शिखर बँकेतील वा सिंचनासंदर्भातील घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरण, दाभोलकर ते शीना बोरा हत्या खटले यांचे तपास इतक्याच तत्परतेने तडीस गेले काय?

सलमान खान ही व्यक्ती, कलाकार याविषयी ‘लोकसत्ता’स आकस, असूया वा आनंद इत्यादी काहीही असण्याचे कारण नाही. तो माणूस म्हणून कसा आहे आणि कलाकार म्हणून किती सकस वा हिणकस आहे या विषयीही उठाठेव करण्याचे ‘लोकसत्ता’स कारण नाही. त्याचे चित्रपट, त्याच्या भूमिका, त्याचे दिसणे/वागणे इत्यादी विषयही ‘लोकसत्ता’ने आवर्जून दखल घ्यायला हवी असे नाहीत. त्याने काही सामाजिक/राजकीय भूमिका घेतली असेही काही नाही. ‘‘माझ्या घरासमोरून मी उड्डाणपूल जाऊ देणार नाही’’, असे काही त्याने कधी केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे अशा काही कारणांसाठीही त्याची दखल घेण्याची गरज ‘लोकसत्ता’स वाटलेली नाही. समाजात अनेक शहाणी माणसे ‘आपण बरे, आपले काम बरे’ अशा सुज्ञपणे जगत असतात. सलमान खान अशांतील एक असावा असे मानण्यास जागा आहे. ‘कोणाच्या अध्यात ना मध्यात’ हा गुण मानला जाणाऱ्या समाजात अशा व्यक्तींचे तसे उत्तम चालते. (या ‘गुणाविषयी’ प्रबोधनकार ठाकरे यांचे मत आजही अ-छाप्य ठरेल. असो) तेव्हा त्या अर्थाने सलमान खान यांचे तसे उत्तम सुरू असणार. ते तसे चालावे आणि त्यांचा उत्तरोत्तर उत्कर्ष व्हावा यासाठी ‘लोकसत्ता’च्या शुभेच्छा. त्या सुरुवातीलाच दिल्या कारण त्यावरून त्यांच्याविषयी ‘लोकसत्ता’च्या काहीही कटू भावना नाहीत, हे लक्षात यावे. कारण प्रश्न सलमान खान यांचा नाहीच.

lokmanas
लोकमानस: अस्मिता नव्हे, घटनेच्या मुद्दय़ावर मतदान
article about right to maintenance in cases of unemployed husband
बेरोजगार पती आणि देखभाल खर्च…
Do women play the politics of sexual violence
स्त्रिया काय लैंगिक अत्याचाराचं राजकारण करताहेत का?
Hindutva
हिंदी पट्ट्यातले ‘हिंदुत्व’ भाजपला यंदाही तारेल?
Arvind Kejriwal interview Prime Minister Modi Amit Shah BJP aam aadmi party
पंचहात्तरीनंतर निवृत्त होण्याचा स्वत:चाच नियम मोदी का पाळणार नाहीत? केजरीवाल म्हणाले…
present government says Criticism of Afzal Ansari
“बेरोजगारी, महागाई अन् भ्रष्टाचार हे सर्वात मोठे प्रश्न; सध्याच्या सरकारकडून सर्वसामान्यांना काहीच मिळाले नाही”; अफझल अन्सारींची टीका
AAP named as accused in Delhi liquor policy case
विश्लेषण : भ्रष्टाचारात राजकीय पक्षच ‘आरोपी’ ठरू शकतो?
AAP also accused in Delhi liquor scam But can an entire political party be accused in a case
दिल्ली मद्य घोटाळ्यात ‘आप’ही आरोपी… पण एखाद्या प्रकरणात संपूर्ण राजकीय पक्षच आरोपी होऊ शकतो का?

तो आहे नियमाधारित व्यवस्थेतील एक समाज म्हणून आपले प्राधान्यक्रम नक्की काय आहेत, हा! गेला आठवडाभर जे काही सुरू आहे त्यावरून हा प्रश्न पडतो. या सलमान खानच्या घराच्या भिंतीवर भल्या पहाटे गोळीबार झाला. असे काही होणे अर्थातच त्याज्य. पण हा गोळीबार झाला त्यावेळी त्या ठिकाणी ना सलमान खान होता ना त्यांचे अन्य कोणी नातेवाईक वा घरातील कोणी नोकरचाकर. पहाटे कोणी दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि घराच्या भिंतीवर दोन गोळ्या झाडून निघून गेले, इतकेच काय ते घडले. पण त्यानंतर आपल्या यंत्रणांची जी काही तारांबळ सुरू आहे ती पाहिल्यावर एक नागरिक म्हणून हसावे की रडावे हा प्रश्न पडतो. या प्रकरणातील गुन्हेगार कोण होते याच्या चर्चा काय होतात, त्या कथित टोळीची कुंडली काय मांडली जाते, त्या गुन्हेगारांचे वास्तव्य मुंबईत यायच्या आधी कोठे कोठे होते त्याचे दाखले काय दिले जातात, त्यांच्या मागावर सर्व सरकारी यंत्रणा काय लागतात आणि मुंबई पोलिसांतील ‘चकमकफेम’ म्हणून (?) गौरवले जाणारे पोलीस अधिकारी गुजरातेत जाऊन तापी नदीत डुबक्या मारून या कथित हल्ल्यातील कथित रिव्हॉल्व्हर काय शोधून काढतात आणि मुंबईत येऊन ते मिरवतात काय… सगळेच हास्यास्पद. इतकेच नव्हे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांस जातीने या सलमानच्या घरी जाऊन त्याची वास्तपुस्त करावी असे वाटते. आणि ही सर्व लगबग कशासाठी? तर जो गुन्हा प्रत्यक्षात घडलेलाच नाही त्यासाठी. याच महाराष्ट्राच्या राजधानीत काही वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या २७ मजली निवासस्थानापाशी काही स्फोटकांच्या नळकांड्या फक्त आढळल्या. ‘फक्त’ अशासाठी म्हणायचे कारण त्या नळकांड्यांचा स्फोट होईल असे काही घटनास्थळी घडले नव्हते. अंबानी यांच्याबाबत जे झाले ते वाईटच. पण यातील एक सत्य असे की समजा या नळकांड्यांचा स्फोट जरी झाला असता तरी अंबानी यांच्या २७ मजली इमल्याचा टवकाही उडाला नसता. पण तरी त्यावरून मोठे महाभारत घडले आणि अगदी राज्याच्या गृहमंत्र्यांवर तुरुंगात जाण्याची वेळ आली. ती घटना आणि सलमान खान यांच्या घराच्या भिंतीवर पहाटे झालेला गोळीबार यांत एक साम्य आहे.

प्रत्यक्षात जे गुन्हे घडलेलेच नाहीत त्यांच्या शोधार्थ आपली पोलीस यंत्रणा किती कसून प्रयत्न करते, हे यांतील साम्य. ज्यांच्याविरोधात हे प्रकार घडले त्या दोन्ही तारांकित व्यक्ती. तेव्हा समर्थाच्या घराच्या श्वानासही ज्याप्रमाणे सर्वांकडून मान मिळतो त्याप्रमाणे या तारांकितांच्या विरोधात न घडलेल्या गुन्ह्यांचीही दखल सरकारी यंत्रणा तत्परतेने घेत असेल तर ते एकवेळ समजून घेता येईल. पण हीच यंत्रणा खरोखर घडलेल्या गुन्ह्यांच्या शोधाबाबत इतकी तत्परता दाखवते का? उदाहरणार्थ नरेंद्र दाभोलकर यांच्या घराच्या भिंतीवर नव्हे तर थेट त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली गेली. गोविंद पानसरे यांच्याबाबतही असेच घडले. तेही तसेच गेले. हे झाले हत्यांबाबत. पण याच राज्याच्या राजधानीत मुख्यालय असलेल्या राज्य मध्यवर्ती शिखर बँकेत सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले. कधी? २०११ साली. त्यावेळी याच राज्याच्या सरकारने त्या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. या गुन्ह्यांत कोणाचा हात इत्यादी चर्चा झडल्या. पण त्यातील गुन्हेगारांचा शोध घेणे राहिले दूर; प्रत्यक्षात हा गुन्हाच घडला नाही, असा अहवाल सलमान खान यांच्या घराच्या भिंतीवर गोळ्या झाडणाऱ्यांचा सत्वर शोध घेणारे पोलीस खाते १३ वर्षांनंतर देते; हे कसे? याच राज्यात २०१४ च्या आधी सिंचन घोटाळा गाज गाज गाजवला गेला. त्यातील आरोपी कोण त्याची चर्चाही झाली. वा करवली गेली. पण या प्रकरणातदेखील काही गुन्हा घडलाच नाही असा अहवाल सलमान खानच्या घराच्या भिंतीवर गोळ्या झाडणाऱ्याचा त्वरित माग काढणारे प्रशासन देते; हे कसे? अगदी अलीकडे राज्यात फोन टॅपिंग प्रकरण गाजले. केंद्रातील विद्यामान सत्ताधाऱ्यांस विरोध करणाऱ्या नेत्यांचे फोन चोरून ऐकले जात होते, असे आरोप झाले आणि त्याबाबत अनेकांनी तपशीलही सादर केला. त्या चौकशीचे पुढे काय झाले? की पोलिसांनी हे प्रकरण तपासाअभावी बंद करत असल्याचे न्यायालयास सांगितले? याच मुंबईत शीना बोरा खून खटला गाजला. तिचे नक्की मारेकरी कोण, याचा तपास लागला काय? याच महानगरात दोन वर्षांपूर्वी तीनेक कोटी रुपयांचे हिरे चोरीस गेल्याचे उघडकीस आले. त्याचा तपास लागला का? की पोलिसांनी न्यायालयात हे प्रकरण बंद करत असल्याचे सांगून टाकले? अर्थात यात एकट्या मुंबई पोलिसांना लक्ष्य करणे अयोग्य, हे खरे. महाराष्ट्राच्या राजधानीत जे घडले/ घडते/ घडेल त्याचे नाते देशाच्या राजधानीत जे काही घडले/ घडते/ घडेल त्याच्याशी असते. उदाहरणार्थ आरुषी तलवार हिची हत्या. ती कोणी केली हे तिच्या १५ व्या वर्षश्राद्धानंतरही कळलेले नाही. असे किती दाखले द्यावेत? सुनंदा पुष्कर, अमरसिंग चमकीला इत्यादी उदाहरणे या संदर्भात देता येतील.

तेव्हा मुद्दा इतकाच की प्रत्यक्षात अनेक घडलेल्या गुन्ह्यांतील आरोपींचा छडा लावण्यात, गुन्हेगारांना शिक्षा करण्यात आपल्या प्रशासनास इतके भव्य अपयश येत असताना एका न घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींच्या पकडापकडीचे इतके कौतुक का? याच मुंबईत २२ वर्षांपूर्वी पाच जण अशाच एका तारांकित व्यक्तीच्या मोटारीखाली चिरडून गेले. त्या ‘अपघाता’चा सलमान खान यांच्याशी काय संबंध होता ते हुडकून काढण्यात याच मुंबईच्या पोलिसांनी किती तत्परता दाखवली होती, हे सर्वज्ञात आहेच. त्या प्रकरणात प्रत्यक्षात काहींचा जीव गेला होता. आधीच आपल्या देशातील सामान्यांस आकाशातील आणि जमिनीवरील अस्मानीचा सामना करावा लागतो. त्यात आता ही प्रशासकीय अतिउत्साहाची सलमानी सुल्तानी! सार्वजनिक विवेकाचे महत्त्व आपणास कधी कळणार, ही यामागील खरी चिंता.