पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर  बनावट आधारकार्ड, मतदार ओळखपत्र बाळगल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.या प्रकरणी अब्दुलाह रुमी (वय ४८, सध्या रा. रिलॅक्स पीजी सर्व्हिसेस, सोमनाथनगर, वडगाव शेरी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रुमी मूळचा तामिळनाडूचा रहिवासी आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संशयितांची माहिती घेण्यात येत होती. येरवड्यातील गोल्फ क्लब चौकाजवळ एक संशयित थांबला असून, त्याच्याकडे बनावट आधारकार्ड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. बनावट आधारकार्ड, मतदार ओळखपत्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुमीने बनावट नावाने आधारकार्ड, मतदार ओळखपत्र का केले, यादृष्टीने तपास सुरू आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दाेडमिसे तपास करत आहेत.