ज्ञान म्हणजे अनुभव! नुसतं शब्दज्ञान म्हणजे अनुभव नव्हे. हे शब्दज्ञान जेव्हा लयाला जातं, तेव्हा केवळ गर्वाचा धोंडा देहाला चिकटून असतो आणि तोच भवसागरात गटांगळ्या खायला लावतो आणि बुडवतो! दिवा विझला की केवळ काजळी उरते, तसंच हे आहे. (‘‘दीप मालवल्यापाठीं। काजळीची पोहणी उठी। तेंवि ज्ञान जातांचि शेवटीं। अति गर्व उठी ज्ञानाभिमानें।।’’ – भावार्थ रामायण). जे ज्ञान स्वबुद्धीच्या जोरावर कमावलं जात असतं, ते एखादा विकल्प येताच क्षीण होतं. सद्गुरूच्या बोधामुळे प्रत्यक्ष जगताना जे ज्ञान गवसतं ते अक्षय असतं. तेव्हा शुकांना खरं ज्ञान लाभलं पाहिजे, त्यांचं खरं हित झालं पाहिजे, या कळकळीपोटी व्यासांनी त्यांना जनकाकडे जायला सांगितलं. आधीच वैराग्याचा अहंकार झालेला, त्यात एका राजाकडे जायचं आहे, ही भावना. मग अहंकार तर पराकोटीला गेला. शुकदेव वल्कलं नेसून राजा जनकाच्या राजवाडय़ापाशी आले. द्वारपाळांना त्यांनी आपलं नाव सांगितलं. त्यांना वाटलं की, आत वर्दी जाताच राजा धावत येईल, माझ्या पाया पडेल, मला आदरपूर्वक आत नेईल, माझा सत्कार करील. राजा जनकानं मात्र हसून द्वारपाळांना सांगितलं की, ‘‘शुकदेवांना सांगा की संग त्यागून सुखी व्हा!’’ राजाचा निरोप ऐकताच शुकदेव संतापले. ते म्हणाले, ‘‘मी काय वैभवात लोळणारा राजा आहे की स्त्रियांच्या संगतीत रमणारा आहे? मी नि:संगच आहे, हे राजाला जाऊन सांगा!’’ मग त्यांनी वल्कलंही टाकून दिली आणि नग्न झाले. भाव हा की, आता देहाला वस्त्राचादेखील संग नाही! राजानं पुन्हा गांभीर्यानं तोच निरोप पाठवला, ‘‘संग त्यागा, मगच सुखी व्हाल!’’ या उत्तरानं शुकदेव क्षणांत अंतर्मुख झाले. अजून कोणता संग आहे मला, या विचारात पडले. मग त्यांच्या मनात आलं, ‘मी शुक’, ‘मी वैराग्यशील’ या जाणिवेचा संग आहेच की. नुसता त्या जाणिवेचा संग नाही, तर वैराग्याच्या अहंकाराचाही संग आहे. तिथून त्यांचा आत्मशोध सुरू झाला आणि स्वरूपज्ञानाची खरी प्राप्ती झाली! तेव्हा अशा जनकाला हरी नारायण हा भक्तीचं माहात्म्य सांगत आहे. एक राजा आहे; बाहेरून त्याच्या अंगावर अलंकार आहेत, मुकुट आहे. एक अवधूत आहे; संन्याशाच्या बाह्य़ रूपात आहे. पण दोघांची आंतरिक स्थिती एकच आहे! एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘हरीसारिखा रसाळ वक्ता। सांगतां उत्तमभक्तकथा। तटस्थ पडिलें समस्तां। भक्तभावार्थता ऐकोनी।।७९३।।’’ एक रसाळ वक्ता आहे आणि श्रोताही रसमय चित्तानं ती कथा ऐकत आहे. मग या चर्चेचा लाभ ज्यांना अनायास मिळत होता, त्यांची हृदयं तटस्थ झाली आहेत! अर्थात त्यांची बुद्धी, मन, चित्त सारं काही एकाकार झालं आहे. त्या चर्चेशी तद्रूप झालं आहे, तन्मय झालं आहे. याच भावनेतून राजा जनक आता चर्चेच्या पुढच्या पायरीवर पाऊल टाकणार आहे. माया म्हणजे नेमकं काय आणि तिचा तरणोपाय कोणता, हा त्या प्रश्नाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यानं ‘एकनाथी भागवता’चा तिसरा अध्याय व्यापला आहे. एकनाथ महाराज फार सुंदर रूपक वापरतात. ते म्हणतात, बासरीतून मधुर ध्वनी उमटतात हो! पण ती वाजवणारा लागतो! तो असल्याशिवाय नुसती बासरी असून उपयोग नाही. तसं एकनाथरूपी बासरीतून माझा सद्गुरू जनार्दनच बोधाचे स्वर उत्पन्न करीत साधकांच्या हृदयात भावतन्मयतेची लय निर्माण करीत आहे! इथंच दुसरा अध्याय संपूर्ण झाला. आता आपण तिसऱ्या अध्यायाकडे वळणार आहोत.