चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

मनुष्य देहाच्या द्वारे खरं काय साधायचं आहे, हे एकदा उमगलं की मग खरं जगणं सुरू होतं. मग आधीच्या जगण्याच्या रीतीबद्दल आणि त्यापायी वाया गेलेल्या बहुमोल वेळेच्या संधीबद्दल खेद वाटू लागतो. उरलेलं आयुष्य ध्येयसंगत जगलं पाहिजे, ही जाणीव तीव्र होऊ लागते. अर्थात, एवढय़ानं सगळं साधतं असं नव्हे! त्यासाठी सद्गुरू बोधानुरूप जगण्याचा अभ्यास करावाच लागतो. आता सद्गुरू बोध तरी काय असतो? त्या व्यापक बोधाचं एक अंग हे माझ्या व्यावहारिक जीवनाला शिस्त लावणारं, ध्येयाची जाणीव जागी ठेवणारं आणि मनाच्या पकडीत न अडकता मनाच्या आसक्तभावापलीकडे पाहण्याची दृष्टी देणारं असतं. मग अशा भक्ताच्या मनातला देहसुखाचा अग्रक्रम बदलतो किंवा देहाच्या आधारे साधना करून जे परमसुख लाभू शकतं त्यासाठीच्या प्रयत्नांना अग्रक्रम दिला जातो. अनुतापानं मनातली तळमळ वाढते. मग त्या अनुतापानं जे अवधान येतं, जे भान येतं, त्यानं अशाश्वताची गोडी संपून जाते. अर्थात मन विरक्त होतं. पण मन विरक्त झालं तरी त्या मनाचा मूळ पिंड जसा असतो त्याप्रमाणे ते वैराग्यही तामस, राजस आणि सात्त्विक असं त्रिगुणयुक्तच होतं. त्यातील राजस आणि तामस वैराग्य हे संतांना मान्य नाही. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘हें वैराग्य राजस तामस। तें न मानेच संतांस। तेणें न भेटे कृष्ण परेश। अनर्थास मूळ तें।।’’ (‘चिरंजीवपद’, ओवी ८). या राजस आणि तामस वैराग्यानं अनर्थ ओढवतो. तामस वैराग्य कसं असतं? तर, ते वेदविधी सत्कर्म तर सोडतंच; पण कर्माचरणात कोणताही विधिनिषेधही ठेवत नाही. राजस वैराग्य जे असतं, ते सत्संग सोडून स्वत:ची पूज्यता वाढविण्याच्या प्रयत्नांत अडकतं. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या वैराग्यांना नाथांनीही धुडकावलं आहे. सात्त्विक वैराग्य जे आहे, ते यदुनायकालाही वंदनीय आहे. त्याचं प्रमुख लक्षण काय आहे? तर, ‘‘भोगेच्छा विषयक। ते तो सांडी सकळिक। प्रारब्धें प्राप्त होतां देख। तेथोनि निष्टंक अंग काढी।।’’ (‘चिरंजीवपद’, ओवी ९). म्हणजे विषयसुख भोगण्याची इच्छा तर तो टाकून देतोच, पण प्रारब्धानुसार वाटय़ाला आलेल्या भोगांतूनही तो अंग काढून घेतो. अर्थात, ते भोग भोगत असतानाही त्यात लिप्त होत नाही, मनानं अडकत नाही. आता जोवर देह आहे तोवर इंद्रियं आहेत आणि इंद्रियं आहेत तोवर इंद्रियांचे विषयही आहेत. अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पाच गळांनी माणसाचं मन पुन्हा भोगेच्छेत अडकण्याचा धोका असतो. हे गळ जगाकडून कसे टाकले जातात आणि भक्त त्यात कसा अडकू शकतो, याबाबत नाथ सावध करतात. यातला  पहिला गळ आहे ‘शब्द’! ‘चिरंजीवपदा’त नाथ सांगतात, ‘‘जेणें धरिला शुद्ध परमार्थ। त्यासी जनमान हा अनर्थ। तेणें वाढे विषयस्वार्थ। ऐक नेमस्त विचार हा।।१२।।’’ ज्याला शुद्ध परमार्थ साधायचा आहे, त्याला लोकांकडून मिळणारा मान हा मोठा अनर्थकारक आहे. त्या जनमानामुळे परमार्थ क्षीण होतो आणि विषयस्वार्थच बळावत जातो. ज्याला खरा शुद्ध परमार्थ साधायचा आहे.. (‘जेणें धरिला शुद्ध परमार्थ’) खरं तर, या वाक्याचा उंबरठा घाईघाईत ओलांडून आपण पटकन पुढे जातो; पण या वाक्यापाशी थोडं थांबून मनात खोलवर डोकावून पाहिलं पाहिजे!