, सत्तावानांचा अर्निबध आटापिटा आणि त्यात सामान्य माणसाच्या जगण्याचाच होत असलेला संकोच. या सगळ्या गोष्टींना केवळ आधुनिकीकरण जबाबदार आहे काय? तथाकथित आधुनिकीकरण येण्याआधीही दुबळ्यांच्या शोषणाची एक पद्धतशीर व्यवस्था कार्यरत होतीच आणि हे वर्षांनुवष्रे चालले होते. गावोगावी जी सत्तेची बेटे उदयाला आली आणि त्यांना पुढे बाळसे चढले त्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि शोध किती वेळा होतो? आधुनिकीकरणाच्या लाटांकडेच आपण लक्ष देणार असू आणि आतल्या या सगळ्या खदखद, खळबळीकडे डोळेझाक करणार असू तर मग रयतेची खरीखुरी बखर कशी साकारणार? उद्ध्वस्तीकरणाच्या नेमक्या कारणांचा आपल्याला अंदाज येत नाही की आपण त्याकडे सहेतुक दुर्लक्ष करतो हे तपासले पाहिजे. जर खेडय़ांचा चेहरा उद्ध्वस्त झाला आहे तर तो का झाला, ही वाताहत केली कोणी हेसुद्धा दिसायला पाहिजे. आपल्याकडे गावच्या लेखनात शोषण दिसते, पण शोषकांचा चेहरा दिसत नाही.
एकदा पूर्वग्रह पक्के झाले की वास्तवाकडे उघडय़ा नजरेने आणि निकोप मनाने पाहता येत नाही. शेतकरी-शेतमजूर ही सांगड आहे गावपातळीवर. साहित्यात तसे कुठे दिसते? शेतकऱ्यांचे जगणे चित्रित करणाऱ्या लेखनात शेतमजुरांविषयीची अनास्था आणि शेतमजुरांच्या जगण्याची व्यथा सांगणाऱ्या साहित्यात शेतकरी येतो तो खलनायक म्हणून. वास्तवाच्या पातळीवर दोघेही शोषितच, पण साहित्यात मात्र एकमेकांचे शत्रू. गावातल्या चार-दोन धनदांडग्यांचा अपवाद वगळला तर बाकी सगळे एकाच रेषेत जगतात, पण आपल्याकडे लेखक ज्या समूहातून येतो तो त्याच समूहाची भाषा बोलतो. सगळ्या प्रकारची वर्गवारी टाळून वास्तवाला भिडण्याचे प्रयत्न अपवादाने घडतात. आपल्या आस्था फक्त आपल्याच समूहाशी बांधलेल्या असणे हे लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्याच्या साहित्याचाही संकोच करणारे आहे. सगळ्या समाजाला कवेत घेण्याचा कळवळा जोवर येणार नाही तोवर आपल्याकडे  फणीश्वर नाथ ‘रेणू’, प्रेमचंद दिसणारही नाहीत.
या मळवाटांनीच आणखी एक गृहीतक पक्के केले. ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ अशी सरळ वर्गवारी करून टाकली. शहरी आक्रमणांनी खेडी गिळंकृत केली असे सांगितले की, मग खेडय़ातला वर्गसंघर्ष आणि शोषण व्यवस्था उकलण्याची गरजच भासत नाही. ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ ही दोन टोके आहेतही, पण हे इतके ढोबळपणे सांगितले जाऊ शकत नाही. आता हा संघर्ष घराघरांतही जाणवू लागला आहे. शहरातल्या भावाची मुले इंग्रजी शाळेत आणि गावाकडच्या शेती करणाऱ्या भावाची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत. अशा वेळी ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ हा संघर्ष कुठे दूर नाही, तर तो घराघरातही दिसू शकतो. मात्र पायाखाली काही तरी जळत असताना दूर कुठे दिगंताकडे नजर लावण्याची आपल्याला सवय झाली आहे.
गावपातळीवर पडझड होत असताना नवे काही आकाराला येत आहे. या प्रक्रियेला सुरुवात होऊनही मोठा कालावधी लोटला आहे. ग्रामीण भागाच्या कोसळणीची, माणूस मुळापासून उखडला जाण्याची वर्णने आपल्याकडे भेदकतेने येतात, पण जी नवी चाहूल आहे तीही उमटायला हवी. एकदा कोसळूनही माणसे पुन्हा जिवाच्या कराराने उभी राहतात. कोठून येते हे बळ? कोणती ऊर्जा त्यांना उभे करते? हेही पाहायला हवे. सारे शिवार डोलते आहे आणि शेतकरी आपल्या कारभारणीची वाट पाहत बांधावर बसलेला आहे. मग बांधावर बसून त्यांच्या काही तरी गुजगोष्टी चालल्या आहेत.. असे आता काही वाचायला मिळत नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट.
बऱ्याचदा प्रश्नही येतात पण त्यातली व्यामिश्रता आणि गुंतागुंत जाणवत नाही. वरवरच्या चित्रणानेच बराचसा भाग उरकलेला असतो. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्यानंतर जेव्हा हे अनुभव अनेक कवितांमध्ये आले तेव्हा शब्दांचा सारा पसारा हिमनगाचे वरचे टोक सांगणाराच होता. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर उघडय़ावर आलेली त्याची पोरेबाळे, पांढरे कपाळ घेऊन आक्रोश करणारी त्याची पत्नी, कुटुंबाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि दारात उभा असलेला सावकार असे तपशील सांगणारे लेखन खूप झाले, पण कोणत्या परिस्थितीचे, वास्तवाचे घुसमटून टाकणारे रसायन शेतकऱ्याला आत्महत्येच्या कडय़ावर आणून उभे करते, ती खदखद आणि खळबळ किती ठिकाणी व्यक्त झाली, असा प्रश्न उपस्थित केला तर फारच मोजके अपवाद उत्तर म्हणून हाती येतात. मरणाच्या दारापर्यंत पोहोचलेल्या माणसालाही जगण्याची आशा निर्माण करून खचलेल्या माणसाला उभे करील असा शब्द देण्याची जबाबदारी ज्यांनी पार पाडली त्यांचे शब्द काळाच्या पटावर टिकले आहेत. साने गुरुजी यांच्यासारखे आईचे काळीज असणारा प्रतिभावंत माणूसही ‘लुटारूंच्या आता थांबवू या मौजा, कोटी कोटी किसानांचा फणा करी शेष’ असे लिहून जातो तेव्हा त्यातली यथार्थता समजून घेतली पाहिजे. दु:ख, शोषण यांना गोंजारणे, सजवणे यापेक्षा आपल्या परीने त्याचे कलात्म पातळीवर निर्मूलन करणे, शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहणे, एका चांगल्या जगाची आस पाहणे हाच कोणत्याही श्रेष्ठ प्रतिभावंताचा धर्म असतो.
मळवाटेवर खाचखळगे नसतात आणि पाय खरचटण्याची, रक्ताळण्याची शक्यताही नसते. मळवाटा नाकारताना एक जोखीम असते. नव्या वाटा शोधताना पावलोपावली खाचखळगे आहेत, पण ‘सावध ऐका पुढल्या हाका’ हे तत्त्व अशा वाटा अनुसरतानाच आढळते. आता मळवाटा नाकारणाऱ्या वाटसरूंची संख्याही वाढत आहे, पण आधीच्या मळवाटांनी आखून दिलेल्या चौकटी आणि घालून दिलेले पूर्वग्रह बराच काळ साहित्यावर दाट सावलीसारखे पसरलेले होते हे मात्र खरे.