scorecardresearch

Premium

अग्रलेख : आनंद ते प्रज्ञानंद..

आजही बहुतांश बुद्धिबळपटूंना सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचाच नोकरी वा तत्सम स्वरूपात आधार असतो, ते बदलून यासाठी खासगी क्षेत्राने मोठय़ा प्रमाणात पुढे यायला हवे.

vishwanathan anand and pragyanand
अग्रलेख : आनंद ते प्रज्ञानंद..

..आनंदनंतर आहेच कोण, या प्रश्नाचे उत्तर ‘प्रज्ञानंद’ असे वास्तवात आणायची जबाबदारी त्याची किंवा त्याच्या आईचीच नाही, तर आपलीही आहे.

चंद्रयान-३ मोहिमेचा परमबिंदू आणि बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताचा आर. प्रज्ञानंद आणि माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसन यांच्यातील अंतिम लढतीची संभाव्य परिणती असा योग बुधवारी सायंकाळी साधारण एकाच वेळेत जुळून आला होता. चंद्रयान-३ आणि प्रज्ञानंद हे आपापल्या मोहिमेत एकाच दिवशी, एकाच वेळी यशस्वी व्हावेत, अशी अपेक्षा साक्षात विश्वनाथन आनंदने बोलून दाखवली होती. त्याच्या बरोबरीने कोटय़वधी भारतीयांच्या मनातील पहिली अपेक्षा सुफळ पूर्ण झाली, दुसरी मात्र अधुरी राहिली. हे चालायचेच. चंद्रयान-२च्या अपयशाच्या कमानीखालून निघून, त्यापासून बहुमोल धडे घेऊन चंद्रयान-३ मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने यशस्वी करून दाखवली. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन कार्लसनकडून झालेला पराभवही प्रज्ञानंदसाठी भविष्यात अधिक चांगल्या कामगिरीसाठी उपयोगी ठरू शकेल. चंद्रयान-३ मोहीम अत्यंत खडतर आणि गुंतागुंतीची होती. प्रज्ञानंदसमोरील आव्हानही कमी खडतर नव्हते. त्याच्यासमोर होता माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसन.

higher and technical education minister chandrakant patil, naac accreditation, union minister dharmendra pradhan
नॅक मूल्यांकन प्रक्रिया सुलभ, परवडणारी करा; चंद्रकांत पाटील यांची धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी
India accounted for 20 per cent of global pre term births says Lancet study Premature baby rate increase in india
देशात प्रीमॅच्युअर बेबीजचं प्रमाण २० टक्के; लॅन्सेटच्या अहवालातून वास्तव उघड
maternity leave
महिंद्रा अँड महिंद्राचा महिलांसाठी विशेष उपक्रम, मिळणार पाच वर्षांची मॅटर्निटी लीव्ह
vedanta group
वेदान्त समूहातील व्यवसायांचे विलगीकरण; पाच नवीन सूचिबद्ध कंपन्या उदयास येणार

पाच वेळचा जगज्जेता आणि ‘पुरेशा क्षमतेचे आव्हानवीर हल्ली मिळत नाहीत’, असे सांगून जगज्जेतेपदावर पाणी सोडलेला, पण आजही जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला बुद्धिबळसम्राट. सन २०११पासून हा जागतिक बुद्धिबळात अग्रक्रमांकावर अढळस्थानी आहे. २०१३मध्ये त्याने विश्वनाथन आनंदचा पराभव करून जगज्जेतेपद पटकावले होते. निव्वळ ‘विरंगुळा’ म्हणून यंदा विश्वचषकात खेळला. विश्वचषक हे त्याचे या खेळातील ५०वे अजिंक्यपद. बुद्धिबळामध्ये इतके सारे मिळवूनही कार्लसन केवळ ३२ वर्षांचा आहे. तरीही विद्यमान तरुण तुर्क ‘प्रज्ञावानां’च्या मांदियाळीत तो ‘म्हातारा’ ठरणे हे अगदी स्वाभाविक. कारण प्रज्ञानंद केवळ १८ वर्षांचा आहे. कार्लसन ज्याचे प्रज्ञानंदपेक्षाही अधिक कौतुक करतो असा तो गुकेश १७ वर्षांचा आहे. विश्वचषक उपान्त्यपूर्व फेरीत प्रज्ञानंदशी पराभूत झाला, तो अर्जुन एरिगेसी १९ वर्षांचा आहे. ज्या वयात आपल्याकडील मुले दहावी-बारावी होतात, त्याच्याही आधीच्या वयात ही मंडळी ग्रँडमास्टर बनली! आणि जेव्हा बहुतेक मुले पदवी पदरात पाडून परदेशात अध्ययनाला जाण्याची स्वप्ने त्यांच्या पालकांसमवेत पाहू लागतात, त्या वयात आपले तरुण बुद्धिबळपटू आजी-माजी जगज्जेत्यांशी आणि अव्वल बुद्धिबळपटूंशी भिडत आहेत. प्रज्ञानंद तर आता कँडिडेट्स स्पर्धासाठी पात्र ठरल्यामुळे जगज्जेतेपदाच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. १८व्या वर्षी विश्वनाथन आनंद भारताचा पहिला ग्रँडमास्टर बनला होता. त्या वयात प्रज्ञानंद विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होता. आनंद ते प्रज्ञानंद साडेतीन दशकांच्या प्रवासाचा आढावा ६४ चौकोनांच्या पटापलीकडे जाऊनच घ्यावा लागेल.

याचे कारण आनंद हा येथील व्यवस्थेचा परिपाक नव्हता. तो शाळकरी असताना वडिलांच्या बदलीमुळे फिलिपिन्सला पोहोचला आणि तेथील बुद्धिबळस्नेही संस्कृतीचा त्याला फायदा झाला. तरुणपणीदेखील भारत सोडून युरोपला गेल्यानंतरच त्याची प्रतिभा अधिक झळाळू लागली. हा नव्वदच्या दशकाचा काळ. याच काळात आर्थिक आणि व्यापारी विलगीकरण त्यागून जागतिक अर्थव्यवस्थेशी भारताला संलग्न करण्याचे महत्त्वाचे काम नरसिंह राव-मनमोहन प्रभृतींनी केले. याचा काही प्रमाणात फायदा क्रीडा क्षेत्रालाही होऊ लागला. त्यामुळे त्या दशकात नाही, तरी पुढील दशकात आणि विशेषत: नवीन सहस्रकात परदेशी बुद्धिबळ स्पर्धा आणि परदेशी प्रशिक्षक यांच्या सान्निध्याची जोड भारतातील भूमिभूत गुणवत्तेला मिळाली आणि ग्रँडमास्टरांची संख्या वाढू लागली. अर्थात त्या किंवा त्यानंतरच्या पिढीसमोर आनंदव्यतिरिक्त इतर कोणाचा आदर्श असणे शक्यच नव्हते. कारण याच दरम्यान आनंदही अनेकदा बुद्धिबळ जगज्जेता बनू लागला होता. याच काळात एक महत्त्वाचा बदल दिसून येत होता. इतकी वर्षे बुद्धिबळातली महासत्ता असलेला सोव्हिएत महासंघ किंवा विघटनानंतरचा रशिया या देशाची बुद्धिबळातली सद्दी संपुष्टात येत होती. त्याऐवजी भारत आणि चीन या देशांतील बुद्धिबळपटू झपाटय़ाने प्रगती करत होते. आज भारतात पुरुषांमध्ये ८३ ग्रँडमास्टर आहेत. पहिल्या दहात आता दोन भारतीय बुद्धिबळपटू आहेत आणि आनंद हा भारताचा अव्वल बुद्धिबळपटू राहिलेला नाही! तर विद्यमान पुरुष आणि महिला बुद्धिबळ जगज्जेते हे चीनचे आहेत. रशियाला बंदिस्त साचलेपणाचा फटका बसला. तेथेच भारत आणि चीनला प्रवाही आणि मुक्त व्यवस्थेचा फायदा झाला. अमेरिकेसारख्या देशामध्ये उत्तमोत्तम बुद्धिबळपटू स्थलांतरित झाल्यामुळे हा देश आज या खेळातील महासत्ता बनला आहे.

जागतिक प्रवाहांमुळे हे बदल काही प्रमाणात घडून आले हे सत्य. पण या युगामागील खरी ताकद आजही भारतातील महत्त्वाकांक्षी आणि मूल्यमार्गी कुटुंबव्यवस्था हीच आहे. प्रज्ञानंदचा प्रशिक्षक आर. बी. रमेशने तरुण वयात सरकारी नोकरी सोडली. प्रज्ञानंदच्या आईवडिलांनी त्याच्या सुरुवातीच्या परदेश दौऱ्यासाठी कर्जे काढली. प्रज्ञानंदची आई आजही त्याच्या समवेत महत्त्वाच्या स्पर्धासाठी जाते. याशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये विशेषत: दाक्षिणात्य राज्यांमध्ये बुद्धिबळ, बॅडिमटन अशा खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण झाले याचे श्रेय तेथील अभ्यासू संस्कृतीलाही द्यावे लागेल. याच संस्कृतीमुळे ‘इस्रो’सारख्या संघटनांची केंद्रे बंगळूरु आणि तिरुअनंतपुरम येथे असतात. चेन्नई हे जगातील उत्तमोत्तम बुद्धिबळपटू घडवणारे नगर बनते. आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातून बॅडिमटन जेते निर्माण होतात. (हे काही प्रमाणात थोडे आधी महाराष्ट्रातही आढळून आले होते. पण आता महाराष्ट्राची ‘संस्कृती’च बदललेली आहे. पण तो स्वतंत्र विषय!) प्रज्ञानंद, गुकेश, एरिगेसी, निहाल सरिन हे दक्षिणेतून येतात हा त्यामुळेच योगायोग नाही. यांच्यातीलच कोणीतरी एखादा किंवा अधिक जण बुद्धिबळ जगज्जेते बनू शकतात अशी शक्यता आनंदपासून कार्लसनपर्यंत बहुतांनी व्यक्त केली आहे. कोणत्याही क्रीडापटूच्या जीवनातील हा कालखंड सर्वाधिक कसोटीचा. गुणवत्ता दिसली, बडय़ांशी टक्कर घेण्याची मनोवृत्ती दिसली हे ठीक. पण येथून पुढे सातत्य आणि मोक्याच्या क्षणी विचलित न होण्याचा निर्धार दाखवावा लागणार. अशाच एका क्षणी कार्लसनने प्रज्ञानंदला गाफील गाठून बाजी उलटवली. त्यामुळे हे भान प्रज्ञानंद किंवा त्याच्यासारख्यांना दाखवावे लागेल. 

आनंदपासून सुरू झालेला हा प्रवास प्रज्ञानंदपाशी थांबणार नाही आणि थांबूही नये. संघटनात्मक पातळीवर भारतीय बुद्धिबळ सक्षम बनले आहे. चांगल्या स्पर्धाही होऊ लागल्या आहेत. तरीही टाटा, मिहद्रासारखे मोजकेच उद्योगसमूह या खेळाला पाठबळ देताना दिसतात. हे कुठेतरी बदलले पाहिजे. आजही केवळ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचाच बहुतांश बुद्धिबळपटूंना नोकरी वा तत्सम स्वरूपात आधार असतो. यासाठी खासगी क्षेत्राने मोठय़ा प्रमाणात पुढे यायला हवे. कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रात पहिले प्रयोग खऱ्या अर्थाने बुद्धिबळाच्या पटावरच झाले होते. या क्षेत्रातील नवउद्यमींकडून बुद्धिबळाला पाठबळ देण्याचा विचार होणे अस्थानी ठरणार नाही. १८ वर्षांचा पोरगेलासा युवक त्या खेळातील सर्वशक्तिमानाशी टक्कर घेत आहे असे इतर खेळांच्या बाबतीत भारतात आणि बाहेर क्वचितच घडताना दिसते. प्रज्ञानंदने अब्जावधी अपेक्षा खांद्यावर तोलत-पेलत ६४ चौकोनांच्या पटावर ही कामगिरी करून दाखवली. या कणखरपणाला दाद देत कार्लसननेही प्रज्ञानंदचा उल्लेख ‘मेटॅलिटी मॉन्स्टर’ असा केला होता. आनंदनंतर आहेच कोण, या प्रश्नाचे उत्तर ‘प्रज्ञानंद’ असे वास्तवात आणायची जबाबदारी त्याची किंवा त्याच्या आईचीच नाही. आपलीही आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After viswanathan anand chess world cup pragnananda magnus carlsen final fight ysh

First published on: 26-08-2023 at 00:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×