‘विनाशपुरुष’, ‘जुमलाजीवी’, ‘भ्रष्ट’ किंवा ‘विश्वासघात’, ‘लैंगिक छळ’ हे शब्द असंसदीय ठरवण्यातून सत्ताधाऱ्यांवरील संस्कार दिसून येतात..

येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या लोकसभा सचिवालयाने अनेक शब्द असंसदीय ठरवले आहेत. यात आश्चर्य नाही याची प्रमुख कारणे दोन. पहिले म्हणजे हे सद्गृहस्थ वाक्पटुत्व, विद्वत्ता आदींसाठी ओळखले जातात असे नाही. ज्यांनी आपणास या पदावर नेमले त्यांच्या ऋणात राहणे, त्यांस कमीतकमी त्रास होईल यासाठी कार्यतत्पर असणे असाच त्यांचा लौकिक आणि तसेच त्यांचे वर्तन. बहुधा त्यामुळेच त्यांच्या चेहऱ्यावर सतत तृप्ततेची एक अदृश्य साय कायम असते आणि ही तृप्तता त्यांच्या सदैव सस्मित चेहऱ्यावर नांदतानाही दिसते. आणि दुसरे कारण म्हणजे ते ज्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात तीत उच्चपदस्थांस जाब विचारण्याची पद्धत नाही. उलट तसे करणे म्हणजे पापच असे त्या विचारधारेत मानतात. ‘बाबा वाक्यं प्रमाणम’ हेच जीवनविषयक तत्त्वज्ञान असेल तर कशास हवे ते खंडन मंडन आणि शाब्दिक वाक्ताडन असा विचार त्यांनी केलाच नसेल असे नाही. ‘ठेविले अनंते तैसेचि’ राहायचे हे एकदा का नक्की झाले की ‘चित्ती असो द्यावे समाधान’ हे शहाणपण आपोआप येत असावे. त्यामुळे ‘भ्रष्ट’, ‘लज्जित’, ‘नाटक’, ‘विश्वासघात’, ‘जुमलाजीवी’, ‘बालबुद्धी’, ‘शकुनी’, ‘विनाशपुरुष’, ‘हुकूमशाही’, ‘गाढव’, ‘गुंडागर्दी’, ‘दलाल’, ‘मूर्ख’, ‘लैंगिक छळ’ अशा अनेक शब्दांचे उच्चारण त्यांनी असंसदीय ठरवले. सर्वसाधारणपणे या अशा शब्दांचा वापर हा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप यांतच होतो. तेव्हा आगामी अधिवेशनात काही आरोप-प्रत्यारोप होऊच नयेत, अशी त्यांची इच्छा असणार. अधिकारपदस्थ जे काही सांगतात ते समोरच्यांनी मुकाट ऐकावे, त्यांना प्रत्युत्तर देऊ नये की दुरुत्तर करू नये, असेच संस्कार असले की संसदीय चर्चा, वाद-प्रतिवाद यांची मातबरी ती काय?

Did Marathas renamed Ramgarh as Aligarh
मराठ्यांनी रामगढचे अलिगढ असे नामांतर केले? इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णींनी मांडलं सत्य
vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
cabinet minister nitin gadkari news
पुढील पंतप्रधान तुम्ही होणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं…

तथापि केवळ शब्द श्लील-अश्लील असे काही नसतात. त्यांचे उच्चारण ज्या पद्धतीने केले जाते, त्यावेळचे हावभाव, हातवारे आदींमुळे त्या शब्दाचा अपेक्षित अर्थ पोहोचवता येतो. त्यामुळे केवळ शब्दांना असंसदीय ठरवून काम होणारे नाही. उदाहरणार्थ ‘विद्वान’ हा किंवा अलीकडचा म्हणजे ‘विश्वगुरू’ हे शब्द. तसे पाहू गेल्यास या शब्दांना आक्षेप घेण्यासारखे काही आहे हे जाणवणारही नाही. पण तरीही या दोन्ही शब्दांच्या उच्चारणाची शैली, त्यावेळची देहबोली यामुळे ते अत्यंत अपमानास्पद ठरू शकतात. इतके की ‘अशा’ पद्धतीने विद्वान म्हणवून घेण्यापेक्षा ‘मूर्ख’ म्हणवून घेणे अधिक सुसह्य ठरावे. तेव्हा तेही असंसदीय ठरवणार काय? ‘जेम्स मायकेल लिंगडोह’ हे वरवर पाहू जाता देशाच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचे पूर्ण नाव फक्त. पण त्यांचे उच्चारण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी अशा तऱ्हेने केले गेले की ती व्यक्ती, तिचा धर्म हे सर्व त्यातून ध्वनीत व्हावे आणि त्याविषयी ऐकणाऱ्याच्या मनात अप्रिय भावना निर्माण व्हावी. तेव्हा तेही असंसदीय ठरवले जाईल काय? बिर्ला यांची गेल्या काही वर्षांची कार्यपद्धती पाहू जाता त्यांनी भाषा, अभिव्यक्ती, त्यासह येणारी देहबोली आदींचा इतका विचार केला असेल असे मानणे हा फारच मोठा आशावाद झाला. तेव्हा त्यांच्या या निर्णयावर सध्याच्या राजकीय रीतिरिवाजाप्रमाणे जोरदार टीका होईल, आक्षेप घेतले जातील आणि सत्ताधारी हे किती ‘हुकूमशाही’ वृत्तीचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न होईल. पण संसदेत हा ‘हुकूमशाही’ प्रवृत्तीचा आरोप करता येणार नाही. कारण तो अंससदीय असल्याचे सभापती महोदयांस वाटते. पण म्हणून विरोधकांनी हाय खाण्याचे अथवा हार मानण्याचे काहीही कारण नाही. सभापती महोदयांनी केला असेल/नसेल पण विरोधकांनी भारतीय संसदेतील भाषणांचा जरूर अभ्यास करावा, इंग्रजीचे आस्वादक असतील त्यांनी ब्रिटिश खासदारांच्या पार्लमेंटमधील वाक्चातुर्याचे संकलन असलेल्या ‘ऑनरेबल इनसल्ट्स’सारख्या पुस्तकाचे जाहीर वाचन करावे. याचे कारण सभापतींच्या अशा आदेशास, सत्ताधाऱ्यांस अडचणीचे वाटतील असे शब्द असंसदीय ठरवण्याच्या कारवाईस त्यामुळे सहज वळसा मारून हवे ते बोलता येते.

याची उदाहरणे भारताच्या सांसदीय इतिहासातही अनेक आढळतील. स्वतंत्र पक्षाचे खासदार पिलू मोदी यांच्यावर काँग्रेसचे जे. सी. जैन अद्वातद्वा आरोप करत असता मोदी यांचा संयम सुटून ते जैन यांच्यावर ‘स्टॉप बार्किंग’ (भुंकणे थांबवा) असे डाफरले. त्यास जैन यांनी आक्षेप घेतला आणि मोदी आपणास कुत्रा म्हणत असल्याची तक्रार सभापतींकडे केली. सभापतींनी ती ग्राह्य ठरवली आणि ‘बार्क’ हा शब्द मागे घेण्याचा आदेश मोदी यांना दिला. मोदी यांनी तो स्वीकारला आणि वर म्हणाले: ओके. स्टॉप ब्रेियग! (गाढवाच्या ओरडण्यास ब्रेियग असे म्हणतात). जैन यांस हा शब्द माहीत नसल्याने तो असंसदीय ठरला नाही आणि कामकाजात राहिला. पं. नेहरूकालीन ज्येष्ठ राजकारणी टी. टी. कृष्णम्माचारी यांनी फिरोज गांधी यांचा अत्यंत अपमानास्पदपणे ‘नेहरूज लॅपडॉग’ (नेहरूंच्या मांडीवरील कुत्रा) असा उल्लेख केला. फिरोज गांधी हे इंदिरा गांधी यांचे पती आणि म्हणून पं. नेहरू यांचे जावई होते. तथापि या अशा त्यांच्या शब्दयोजनेवर संसदेत काहीही हलकल्लोळ झाला नाही की आज्ञाधारक काँग्रेसी आमच्या नेत्याच्या जावयाचा असा उल्लेख करता म्हणून कृष्णम्माचारी यांच्यावर तुटून पडले नाहीत. नंतर फिरोज गांधी यांनी आपल्या भाषणात कृष्णम्माचारी यांच्या वक्तव्याचा दाखला दिला आणि उलट त्यांचे वर्णन ‘लोकशाहीचा खंदा आधारस्तंभ’ अशा गौरवपूर्ण शब्दांत केले. त्यानंतर गांधी एवढेच म्हणाले : तथापि कोणत्याही स्तंभास कोणताही कुत्रा जी वागणूक देतो तीच वागणूक नेहरूंचा लॅपडॉग त्यांना देईल. या अशा वाक्चातुर्याचे अनेक नमुने देता येतील आणि संसदेच्या वाचनालयात त्याचे संकलनही आढळेल. तेव्हा एखाद्याचा उल्लेख ‘नालायक’ या शब्दांत करणे असंसदीय असेल. पण त्याचे वर्णन ‘लायकीहीन’ किंवा ‘लायकीशून्य’ करणे निश्चितच असंसदीय नाही. ‘मूर्ख’ हा शब्द ओम बिर्ला यांच्या मते आता लोकसभेत वापरता येणार नाही. पण ज्यास मूर्ख म्हणायचे आहे त्याचे वर्णन ‘शहाणपणाचा पूर्ण अभाव असलेला’ असे करण्याची सोय आहेच. पिलू मोदी लोकसभेत येताना गळय़ात ‘मी सीआयएचा हस्तक आहे’ असा फलक घालून घेऊन आले असता सभापतींनी त्यांना असे करण्यास मनाई केली. त्यावर ‘मी यापुढे सीआयएचा हस्तक नाही’ असा बदल मोदी यांनी केला. याचा अर्थ इतकाच की जे म्हणायचे आहे ते म्हणण्यास मनाई केली गेली तरी तसे ते म्हणता येण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात. त्यांचा अवलंब करावयाचा तर भाषेचा अभ्यास हवा आणि काही एक सुसंस्कृतता अंगी असायला हवी. ती बाणवणे तसे कष्टाचे काम. त्यापेक्षा परस्परांवर आरोप करणे, सभात्याग करणे हे अधिक सोपे आणि दृश्यवेधक.

त्यापेक्षाही अधिक सोपे अर्थातच ‘गप्प बसा’ असे बजावणे. सभापतींनी अप्रत्यक्षपणे तोच मार्ग निवडलेला दिसतो. विनोदकारांनी खिल्ली उडवू नये, पत्रकारांनी टीका करू नये, विरोधकांनी वाभाडे काढू नयेत अशा सध्याच्या वातावरणास सभापतींचा निर्णय साजेसाच म्हणायचा. लोकशाहीचे वर्णन ‘नॉइझी सिस्टिम’ (गोंगाटी व्यवस्था) असे केले जाते. हा गोंगाट कमी करणे हा सभापतींच्या निर्णयामागचा विचार असावा. त्यावर आपल्या लोकप्रतिनिधींनी मुकाट ‘ओम शांति:’ म्हणावे आणि ‘सारे कसे शांत शांत’ संसदेचा सदस्य आहोत यात(च) आनंद मानावा.