वीणा गवाणकर

पांडुरंग खानखोजे यांचा पुतळा मेक्सिकोमध्ये उभारला जात आहे. ‘गदर’ उठावामुळे ब्रिटिशांनी काळय़ा यादीत टाकलेल्या खानखोजे यांचं मेक्सिकोतील कृषी क्षेत्रात मोठं योगदान आहे.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
Mallikarjun Kharge and narendra modi
मोदींनी झोपेच्या गोळ्या घेतल्यात का? चीनच्या घुसखोरीवर बोलताना मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!

 ‘गदर’ क्रांतिकारकांचा १९१५ सालातला उठाव फसला. ते देशोदेशी पांगले. गदरचे प्रहार विभाग प्रमुख पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी जर्मनीत आश्रय घेतला. तिथली अर्थव्यवस्था ढासळल्याने परदेशी व्यक्तींना तिथला आश्रय सोडणं भाग पडलं. खानखोजेंनी मेक्सिकोत जाण्याचा निर्णय घेतला. १९१०- १२च्या मेक्सिकन क्रांतीतल्या काही नेत्यांशी त्यांचा निकट परिचय झाला होता. त्या नेत्यांनी भारतीय क्रांतिकारकांना शस्त्रपुरवठा करण्यात पुढाकारही घेतलेला होता. १९२४ साली खानखोजे जर्मनी सोडून मेक्सिकोत गेले. त्यांच्या खिशात पैसे नव्हते आणि त्यांना मेक्सिकोची स्पॅनिश भाषाही अवगत नव्हती. मेक्सिकोतल्या एका छोटय़ा खेडय़ात ते उपासमार सहन करत दिवस कंठत राहिले. आणि त्याच वेळी स्पॅनिश भाषेचं आपलं ज्ञान वाढवू लागले. हळूहळू जुन्या मित्रांचा शोध घेऊन संपर्क साधू लागले. मेक्सिको गणराज्याचे राष्ट्राध्यक्ष ओब्रेगान आणि कृषिमंत्री देनेग्री या जुन्या मित्रांची भेट घेण्यात ते यशस्वी झाले.

चािपगो या गावात नव्याने उभ्या राहात असलेल्या कृषी विद्यापीठात कृषी रसायन विभागात खानखोजेंना छोटीशी नोकरी मिळाली. या विद्यापीठाच्या ताब्यात हजारो एकर जमीन होती. खानखोजे प्रयोगशाळेत मदतनीसाचं काम करता करता साध्या उपकरणांच्या, साधनांच्या साहाय्याने मक्यावर विविध प्रयोग करत. राष्ट्राध्यक्ष ओब्रेगान एकदा या विद्यापीठाच्या भेटीवर आले असताना या प्रयोगांकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. त्या प्रयोगांचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी खानखोजेंना तेच प्रयोग सोनोरा संस्थानच्या मोठय़ा प्रयोगशाळेत करून दाखवायला सांगितले. विशेष म्हणजे त्या वर्षी मेक्सिकोच्या राजधानीत भरलेल्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात खानखोजेंच्या शोधाला प्रथम पुरस्कार मिळाला. त्यांच्या मक्याच्या कणसासंबंधीच्या प्रयोगाने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. ओब्रेगाननी कृषी शाखेच्या उच्च वर्गातील विद्यार्थ्यांना मक्याची लागवड शिकवण्यासाठी तज्ज्ञ म्हणून त्यांची नेमणूक केली. त्यावेळी खानखोजेंचं स्पॅनिश भाषेचं ज्ञान जेमतेमच होतं. म्हणून त्यांच्या हाताशी एक स्पॅनिश भाषक मदतनीसही दिला.

त्यांच्या अध्यापनाचा लौकिक वाढत गेला. स्पॅनिश भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. ‘जमीन आणि पिके’, ‘जेनेटिक्स’ या विषयांत त्यांचा दबदबा वाढला. त्यांनी आता गव्हाकडे लक्ष वळवलं. प्रयोगातून गव्हाची विविध वाणं तयार केली. विविध ऋतुमानांत, विविध भौगोलिक परिस्थितीत पिकवता येणाऱ्या गव्हाच्या जातीङ्घ त्यांच्या या संशोधनाचा गौरव झालाही. १९२९ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात त्यांना प्रथम पुरस्कार आणि राष्ट्रीय दर्जाची सन्माननीय पदविकाही बहाल करण्यात आली.

खानखोजेंचा अभ्यास व त्यांचे संशोधन लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारने त्यांना शेती सुधार मंडळावर घेतलं. संपूर्ण मेक्सिकोचा दौरा करून कृषी संशोधन केंद्रांना भेटी द्याव्यात, कृषी संस्था पाहाव्यात, शेतकऱ्यांच्या समस्या, अनुभव वगैरे समजून घेऊन सुधारणा सुचवाव्यात अशी कामगिरी त्यांच्यावर सोपवली.

खानखोजे १९०६ ते १९१४ या काळात अमेरिकेत कृषी संशोधक असताना ल्युथर यांच्या संशोधनाचा अभ्यास त्यांनी केला होताच. १९१३ साली ते कृषितज्ज्ञ डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर यांना टस्कीगी शिक्षण संस्थेत भेटले. त्यांनी त्यांचे कार्य आणि त्यांच्या प्रेरणाही लक्षात घेतल्या होत्या. त्याचा उपयोग त्यांना या दौऱ्याच्या वेळी झाला.

या दौऱ्यात त्यांनी तिथल्या कृषी क्षेत्राच्या आणि कृषिवलांच्या अडचणी समजून घेतल्या. सोप्या भाषेत प्रबोधन केलं. शेतकरी सहकारी संस्था उभ्या केल्या. या संस्थांचा मिळून एक ‘महासंघ’ झाला. हा महासंघ तिथल्या सरकारच्या कृषी आणि पशुधन खात्याच्या अखत्यारीत आला. सरकारने या महासंघाच्या संचालकपदाची धुरा खानखोजेंवर सोपविली.

या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचं मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदास करण्याच्या आणि गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू केलं. तिथल्या एका जंगली वनस्पतीशी मक्याचं संकर करून ‘तेवो- मका’ ही नवी प्रजात निर्माण केली. एका मक्याच्या ताटावर ३०-३० कणसं आणि ती कणसंही आतून बाहेरून डािळबाप्रमाणे संपूर्ण भरलेली.. अशा भारदार कणसांनी लगडलेल्या मक्याच्या शेतात उभे असलेल्या प्रा. खानखोजेंची छायाचित्रे वृत्तपत्रांतून झळकली. मेक्सिकन सरकारने या विषयावरची त्यांची पत्रकं, पुस्तिका छापून सामान्य शेतकऱ्यांत वितरित केल्या आणि प्रा. खानखोजेंचा गौरव केला.

गहू, मक्यानंतर खानखोजे तूर, चवळी, सोया यांच्या लागवडीकडे वळले. शेवग्यावरही अभ्यास केला. त्याचा पाला, मुळय़ा, बिया यापासून विविध उत्पादने तयार केली. त्यातून द्रव्यार्जन उत्तम होत असल्याचा अनुभव मेक्सिकन शेतकऱ्यांच्या आला आणि ते मोठय़ा प्रमाणावर शेवग्याची लागवड करू लागले. रताळी, सोनताग याची लागवड फायदेशीर ठरावी यासाठीही खानखोजेंनी विविध प्रयोग केले. त्यांच्या या सर्व संशोधनाचा गौरव मेक्सिकन सरकारने वेळोवेळी केला.

मेक्सिको सरकारने त्यांना १० हजार एकर पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी दिली. हे मोठं आव्हानच होतं. प्रा. खानखोजेंनी आपलं ज्ञान आणि कसब पणाला लावलं. हळूहळू शेतीचं यांत्रिकीकरण करत, ग्रामोद्योग वाढवत शेतमजुरांची आर्थिक स्थिती सुधारली. ग्रामविकासाचा धडा घालून दिला. त्यांचं काम इथेच थांबलं नाही. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक कृषीज्ञान, नवीन रासायनिक खतं, नवीन उद्योगधंदे, शेतमालाचा क्रय- विक्रय इत्यादी माहिती देण्यासाठी अनेक कृषिशाळा उभ्या केल्या.

त्यांचं एकूण संशोधन, कार्य आणि त्याचे परिणाम लक्षात घेऊन सरकारने त्यांना सल्लागार समितीत घेतलं. हा मोठा सन्मान होता. याहीपेक्षा मोठा गौरव केला तो जगप्रसिद्ध मेक्सिकन चित्रकार दिएगो रिव्हेरा यांनी. राजधानीच्या शिक्षण खात्याच्या भिंतीवर खानखोजेंचे मोठे म्युरल तयार केले. त्यात टेबलामागे खुर्चीत हातात पाव घेऊन खानखोजे बसलेले आहेत. त्यांच्यामागे विविध फळांनी भरलेली टोपली घेऊन कृषक कन्या उभी आहे. टेबलासमोर पुढय़ात वृद्ध – तरुण स्त्री-पुरुष बसले आहेत. चित्राच्या शिरोभागी स्पॅनिश भाषेत काव्यपंक्ती आहेत –

‘आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल!’

गदर उठावामुळे ब्रिटिशांनी खानखोजेंना काळय़ा यादीत टाकलं. त्यांना मातृभूमीत येता येणं शक्य नव्हतं. काव्‍‌र्हरकडून घेतलेली कृषिविद्या त्यांना स्वतंत्र भारतात राबवायची होती. ते त्या काळात अशक्य होतं. त्यांनी ती विद्या मेक्सिकन इंडियनांच्या भल्यासाठी वापरली. विश्व बंधुत्वाचा वस्तुपाठ घालून दिला. आता त्या भारतीयाचा पुतळा मेक्सिकोत उभारला जात आहे. इतिहासाचं एक आवर्तन पूर्ण होतं आहे.

veena.gavankar@gmail.com