चैतन्य प्रेम

उत्तम आणि मध्यम भक्तांची लक्षणं सांगून झाल्यावर कवि नारायण आता प्राकृत म्हणजे सामान्य भक्तांची लक्षणं सांगू लागतो. तो म्हणतो, ‘‘पाषाणप्रतिमा हाचि देवो। तेथेंचि ज्याचा पूर्ण भावो। भक्त-संत-सज्जनांसी पहा वो। अणुमात्र देहो लवों नेदी।।६५३।। ते ठायीं साधारण जन। त्याची वार्ता पुसे कोण। त्यांसी स्वप्नींही नाहीं सन्मान। यापरी भजन प्राकृताचें।।६५४।।’’ हा जो सामान्य भक्त आहे ना, तो पाषाणाच्या प्रतिमेलाच देव मानतो. तिथंच त्याचा पूर्ण भाव एकवटला असतो. तो इतका की, त्या देवत्वानं भरलेले जे श्रेष्ठ भक्त, संत, सज्जन आहेत त्यांच्यासमोर तो तसूभरही देह वाकवत नाही! म्हणजेच संत-सज्जन, सद्गुरू जो आत्महिताचा बोध कळकळीनं करतात त्याकडे तो दुर्लक्षच करतो. तो पाषाणमूर्तीच्या भक्तीला, तिच्या समोर पारायणं करण्याला, तीर्थयात्रांना, पूजाअर्चेला अतोनात महत्त्व देतो. ज्याची पूजा करायची तो पूज्यच सद्गुरू स्वरूपात माझ्यासमोर माझ्या जीवनातील भवदु:ख पूज्य म्हणजे शून्य करून टाकण्यासाठी आला आहे, हे त्याच्या गावीही नसतं. भगवंताची पूजाही तो करत असतो ते भवप्रेमापोटीच. म्हणजे भवविषयांमध्ये, भवसुखामध्ये खंड पडू नये यासाठी तो भगवंताला आळवत असतो. तेव्हा त्याला भवविषयच पूज्य असतात. इथं विषय म्हणजे कामविषय नव्हे, तर देहाला भावणारं जे जे काही कामनिक आहे ते सर्वच अभिप्रेत आहे. पण मला पूज्य वाटणारे हे भवविषयच जीवनातील भवदु:खाचं कारण असतात. त्यांना पूज्य म्हणजे शून्य करावं लागतं अर्थात त्यांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करावा लागतो. त्यासाठी जो पूज्य म्हणजे पूजनीय सद्गुरू आला आहे, संत आला आहे, सत्पुरुष आला आहे, त्याचं सांगणं ऐकावं लागतं. त्यानुसार आचरण करावं लागतं. वर्तनातल्या चुका सुधाराव्या लागतात. पण जो पाषाणमूर्तीलाच देव मानतो, पाषाणमूर्तीपलीकडे देवाचं अस्तित्वच मानत नाही त्याला हे उमगत नाही. जिथं तो संत-सत्पुरुषांनाही मान देत नाही, तिथं सामान्यांची काय कथा! स्वप्नातदेखील तो त्यांना मान देत नाही, त्यांच्याशी प्रेमानं व्यवहार करीत नाही. तर प्राकृताचं, सामान्याचं भजन म्हणजे धारणा ही अशी असते. कवि नारायण सांगतो, ‘‘ऐशिया स्थितीं जो जड भक्तु। तो जाणावा मुख्य ‘प्राकृतु’। प्रतिमाभंगें अंतु। मानी निश्चितु देवाचा।।६५५।।’’ हा जो सामान्य जड म्हणजे आकलनानं तोकडा भक्त असतो तो प्रतिमेशीच जखडून असतो. त्या पाषाणप्रतिमेचा भंग हा भगवंताचाच अंत असं तो मानतो. आता या ओव्या मूर्तीपूजेला हीन मानणाऱ्या नाहीत, हे लक्षात ठेवा. पण जो सद्गुरू सान्निध्यात आला आहे त्या भक्ताचं अंत:करण तरी व्यापक झालं पाहिजे, हा या ओव्यांमागचा हेतू आहे. भक्तीबाबत या भक्ताच्या मनात एक स्वकल्पित ठाम प्रतिमा असते. ही प्रतिमाच तोडावी लागते, व्यापक करावी लागते. कधीकधी एखाद्या गोष्टीचं टोकाचं प्रेम हे दुराग्रहात रूपांतरित होऊन जातं आणि मग ज्या दैवताची ती प्रतिमा आहे त्या दैवतानं त्याच्या अवतारकार्यात जो बोध सांगितला त्याच्याच विपरीत वर्तन सुरू होऊ शकतं. म्हणजे प्रतिमा ज्याची आहे त्याच्यापेक्षा त्या प्रतिमेवरच प्रेम उरतं. प्रतिमा ज्याची आहे त्यानं सांगितलेल्या बोधाची मोडतोड झाली तरी चालेल, पण त्याच्या मूर्तीची मोडतोड ही कल्पनेतसुद्धा पटत नाही. तेव्हा या विसंगत आणि विपरीत प्रतिमाप्रेमाचं भंजन सद्गुरूंना करावंच लागतं.