घरोघरी असूनही दरवर्षी दोन-तीनदा तरी जगभरच्या अनेक देशांत बातमीचा विषय होणारं, जाड-बारीक विविध परींच्या नाना आवृत्त्या जुन्याच तरीही उपयुक्त असणारं असं पुस्तक म्हणजे ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी- ‘ओईडी’ हे तिचं आद्याक्षरांनुसार होणारं लघुरूप अनेक पुस्तकांच्या तळटीपांपासून, पुस्तकविक्या दुकानांपर्यंत अनेक ठिकाणी वाचता येतं किंवा ऐकू येतं. प्रत्यक्षात ही ‘ओईडी’ आजच्या गूगलच्या जमान्यात कालबाह्य व्हायला हवी होती, पण ऑक्सफर्डचाच काय, केम्ब्रिज किंवा अमेरिक वेबस्टर यापैकी कुठलाही खानदानी शब्दकोश इतिहासजमा झालेला नाही. यांपैकी वेबस्टर्स या सर्वात जुन्या डिक्शनरीचा जन्म १८२८चा. ऑक्सफर्ड डिक्शनरीची छपाई सुरू झाली १८८४ मध्ये. आजवर तिच्यात असलेल्या शब्दांपैकी फक्त २१,८०० शब्दच सन १५७६च्या आधीचे  आहेत. म्हणजे आपल्या मराठीत ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ साकारणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या जन्मानंतरच्या ३००व्या वर्षीसुद्धा इंग्रजीत एवढेच शब्द होते! त्यानंतर मात्र इंग्रजीची शब्दसंपदा वाढत गेली, असं ‘ओईडी’ सांगते. आजघडीला या ‘ओईडी’च्या खंडांमध्ये सहा लाख शब्द आहेत. फक्त २०२२ पुरतंच सांगायचं, तर यंदाच्या जूनमध्ये ७०० आणि सप्टेंबरात ६५० नवे शब्द या डिक्शनरीत आले. या ७०० किंवा ६५० पैकी बरेच निव्वळ बोलीतले (सहसा लिहिले न जाणारे) होते, त्यातही एकसंध शब्द कमी होते आणि शब्दप्रयोग जास्त होते.. उदाहरणार्थ ‘हायब्रिड वर्क’ या शब्दांपैकी हायब्रिड – संकरित, वर्क- कार्य, काम हे दोन्ही शब्द आधीपासून आहेतच, पण ‘हायब्रिड वर्क’ हा शब्दप्रयोग म्हणून करोनाकाळापासून नव्यानंच वापरला जातो आहे, याची दखल ‘ओईडी’नं घेतली. या जून- सप्टेंबर शब्दसंपदेच्या बातम्या त्या-त्या वेळी आल्याच, पण आता बातमी आहे ती ‘या वर्षीच्या शब्दा’ची. ‘गॉब्लिन मोड’ हा शब्द ‘ओईडी’नं २०२२ चा शब्द म्हणून निवडलाय, हे एव्हाना बऱ्याच जणांनी कुठेतरी बातम्यांमध्ये वाचलं/ ऐकलं असेल.

‘गॉब्लिन मोड’च्या आदल्या वर्षीचा – २०२१ सालचा शब्द होता ‘व्हॅक्स’. हे लस या अर्थानं वापरल्या जाणाऱ्या ‘व्हॅक्सीन’चं लघुरूप. त्याच्या आदल्या वर्षी मात्र ‘ओईडी’कर्त्यांनी शब्दच निवडला नव्हता.  सरतं वर्ष जगासाठी नेमकं कसं होतं, कशाचा प्रभाव जगावर दिसला, याचं प्रतिबिंब अनेकदा या दर वर्षीच्या शब्दांमधून उमटलेलं आहे. उदाहरणार्थ, २०१६ साली डोनाल्ड ट्रम्प जिंकले, त्या वर्षीचा शब्द ‘पोस्ट ट्रूथ’ हा होता. २०१३ सालचा शब्द होता ‘सेल्फी’, तर बॅटरीवर चालणाऱ्या सिगारेटचा सुळसुळाट अगदी शाळकरी पोरांमध्येही होतोय अशी स्थिती युरोप-अमेरिकेत २०१४ मध्ये आली, त्या वर्षीचा शब्द ‘व्हेप’ असा होता. ही बॅटरीवरली सिगारेट ओढणारे लोक तोंडातून ‘धूर’ (स्मोक) काढत नसून वाफारे (व्हेपर) काढतात, म्हणून आम्ही ‘स्मोकिंग’ करत नसून  ‘व्हेपिंग’ करतोय असं म्हणतात. परिणाम दोघांचा सारखाच, पण त्यातून चर्चेत आलेलं हे ‘व्हेप’ त्या वर्षीचा शब्द झालं.

Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
donald trump hush money trial marathi news
विश्लेषण: ट्रम्प यांच्याविरोधातील ‘हश मनी’ खटला काय आहे? ट्रम्प यामुळे अडचणीत येतील का?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?

सन २०१९ चा ‘क्लायमेट इमर्जन्सी’ हा शब्द, ग्रेटा थुनबर्ग आणि जगभर पसरलेल्या तिच्या तरुण मित्रमंडळींची आठवण करून देणारा होता. त्याच्या आदल्या वर्षी, २०१८ मध्ये निवडला गेलेला ‘टॉक्सिक’ हा शब्दसुद्धा पर्यावरणवाद्यांच्या तोंडी वारंवार येऊ लागलेला होता. पर्यावरणवादाकडे तरुणांचा ओढा वाढतोच आहे, याच्याशी २०१७ सालच्या ‘यूथक्वेक’ या शब्दाचा दूरान्वयानं संबंध होता.. तरुणांच्या प्रभावामुळे धोरणं बदलू शकतात किंवा एखादा भाग बदलू शकतो, या वास्तवाचं वर्णन करणारा हा शब्द. पण पुढे २०२१च्या डिसेंबरात, ‘यूथक्वेक : व्हॉट आफ्रिकन डेमॉग्राफी शुड मॅटर टु द वर्ल्ड’ या एडवर्ड पाइस यांच्या पुस्तकात हाच शब्द ‘तरुण लोकसंख्येचा विस्फोट’ अशाही अर्थानं वापरला गेला.

शब्दाचे अर्थ कसे बदलत जातात, नवे अर्थ कसे प्रस्थापित होतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे या वर्षीचा ‘गॉब्लिन मोड’ हा शब्दप्रयोग. मध्यंतरी ‘ओटीटी’ वर एक ‘गार्डियन’ नावाची मालिका आली होती आणि तीत गॉब्लिन नावाचं पात्र होतं, पण त्या गॉब्लिनचा या ‘गॉब्लिन मोड’शी काही संबंध नाही. टिकटॉकवर ‘गॉब्लिन मोड’ हा हॅशटॅग अनेकदा वापरला गेला, तो बहुतेकदा ‘तुम्हाला काय वाटायचं ते वाटो, मी असंच करणारेय’ अशा प्रकारे वापरला गेला. काहीसा ‘दुनिया गयी भाडमें’ अशा मन:स्थितीचा हा शब्द. तो यंदाच्या वर्षीचा शब्द ठरलाय. ‘ओटीटी’ ते ओईडी हा त्याचा प्रवास लाखो लोकांनी आपापल्या परीनं हा शब्द वापरल्यामुळे झालेला आहे. कुणाचीही पर्वा न करता, अगदी स्वत:च्याही भल्याची पर्वा न करता जगणं अशा अर्थाचा शब्द म्हणून यापुढे त्याचा वापर वाढणार आहे, हे आपल्या वास्तवाची भयाणताच दाखवतं! पण वास्तव काहीही असलं तरी, शब्दांचा नवेपणा हेरणारं पुस्तक मात्र चर्चेत येत राहातं, वास्तवाशी शब्दकोशांचा कसा संबंध असतो, याची साक्षही देत राहातं. शब्दसंपदेची शक्ती वाढवत राहातं.

त्यावरनं सहज प्रश्न पडतोय- मराठीत अशी ‘या वर्षीचा शब्द’ जाहीर करण्याची प्रथा कुणा शब्दकोशानं समजा सुरू केली, तर काय असेल २०२२चा शब्द? ‘महाशक्ती’ हा शब्द असेल का तो? – नसला, तर मग कोणता असेल?