गुरुचरण दास हे चिंतनशील, गंभीर लेखक आणि कॉर्पोरेट बॉससुद्धा.. हे दोन्ही कसं काय साधलं?

१९७०-८०-९० या तीन दशकांत भारत पूर्ण पालटून गेला. आर्थिक सुधारणानंतर तर एके काळी फ्रिज, टीव्ही घेणं म्हणजे चंगळवाद मानणाऱ्या पिढीकडे या वस्तू तर आल्याच, पण ते आता ‘नायकीचे शूज’ घेऊ लागले. मॅकडोनाल्डमध्ये खायला जाऊ लागले. ज्यांनी हा काळ नुसता पाहिला नाही तर तो घडवण्यातही वाटा उचलला, अशी अनेक माणसं केवळ राजकारणात किंवा सत्तेतच नव्हती, तर कॉर्पोरेट क्षेत्रातही होती.. यापैकी एक गुरुचरण दास. स्वातंत्र्योत्तर भारताच्या या प्रगती-गाथेवर त्यांनी लिहिलेलं ‘इंडिया अनबाउण्ड’ (२०१२) हे पुस्तक गेली बारा वर्ष खपतं आहे, वाचलं जातं आहे आणि त्या पुस्तकातला तत्त्वज्ञाचा सूर पुढे नेणाऱ्या ‘काम : द रिडल ऑफ डिझायर’, ‘द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड’ या पुस्तकांमुळे आजच्या काळातले गंभीर लेखक म्हणून ते प्रस्थापित झाले आहेत. त्यांच्या स्मृतिचित्रांचं (मेमॉयर्स) पुस्तक सर्वात नवं. यात गुरुचरण दास केवळ आयुष्यातील निवडक गोष्टी सांगतात. मग आई-वडील कसे नुसते कट्टर धार्मिक शीख नव्हते तर त्या काळातल्या एका वेगळय़ा (निरंकारी) पंथाचा त्यांनी भक्तिभावपूर्ण स्वीकार केला होता, गुरुचरण दास यांना मात्र त्या पंथाचं कौतुक लहानपणीही वाटलं नाही. ते अभ्यासात हुशार होते आणि वडिलांची वॉशिंग्टनला बदली झाल्यावर ते अमेरिकेच्या शाळेत दाखल झाले.

Gaurav Vallabh
अग्रलेख: प्रवक्त्यांची पक्षांतरे!
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
vijay kelkar
अग्रलेख: कराग्रे वसते लक्ष्मी..
israel hamas war
अग्रलेख : नरसंहाराची नशा!

या अमेरिकी शाळेत भरपूर गोरी मुलं होती. पण तिथं गोरे-काळे असा भेदभाव चांगलाच दिसणारा होता. त्या काळात त्यांचे मुख्याध्यापक म्हणाले की, बघ हा कोर्स पूर्ण करशील तर अमेरिकन ड्रीमला जॉइन होशील- एखाद्या फॅक्टरीत नोकरी करू शकशील! पण हुशार आणि बुद्धिमान असलेल्या गुरुचरण दास यांचे विचारपरिवर्तन एका काळय़ा शिक्षिकेमुळे झाले- ‘रेस आणि कास्ट या गोष्टी एकच आहेत, पण त्या बदलल्या पाहिजेत’ हे तिचं वाक्य त्याही वयात त्यांच्यावर परिणाम घडवणारं ठरलं. घरच्या निरंकारी वातावरणामुळे शाकाहारी असलेल्या गुरुचरण यांना शिक्षिकेनं ‘मांसाहार हाच नैसर्गिक’ असं सुनावलं तेव्हा मात्र ‘काय खावं हे नैसर्गिक नसून तो चॉइसचा भाग आहे’ असं प्रत्युत्तरही मिळालं, पण कोणत्याही अभिमानापेक्षा ‘चॉइस’ गुरुचरण यांनी जपला. अमेरिकेतल्या बऱ्याच आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. तो काळ अमेरिकेत ‘लोन रेंजर’ नावाचा एबीसी टीव्हीचा कार्यक्रम घरोघरी पाहिला जाण्याचा. ‘मुलांना टीव्ही जास्त पाहू देऊ नका- त्यांची एकाग्रता कमी होते’ असा इशारा (त्याही वेळी) देणाऱ्या एका शेजारीणबाईंचं आणखी एक वाक्य गुरुचरण यांना लक्षात राहिलं. ती म्हणाली होती : वेलकम टू अमेरिका व्हेअर पेरेंट्स ओबे किड्स! हे मुलांच्या तालावर नाचणारे पालक आज आपल्याकडे दिसतात.

हेही वाचा >>>आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या

पण अजूनही ‘हार्वर्ड’बद्दल आपलं आकर्षण कमी झालं नाही. या विद्यापीठात गुरुचरण दास शिकले. हार्वर्डमधील काळावर बरीच पानं खर्च झाली आहेत, पण ती वाचताना आपल्याला जाणीव होते की चांगलं विद्यापीठ हुशार विद्यार्थ्यांच्या मनाची कशी मशागत करतं. इथंच त्यांना एडवर्ड सैद भेटले. पाश्चिमात्य संस्कृती एकूणच पौर्वात्य संस्कृतीकडे कसं रोमँटिक नजरेने पाहते अशी चर्चा सैद तेव्हा करत आणि त्यानंतरच्या काळात याच आशयाचं ‘ओरिएंटॅलिझम’ (१९७८) हे प्रसिद्ध पुस्तकही त्यांनी लिहिलं. हार्वर्डमध्ये हेन्री किसिंजर हे गव्हर्न्मेंट वनएटी नावाचा कोर्स शिकवत. ‘राष्ट्राला शत्रू किंवा मित्र नसतात, फक्त स्वत:चे इंटरेस्ट असतात. कुठल्याही नेत्याचं काम हे राष्ट्राला नैतिक दिशा दाखवण्यापेक्षा देशाचं हित जपण्याचं असतं. सर्वच देशांनी याप्रमाणे काम केलं तर सत्तेचं संतुलन राहतं आणि शांतता नांदते’ हे किसिंजर यांचं आवडतं प्रतिपादन. एकदा दास यांच्याकडे बघत किसिंजर यांनी ‘चुकीच्या परराष्ट्र धोरणाचं उदाहरण’ म्हणून नेहरूंचं नाव घेतलं आणि पुढे विचारलं नेहरू चीनला का पािठबा देतात? चीन हाही पश्चिमी सार्वभौमत्वामुळे त्रास झालेला एक गरीब देश आहे असं भारताला वाटतं, पण त्यामुळेच भारत पश्चिमेकडे मित्र गमावतोय म्हणजे स्वत:च्या राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करतो, असं त्यांनी सांगितलं. उलट चीन मात्र केवळ स्वत:चं हित पाहतो आहे. पुढे दास लिहितात की, मला काही किसिंजर आवडत नव्हते पण त्यांचं म्हणणं बरोबर ठरतं.

हार्वर्डमध्ये त्यांनी संस्कृतचा कोर्स घेतला. नेमकं त्याच वेळी प्रसिद्ध प्राध्यापक डॅनियल एच. एच. इंगल्स भेटले. ते म्हणाले, लीला हा शब्द असं दाखवतो की माणूस दु:खातून जातो याचं कारण देव जे सहज गमतीने करतात ते माणूस फार गंभीरपणे घेतो. इंगल्स यांच्या या थिअरीनं दास खूप प्रभावित झाले. त्यामुळे त्यांनी संस्कृतचा क्लास अटेंड केला आणि एका हातात आपटय़ांची संस्कृत डिक्शनरी घेऊन आणि दुसरीकडे संस्कृत रीडर घेऊन ते नल-दमयंतीसारखी कथानकं अनुवादित करत. हे जिकिरीचंच, पण इंगल्स यांचं मत असं होतं की संस्कृत घेणं हे कधी आम्यासाठी चांगलं. त्याच वेळी इंगल्स यांनी योगामधील अष्टसिद्धींबद्दल एक व्याख्यान दिलं. त्यात लघिमा या सिद्धीचा उल्लेख होता. त्यात शरीर अगदी हलकं होतं कापसाच्या तुकडय़ाप्रमाणे! ही कल्पना दास यांना आवडली आणि त्यांनी स्वत:साठी ती अशी विकसित केली की लघिमा सिद्धी नसून आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आपण असंच आयुष्यात हलका, तरंगता दृष्टिकोन ठेवला पाहिजे. नंतरच्या काळात गुरुचरणदास यांनी लिहिलेल्या पुस्तकांकडे पाहिलं तर हॉर्वर्डमधले संस्कृत धडय़ांचं महत्त्व लक्षात येतं. एव्हाना वडील भारतात परतले होते, तरी गुरुचरण हार्वर्डमध्येच होते. अखेर फिलॉसॉफी डिग्री घेऊन ते हॉर्वर्डमधून परतले.

हेही वाचा >>>विश्लेषण : जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा कसा मिळाला? सर्वोच्च न्यायालयाने काय कारण दिले?

भारतात आल्यानंतरच्या कौटुंबिक चर्चेचा तपशील गुरुचरण देतात. मला वडिलांनी विचारलं, तुला काय करायचं आहे. ‘मला हवं तसं जगायचंय.’ पण हवं तसं जगण्यासाठी जर पैसे कमवायचे असतील तर काम करावं लागणार. तेव्हा गुरुचरण म्हणाले : हे किंवा ते का आहे? वडील म्हणाले, असंच असतं! आईला मात्र मुलगा काहीच करत नाही असं वाटायचं. तिने त्याला एका न्यायाधीश महोदयांकडे पाठवलं. त्यांनी सरकारी कामातल्या संथगतीचा स्वत:लाही कसा त्रास होतो हे सांगितलंच, पण उद्यमशीलतेची एक गोष्ट सांगितली. गोष्टीचं नाव ‘माउस मर्चंट’! एक मुलगा एका व्यापाऱ्याचा सल्ला घेण्यासाठी जातो. व्यापाऱ्याच्या दारातच त्याला उंदीर मरून पडलेला सापडतो. तेव्हा तो उंदीर उचलून पुढे जातो आणि एका बाईला मांजराचं खाद्य म्हणून विकतो. यातून मिळालेल्या पैशांनी पोतं भरून चणे घेतो. जेवून झाडाखाली झोपी जातो. संध्याकाळी बरेच जण लाकडाच्या मोळय़ा घेऊन येतात. त्यांना चणे आणि पाणी देतो. ते म्हणतात की आमच्याकडे देण्यासारखं काही नाही म्हणून ते आपल्या मोळींतली २-३ लाकडं देतात. त्यामुळे त्याच्याकडे बरीच लाकडं जमतात. त्यानंतर एक माणूस गाडी घेऊन येतो. त्याला लाकडांची गरज असते. हा मुलगा त्या माणसाला लाकडं विकतो. पण तो माणूस म्हणतो की मला आणखी १० बैलगाडय़ा भरून लाकडांच्या मोळय़ा लागतील. मुलगा दुसऱ्या दिवशी परत त्या पैशांतून भरपूर चणे, शेंगदाणे, फळे आणि इतर खाद्य पदार्थ विकत घेतो. त्याचबरोबर पाण्याची मडकी घेऊन उभा राहतो. संध्याकाळी मोळीविके येतात. त्यांना खाद्यपदार्थ विकून त्याबदल्यात मोळय़ा घेतो. नंतर व्यापारी येतो तेव्हा त्याला भरपूर मोळय़ा देऊन पैसे घेतो. असं करून महिन्याभरात खूप पैसे कमावतो!

 विक्स वेपोरब बनवणाऱ्या कंपनीला विक्री प्रतिनिधी हवे असल्याची जाहिरात गुरुचरण यांनी पाहिली, ती या गोष्टीनंतर. कंपनी दिल्लीला होती, पण त्यांचं मुंबईतही कार्यालय होतं. तिथं दास इंटरव्ह्यूला गेले. मुलाखतकारही त्यांच्याप्रमाणे अमेरिकन रिटर्न. त्याने विचारलं, तुझं आयुष्याचं ध्येय काय? दास म्हणाले, मला आनंदी राहायचं आहे. त्याने विचारलं नेमकं कसं? दास म्हणाले की माणूस लग्न, मुलंबाळं करून आनंदी होऊ शकतो. तसंच तो काम करून आनंदी होऊ शकतो किंवा साहसी कामं करून आनंदी राहू शकतो. मुलाखतकाराचं समाधान या उत्तरावर होत नव्हतं. दास उठता उठता तो मुलाखतकार म्हणाला की तुला व्यवसायातलं काय कळतं? तेव्हा दास यांनी त्याला ‘माउस मर्चंट’ची गोष्ट सांगितली. मुलाखतकार खळखळून हसला. काही दिवसांनी एक पोस्टमन पत्र घेऊन आला. अनपेक्षितपणे, कंपनीनं त्यांची निवड विक्री व्यवस्थापनासाठी केली होती. मुंबईच्या कार्यालयात ते रुजू झाले.

दास हे खूप प्रश्न विचारत. विक्रेत्यांची नावं, त्यांचे पत्ते, फोन हे सारं लिहून ठेवून वाचता येतं तर पाठ कशाला करायचं? लक्षात कशाला ठेवायचं? दास काहीच ऐकत नाहीत, सतत प्रश्न विचारतात, कंपनीच्या मार्गापेक्षा वेगळे मार्ग सुचवतात. यामुळे कंटाळलेल्या मॅनेजर्सनी तक्रार केली. त्यामुळे दास यांना कामावर येऊ नका सांगून एक महिन्याचा चेक दिला. दास फार निराश झाले. पण दुसऱ्या दिवशी सामान आवरायला कार्यालयात गेले तेव्हा त्यांना एम.डी. भेटले आणि म्हणाले, तू काम करू शकतोस, पण यापुढे तू ऑफिसमध्ये बसण्याऐवजी फील्डवर जा. मग दास लिहितात की मी जसं जसं भारतीय किराणा माल विकणाऱ्या व्यापाऱ्यांना भेटत गेलो तेव्हा लक्षात आलं की हीच मंडळी आपली उत्पादनं विकतात, हीच मंडळी कष्ट करतात. हे काम त्यांना आवडू लागलं. ते घरोघरी सव्‍‌र्हे करत थिएटरमध्ये जाऊन उत्पादन वाटत. अशाच एका घरातल्या गृहिणीला त्यांनी विचारलं, तुम्ही आमचं उत्पादन कसं वापरता? तर ती उकळतं पाणी घेऊन आली. त्यांना वाटलं चहा वगैरे बनवणार असेल. पण तिने गरम पाण्यात विक्स वेपोरबचे थेंब टाकले आणि त्याची वाफ घेऊन दाखवलं.

पुढे दास लिहितात, तेव्हा माझ्या लक्षात आलं तिच्यासारख्या लाखो बायका विक्स वापरतात आणि त्यांच्यामुळे मला पगार मिळतो! दास यांच्या विक्री-कल्पनांचा प्रभाव दिसू लागला. अनेक वरिष्ठ पदं पार करत १९८५ मध्ये, ‘रिचर्डसन व्हिक्स’ ही मूळ कंपनी प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बलने विकत घेतली तेव्हा ते ‘प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया’चे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी आणि १९९२ मध्ये ‘प्रॉक्टर अँड गॅम्बल फार ईस्ट’चे उपाध्यक्ष बनले. त्या काळात त्यांच्या लक्षात आलं की, कंपनी वेपोरबचा खप थंडीतच वाढवते आहे. दास यांनी सुचवलं की केवळ थंडीतच माणसाला सर्दी होत नाही. या सगळय़ा सूचना न्यू यॉर्कला जायच्या.. तिथल्या शास्त्रज्ञांनी असं सिद्ध केलं की हवामान बदलताना सर्दी होते. त्यामुळे विक्स वेपोरब थंडीतच नव्हे तर इतर ऋतूंतही विकता येईल!

व्यवस्था समजून घेताना माणसांच्या वर्तनाची जाण असणं, निरीक्षणशक्तीला चिंतनाची जोड देणं हे लेखकीय गुण गुरुचरण दास यांच्या याआधीच्या पुस्तकांतूनही दिसले होतेच. व्यक्तिगत आठवणी लिहिताना या गुणांच्याही पलीकडचा मुक्तपणा वाचकाला जाणवतो. विचारांतला हा मुक्तपणा ही गुरुचरण दास यांची ‘लघिमा सिद्धी’ ठरली आहे.

(अनदर सॉर्ट ऑफ फ्रीडम

लेखक : गुरुचरण दास,

प्रकाशक : पेन्ग्विन रॅण्डम हाउस,

पृष्ठे : २९६; किंमत : ६९९ रु.)

shashibooks@gmail. com