प्रिय आर्यन खान, तू जिचा प्रतिनिधी आहेस त्या तरुण पिढीला पत्रे लिहिण्यातला किंवा पत्रे येण्यातला आनंद माहीत नसेल. अगदी अलीकडेपर्यंत आपल्याकडे एक काळ असा होता जेव्हा पत्रे हा आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांशी संपर्कात राहण्याचा, प्रख्यात व्यक्तींशी संपर्क साधायचा, अनोळखी लोकांशी वैचारिक देवाणघेवाण करायचा महत्त्वाचा मार्ग होता. सामाजिक विरेचनाचे अर्थात भावभावनांना वाट मोकळी करून देण्याचे ते एक महत्त्वाचे माध्यम होते. गेल्या काही दिवसांपासून, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी घातले गेलेले केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे (सीबीआय) छापे पाहताना एक सेवारत पोलीस अधिकारी म्हणून माझ्या मनात काही विचार येत होते. मीदेखील तुझ्याच वयाच्या दोन तरुण मुलांचा बाप आहे. तू आणि तुझ्या आईवडिलांनी ऑक्टोबर २०२१ मधल्या त्या अमली पदार्थांच्या प्रकरणात जे काही सहन केलं, त्याबद्दल मला जे काही वाटलं त्या भावनांना या पत्राच्या माध्यमातून वाट मोकळी करून द्यावी असे वाटले.

२ ऑक्टोबर २०२१ रोजी कॉर्डेलिया या क्रूझवर छापा टाकण्यात आला. तुला आणि तुझ्या मित्रांना ताब्यात घेतले गेले आणि तुमची झडती घेऊन तुम्हाला अटक करण्यात आली. तुमच्यावर एनडीपीएस (नार्कोटिक्स ड्रग्ज अ‍ॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस) कायद्यातंर्गत अमली पदार्थांच्या तस्करीचे गंभीर आरोप झाले होते. हा सगळा तुझ्या आणि तुझ्या मित्रांच्या कुटुंबावर आघातच होता. पुढचे २५ दिवस, तू आणि तुझे मित्र तुरुंगात होते आणि संपूर्ण देश वृत्तवाहिन्यांच्या प्राइम-टाइम कार्यक्रमात जणू या प्रकरणाची मीडिया ट्रायल पहात होता. त्यातून आपल्या खंडित आणि असमानता असलेल्या समाजातील परपीडनात आनंद मानणारी आणि असंवेदनशील आणि मत्सरी सामूहिक वृत्ती दिसत होती. अर्थात, तुम्ही गुन्हेगार होतातच. अमली पदार्थांचे सेवन, ताबा आणि तस्करी या कायद्याने गुन्हा असलेल्या गोष्टींसाठी नाही, तर श्रीमंत आणि प्रसिद्ध असणे, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे शाहरुख खानचा मुलगा असणे हा किती मोठा गुन्हा आहे.

case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

हेही वाचा – घटनापीठाचा न्याय की निकाल?

सगळ्या देशाचे लक्ष वेधून घेणारे कोणतेही सनसनाटी प्रकरण देशभरातील कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यासाठी व्यावसायिक स्वारस्य निर्माण करणारे आणि उत्सुकता वाढवणारेच असते. कार्यालयातील अनौपचारिक चर्चांमध्ये, सामाजिक कार्यक्रमांमध्ये आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर त्याची चर्चा होते. कॉर्डेलिया क्रूझवर छापा घातला गेला आणि तुला आणि तुझ्या मित्रांना अटक झाली तेव्हाही मी आणि माझे पोलीस मित्र आपापसात यासंदर्भातील काही मूलभूत व्यावसायिक प्रश्नांवर चर्चा करत होतो. छाप्यांदरम्यान तुझ्याकडून आणि तुझ्या मित्रांकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचे एकूण प्रमाण किती होते? सर्व आरोपींच्या चौकशीत अमली पदार्थांचा आणखी साठा मिळाला का? तस्करीचा गंभीर आरोप सिद्ध करण्यासाठी जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण पुरेसे होते का? शोध आणि जप्ती मेमो हे एनडीपीएसच्या तरतुदींनुसार तयार करण्यात आले होते का? इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी तर यादरम्यान असे दावेच केले होते की अमली पदार्थ पुरवणारे बॉलीवूडच्या कानाकोपऱ्यात पसरले आहेत आणि तू आणि तुझे मित्रमंडळी या अमली पदार्थांच्या उलाढालीच्या हिमखंडाच्या टोकाचे प्रतिनिधित्व करत आहात.

त्या काही महिन्यांसाठी, वानखेडे आणि एनसीबीमधील त्यांचे सहकारी जणू शुद्धतावादाचा आग्रह धरणाऱ्या आणि आपण फार नैतिक आहोत असे समजणाऱ्या भारताचे प्रतिनिधी होते. त्यांच्या मते तू, तुझे वर्तुळ, आणि पूर्ण सिनेमासृष्टी अवनती होत असलेल्या भारताचे प्रतिनिधित्व करतात. तुझे वडीलही त्या सिनेमासृष्टीतील महत्त्वाची व्यक्ती आहेत, हे वेगळे सांगायला नकोच. ही सगळी अवनती रोखण्याची जबाबदारी वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जणू आपल्या खांद्यावर घेतली होती. आता समीर वानखेडे आणि इतरांविरुद्ध सीबीआय खटला दाखल झाल्याने, नैतिक धर्मयुद्धाचे हे अवसान कोलमडून पडले आहे. आपण निर्दोष आहोत आणि आपण देशभक्त असल्यामुळे आपल्याला ही शिक्षा दिली जात आहे असा वानखेडेंचा दावा आहेत. परंतु त्यांचे हे दावेच मुळात सुरुवातीपासूनच डळमळीत व्यावसायिक पायावर असून आता त्यांचा नैतिक पायादेखील ढासळलेला दिसतो.
तुमची सगळ्यांची अटक आणि तुरुंगवासामुळे तुमच्यावर जो आघात झाला, तुमची जी हानी झाली त्यातून तुमची आणि तुमच्या कुटुंबाची कशी भरपाई होऊ शकते हे मला खरोखर माहीत नाही. मला फक्त एवढीच आशा आहे की या सगळ्या प्रकरणाची जखम तुम्हाला आयुष्यभर पुरणारी न ठरो. तुमच्यामध्ये आपल्या पोलिसांबद्दल भीती आणि तिरस्काराची भावना निर्माण न होवो. दुर्दैवाने ही भावना आपल्या देशातील इतर अनेक नागरिकांनी अनुभवली आहे आणि त्याला काही कारणेदेखील आहेत. मी तुम्हाला खात्री देतो की आपल्या समाजात सगळेचजण गणवेश म्हणजे दुर्बल आणि दुर्दैवी लोकांना अंकित करण्याचा परवाना मानणारे नाहीत. सगळेचजण सत्तेचे भुकेले नाहीत. आपल्यापैकी काहीजण कायद्यावर आणि आदर्श व्यवस्थेवर विश्वास ठेवतात.

मला आशा आहे की या प्रकरणामुळे पोलिसांमधील सुधारणा आणि विशेषत: आपले अमली पदार्थविषयक कायदे या दोन्ही गोष्टींबाबत राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा सुरू होईल. आपला सध्याचा एनडीपीएस कायदा बोथट असला तरी आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातात तो क्रूर ठरतो. जगभरातील, वेगवेगळ्या समाजांना आता हे उमजले आहे की अमली पदार्थांविरोधातील लढा हा सार्वजनिक संसाधनांचा प्रचंड अपव्यय करणारा आणि नागरिकांसाठी नैतिक हानी करणाराच आहे. सर्व अमली पदार्थ सारखेच असे मानणे हे केवळ मूर्खपणाचे असून यासंदर्भात सामूहिक आत्मनिरीक्षणाची गरज आहे.

दारूप्रमाणेच, अमली पदार्थ आणि मानसोपचारावरील औषधांचा वापर करणाऱ्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. काहीजण पूर्णपणे मजेसाठी त्यांचा वापर करतात. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर त्याचा काहीच प्रतिकूल परिणाम होत नाही. काहीजण अमली पदार्थांचा वापर करून स्वतःचे शारीरिक आणि मानसिक नुकसान करून घेतात आणि त्याचा त्यांच्या कुटुंबालाही त्रास होतो. त्यानंतर येतात अत्यंत व्यसनी लोक. त्यांच्यासाठी अमली पदार्थांचे सेवन आणि हिंसक गुन्हे या दोन्ही गोष्टी हातात हात घालून येतात. यातील पहिल्या प्रकाराकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, दुसऱ्या प्रकारातील लोकांना मात्र वैद्यकीय सेवा पुरवण्याची गरज आहे. फौजदारी न्याय यंत्रणेचा संबंध फक्त तिसऱ्याच प्रकारच्या समूहाशी येतो. केवळ खासगी मौजमजेसाठी किंवा केवळ एक अनुभव म्हणून, प्रयोग म्हणून अशा पदार्थांचा वापर करणाऱ्या तुमच्यासारख्या तरुणांना अमली पदार्थांच्या तस्करीबद्दल अटक करणे आणि त्यांच्यावर खटला चालवणे, हे मला चुकीचे वाटते. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संसाधनांचा दुरुपयोग करण्याची वृत्ती त्यातून दिसते. या कृतींमधून अधिकाराचा दुरुपयोग होतोच शिवाय भ्रष्टाचाराच्या पद्धतशीर संधी निर्माण केल्या जातात. त्याबरोबरच त्यातून संबंधित तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रासच होत असतो. अमली पदार्थांविरोधातील तथाकथित युद्धासाठी अधिक गरज असते ती वैद्यकीय व्यावसायिक आणि समुपदेशकांची. पोलीस आणि ते नैतिक योद्ध्यांची तिथे फारशी गरज नसते.

हेही वाचा – आज ‘सुरक्षा’ दिसते, उद्या पोलिसांना चटक लागू शकते…

तुझ्या आणि तुझ्या मित्रांच्या बाबतीत जे झाले ते आपले धोरणकर्ते आणि आपल्या समाजासाठी डोळे उघडणारे आहे. आपल्या अमली पदार्थांच्या कायद्यांमध्ये कठोर फेरबदल आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या देखरेखीची आणि पर्यवेक्षणाची प्रणाली अधिक कठोर करणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हा मुलांना आणि तुमच्या पालकांना ज्या गोष्टींचा सामना करावा लागला त्यामधून इतरांना जावे लागणार नाही. सामूहिक पश्चात्ताप दर्शविण्याचा हाच सर्वात योग्य मार्ग असेल.

(लेखक सेवारत आयपीएस अधिकारी असून या लेखात व्यक्त झालेली मते वैयक्तिक आहेत.)