– डॉ. अपर्णा लळिंगकर

स्वामी विवेकानंद परिव्राजक अवस्थेमध्ये भारत भ्रमण करत करत २४ डिसेंबर १८९२ रोजी देशाच्या दक्षिणेकडील टोकाला म्हणजेच कन्याकुमारीला पोहोचले. निवांतपणे ध्यान करण्याचे मनात आल्यावर त्यांनी समोरच्याच खळाळत्या समुद्रात उडी टाकून पोहतच श्रीपाद शिला गाठली. त्या पुढील तीन दिवस म्हणजेच २५ डिसेंबर ते २७ डिसेंबर १८९२ त्यांनी या श्रीपाद शिलेवर ध्यानधारणा केली. भगव्या वस्त्रातील इसम खळाळत्या समुद्रात उडी टाकून पोहत श्रीपाद शिलेवर गेल्याचे किनाऱ्यावरील मच्छिमार बांधवांनी पाहिले. त्यांतीलच एकाने त्यांना तीन दिवस अन्न-पाणी पुरवले असा संदर्भ एस. एन. धर लिखित ‘स्वामी विवेकानंद समग्र चरित्र खंड १’ मध्ये आहे. या श्रीपाद शिलेवरच स्वामी विवेकानंदांना आपले गुरू श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या ‘आईची सेवा कर’ या संदेशाचे खरे आकलन झाले. या तीन दिवसांच्या ध्यानधारणेतूनच त्यांच्या जीवित कार्याची दिशा मिळाली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन भारत मातेच्या सेवेत म्हणजेच देशबांधवांच्या सेवेसाठी अर्पण करण्याचे ठरविले. यानंतरच त्यांना श्रीरामकृष्णांकडून अमेरिकेत शिकागो येथील सर्वधर्म परिषदेसाठी समस्त भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्याचा संकेतही मिळाला. त्यामुळे या सर्व दृष्टीनेच स्वामी विवेकानंदांच्या जीवन कार्याचा आणि श्रीपाद शिलेचा अतिशय जवळचा संबंध. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने श्रीपाद शिलेवर स्वामीजींचे एक स्मारक व्हावे असे अनेकांना वाटत होते. त्यासाठी जानेवारी १९६२ मध्ये स्थानिक स्तरावर विवेकानंद शिलास्मारक समितीही निर्माण झाली. यात मद्रासमधील रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी शुद्धतत्वानंद तसेच काही स्थानिक हिंदू नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा समावेश होता.

mumbai high court marathi news, justice gautam patel marathi news
न्यायमूर्ती गौतम पटेल सेवानिवृत्त, औपचारिक प्रथेला फाटा देत अन्य न्यायमूर्तींकडून अनोख्या पद्धतीने निरोप
1195 minor girls missing from Nagpur in three years
नागपूर : उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता
bhandara lok sabha seat, 106 Year Old Grandmother, casted Vote, polling station, bhandara voting, lok sabha 2024, bhandara news, election news, marathi news
वय वर्षे १०६, तरुणांना लाजवेल अशी इच्छाशक्ती; मतदान केंद्रांवर जाऊन केलं मतदान
Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित

सुरुवातीचा विरोध

विवेकानंद शिलास्मारक उभारणीची बातमी सर्वत्र पसरली तशी स्थानिक ख्रिस्ती मच्छिमारांनी त्यास विरोध करण्यास सुरुवात केली. सेंट झेवियर्स या मिशनरी व्यक्तीने ४०० वर्षांपूर्वी येथील रहिवाशांचे धर्मांतर केले होते. कन्याकुमारीतील एका स्थानिक कडव्या ख्रिस्ती धर्मगुरूने या मच्छिमारांना भडकावल्याने त्यांनी एप्रिल १९६२ मध्ये रातोरात किनाऱ्यावरून दिसेल असा मोठा क्रॉस श्रीपाद शिलेवर लावून त्या शिलेला सेंट झेवियर्स रॉक संबोधण्यास सुरुवात केली. काही स्थानिकांनीही ताबडतोब एकत्र येऊन निदर्शने केली आणि तिथे श्रीपाद चिन्ह असल्याने ते हिंदूंचे पूजास्थान असल्याचे तारेने जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना कळविले आणि त्या क्रॉसचे श्रीपाद शिलेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. पूर्वी श्रीपाद शिलेवर देवी कन्याकुमारीने एका पायावर उभे राहून तपश्चर्या केली होती अशी कथा आहे. तिचा आधार घेऊन कन्याकुमारी देवस्थानने श्रीपादशीलेवर आपला दावा जाहीर केला. तिथे जाण्यासाठी नावेची सुविधा चालू केली. ही सुविधा चालविण्याचे काम काही समर्पित हिंदू तरुणांनी हाती घेतले. यामुळे लोकांची श्रीपाद शिलेवर जाण्याची छान सोय झाली. तोपर्यंत श्रीपाद शिलेवर किंवा त्याच्या शेजारील शिलेवर जाण्यासाठी लोकांना ख्रिस्ती मच्छिमारांच्या लाकडी होड्यांचा आधार होता. नंतर हिंदूंनी तो क्रॉस एका रात्री काढून टाकला. त्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊन कन्याकुमारीत जमावबंदीचे कलम १४४ लागू केले गेले आणि श्रीपाद शिलेवर एक रक्षकही नेमला. त्यानंतर स्थानिक ख्रिस्ती आणि हिंदूंचा संघर्ष टाळण्यासाठी तत्कालीन राज्यसरकारने विवेकानंद स्मारक किनाऱ्यावर उभे करावे अशी परवानगी दिली. पण समितीचे यावर समाधान झालेले नव्हते. त्यामुळे किमान ‘श्रीपाद शिलेवर स्वामी विवेकानंदांनी येथे २५ ते २७ डिसेंबर १८९२ या कालावधीत ध्यान केले’ अशा आशयाचा लेख तरी तिथे असावा अशी कल्पना मांडली गेली. त्यानुसार राज्य सरकारच्या परवानगीने श्रीपादशिलेवर तशा मजकुराची शिला १७ जानेवारी १९६३ रोजी उभी केली.

हेही वाचा – ‘वसाहतवाद-विरोधा’तील अंतर्विरोध!

श्रीपाद शिलेवरून क्रॉस हटविण्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी म्हणून कॅथलिक लोकांनी तो शिलालेख उखडून समुद्रात फेकून दिला. पुन्हा निदर्शने करणे आणि निवेदने तारेमार्फत पोहोचविणे या माध्यमातून संघर्ष चालू झाला. अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा विवेकानंद शिलास्मारक समितीच्या लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख एकनाथजी रानडे यांची आठवण झाली. एकनाथजींचा असे विरोध हाताळण्यात हातखंडा होता. विरोधकांचेही समर्थन घेण्यात त्यांची हातोटी होती. स्वामी विवेकानंद जन्मशताब्दी निमित्ताने स्वामीजींच्या विचारांवर आधारित एक पुस्तक करण्याच्या कामात एकनाथजी गुंतलेले होते. त्यावेळी नुकतेच १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. प्रतिकारासाठी आपली पुरेशी तयारी नव्हती. त्यामुळे भारतीय सैन्याला हार पत्करावी लागल्याने भारतीय सैनिक आणि नागरिक यांचे मनोधैर्य खचलेले होते. हे मनोबल उंचावण्याचे काम फक्त आणि फक्त स्वामी विवेकानंदांचेच विचार करू शकतात याची एकनाथजींना खात्री होती. म्हणून त्यांनी स्वामीजींच्या तेजस्वी विचारांच्या संकलनाचे पुस्तक करण्याच्या कामात स्वत:ला झोकून दिलेले होते. त्यासाठी त्यांनी मार्च १९६२ मध्ये कोलकात्यातील बेलूर मठात राहून स्वामीजींच्या समग्र वाडमयाचा अभ्यास केला. विवेकानंद शिलास्मारक समितीने रास्वसंघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची भेट घेतली. गुरुजींनी आनंदाने एकनाथजींना संघाच्या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त केले आणि त्यांना आदेश दिला की त्यांनी विवेकानंद शिलास्मारकाचे काम पूर्णत्वास न्यावे.

स्मारकाचा ध्यास

पदभार स्वीकारल्यावर त्यांनी सर्वप्रथम तत्कालीन केंद्रीय मंत्री हुमायून कबीर यांची भेट घेऊन त्यांची या प्रकल्पास लेखी परवानगी मिळवली. स्वामी विवेकानंदांचे योगदान पाहता कोणत्याच विचारसरणीच्या लोकांनी त्यांना विरोध करण्याचं कारण नव्हतं. तरीही त्यांनी या प्रकल्पासाठी जनमत तयार करण्यासाठी मोठमोठ्या व्यक्तींना भेटायला सुरुवात केली. त्यांना प्रकल्पाची माहिती सांगून त्यांच्याकडून या प्रकल्पासाठी स्वाक्षरी घेणे असा कार्यक्रम हाती घेतला. यात केरळचे मोठे नेते अण्णा दुराई, नेदुनचेरियन अशांमुळे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षातील लोकांनी सह्या दिल्या. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लाल बहादुर शास्त्री, एम. सी. छागला, रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष आणि कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य यांना प्रत्यक्ष भेटून प्रकल्पाची माहिती सांगून त्यांची स्वीकृती एकनाथजींनी मिळवली. ‘हे स्मारक लहान नको तर तो स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असावे’ अशी सूचना या मान्यवरांकडून मिळाली. मग या कामासाठी त्यांना श्री. एस. के. आचारी हे उत्तम स्थापत्यविशारद मिळाले.

निधीसंकलन

तेथील समुद्रातील खाऱ्या वाऱ्यांचा विचार करता आरसीसी बांधकाम करता आले नसते त्यामुळे सर्व काम हे ग्रॅनाईटमध्ये करायचे ठरले. स्मारकाचे माप ९१ फूट लांब आणि ३२ फूट रुंद असे ठरले. आता श्रीपाद मंडपम वगळता प्रत्यक्षात भिंती १८० फूट लाब व ५६.५ फूट रुंद अशा आहेत. आतील भागात ७ फूट उंच आणि ४ फूट रुंद असा स्वामीजींचा कांस्य धातूतील पुतळा आहे. ज्यावर हा पुतळा विराजमान आहे त्या चौथऱ्याची उंची ४ फूट तर रुंदी ८ फूट आहे. स्मारकाच्या खालच्या बाजूला ध्यान मंडपम आणि श्रीपाद चिन्हासाठी श्रीपाद मंडपम आहे. यासाठीच्या मूळ खर्चाचा अंदाज ६ लाखांचा होता तो वाढत वाढत ६० लाख, ८० लाख असा होत होत शेवटी १ कोटी ३५ लाखांपर्यंत पोहोचला. कन्याकुमारी जवळच असलेल्या अंबासमुद्रम येथून काळे ग्रॅनाईट तर तुतिकोरिनहून लाल ग्रॅनाईट खरेदी केले गेले. इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी निधी संकलन हे एक आव्हानच होते. देशातील उद्योगपतींनी आणि धनाढ्यांनी दिले असते तर १ कोटी ३५ लाख सहज जमले असते. पण एकनाथजींच्या मनात हे स्मारक सामान्य जनतेलाही आपलं आहे असं वाटायला पाहिजे होतं. अमेरिकेत सर्वधर्म परीषदेसाठी जाताना स्वामी विवेकानंदांनी सामान्य जनतेकडून अत्यल्प स्वरुपातील देणगी स्वीकारून पैसे गोळा केले होते आणि त्या जनसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून ते अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत दाखल झाले होते. अगदी हीच योजना एकनाथजींनी आखली. सामान्य जनतेला अगदी १ रुपयापासून देणगी मूल्य देण्याची सोय केलेली होती. त्यासाठी १ रुपयाची तिकिटेदेखील छापलेली होती. जवळ जवळ ३० लाख सर्वसामान्य नागरिक, देशातील उद्योगपती, अनेक राज्यांनी स्वत:च्या राजकोषातून शिलास्मारकासाठी निधी दिला. अशा प्रकारे लहान थोर अशा सगळ्यांकडूनच प्रत्येकाच्या क्षमतेनुसार देणग्या गोळा करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला गेला. शिलास्मारकाच्या भिंतीवरील शिल्पे आणि नक्षीकाम या सगळ्याचा तसेच विवेकानंदांचा पुतळा कसा असावाचे बारकावे एकनाथजींनी अतिशय विचारपूर्वक ठरवलेले होते. विवेकानंद शिलास्मारकाच्या उद्घाटनास तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी, रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी वीरेश्वरानंद, मोरारजीभाई देसाई यांसारख्या मोठ्या व्यक्तींची उपस्थिती होती.

सामान्यांची असामान्य संघटना

एकनाथजींच्या दूरदर्शीपणा, त्यांची कामावर असलेली निष्ठा, सेवाभावी वृत्ती, उत्साह, कळकळ, संघटन कौशल्य याचे फलित म्हणजे विवेकानंद शिलास्मारक. विवेकानंद शिलास्मारकाचे लोकार्पण झाल्यानंतर एकनाथजींना केवळ दगडविटांचे स्मारक नको होते म्हणून त्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी एका जिवंत स्मारकाची संकल्पना विवेकानंद केंद्र या संघटनेच्या स्थापनेतून (७ जानेवारी १९७२ ला) प्रत्यक्षात आणली. मातृभूमीची सेवा करण्याच्या ध्येयासाठी जीवन समर्पित करू इच्छिणाऱ्या युवक- युवतींना एकत्र करून त्यांना जीवनव्रती म्हणून प्रशिक्षण देण्याची परंपरा एकनाथजींनी १९७३ साली सुरू केली. ‘मनुष्य निर्माण राष्ट्र पुनरुत्थान’ हे विवेकानंद केंद्र या आधात्म प्रेरित सेवा संघटनेचे ब्रीदवाक्य आहे. जीवनव्रती हे विवेकानंद केंद्राच्या कार्याचा कणा आहेत. विवेकानंद केंद्राची कार्यपद्धती मुख्यतः १) योगवर्ग (१८ च्या पुढे ६० पर्यंत), २) स्वाध्यायवर्ग (सर्वांसाठी), ३) संस्कारवर्ग (बाल आणि किशोरवयीन), ४) केंद्रवर्ग (सर्वांसाठी) अशी आहे. विवेकानंद केंद्रामार्फत ११ ते १५ वयोगटासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिरे घेतली जातात.

हेही वाचा – मुंबईचे विसर्जन करण्याचा घाट!

आध्यात्मिक शिबीर, योग शिबीर, युवा प्रेरणा शिबीर अशा विविध शिबिरांच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि व्यक्तिगत गुणांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. या व्यतिरिक्त स्थानिक, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. शिक्षक व प्राध्यापकांसाठी आचार्य प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड या राज्यांत तसेच अंदमान, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत शाळा चालवल्या जातात. केंद्राचे विविध प्रकल्प देशभरात कार्यरत आहेत. उदा. अरुणाचल प्रदेशात अरुणज्योती प्रकल्प, नाशिक जिल्ह्यातील पिपळद येथे विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्प, तमिळनाडूमधील नैसर्गिक साधनसंपत्ती विकास प्रकल्प, ग्रामीण विकास प्रकल्प, गुवाहाटीतील विवेकानंद केंद्र सांस्कृतिक संस्था, कोडंगल्लूर येथील वैदिक दर्शन प्रतिष्ठान, दिल्लीतील विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि प्रकाशन प्रकल्प. गेल्या वर्षी विवेकानंद केंद्राला ५० वर्षे पूर्ण झाली तर या वर्षी विवेकानंद केंद्रातील प्रशिक्षण सुरू होऊन ५० वर्षे झाली आहेत.

(लेखिका, संशोधक, अभ्यासक आणि विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य आहेत.)