हुसेन दलवाई

महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्दाचे वातावरण कधी नव्हे इतके बिघडले आहे, हे बिघडवण्यासाठी काही संघटना फार मोठय़ा प्रमाणात क्रियाशील झाल्या आहेत. येथील सत्ताधाऱ्यांसाठी बेरोजगारी, महागाई, विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न अशा जटिल समस्या हे निवडणुकीचे महत्त्वाचे मुद्दे नाहीत. समाजात द्वेषभावना निर्माण करून मतांची बेगमी कशी करता येईल, यातच ते गुंतले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच आव्हान दिले जात आहे. आताची नेमकी परिस्थिती काय? वातावरण किती प्रक्षुब्ध झाले आहे, याची जाण नसलेल्या मुस्लीम समाजातील काही मंडळी त्यांच्या हातात आयतेच कोलीत देत आहेत. औरंगजेबाची छायाचित्रे कशासाठी झळकविली जात आहेत? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पूर्वजांना जवळ केले, सन्मान दिला, ते रयतेचे म्हणजेच आपले राजे की औरंगजेबासारखे ज्यांनी एतद्देशीयांना कोणतेही स्थान दिले नाही ते? त्यांची छायाचित्रे कशासाठी झळकवता? 

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

औरंगजेबाच्या कारकीर्दीत बहुसंख्य सुभेदार हे रजपूत आणि ब्राह्मण होते. इतकेच नव्हे तर त्यांचे सल्लागारही तेच होते आणि त्यात जे मुस्लीम होते ते त्यांच्याबरोबर आलेले पठाण, हबशी मुस्लीम होते. त्यांनी कधीही इथल्या मुस्लिमांना कोणतेही स्थान दिले नाही. त्यांची छायाचित्रे आपण कशासाठी मिरवायची? ज्या कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांनी दलित आणि मुस्लिमांना केवळ बरोबरीचेच नव्हे, तर मानाचेही स्थान दिले, त्या कोल्हापुरात अशा घटना घडल्या हे अतिशय दुर्दैवी आहे. धर्माच्या नावाने गरीब मुस्लिमांना भडकवणारे आणि चुकीच्या मार्गाने नेणारेच खरे मुस्लिमांचे शत्रू आहेत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही बहुसंख्य हिंदू आजही हिंदू- मुस्लीम ऐक्यासाठी झटत आहेत. हिंदू समाजातील तथाकथित वरिष्ठ जाती व वर्गातील अत्यल्प प्रमाणातील लोक सत्तेसाठी समाजमानस बिघडवण्याचे काम करत असतील तर त्याला उत्तर या पद्धतीने देता येणार नाही. त्यासाठी महात्मा गांधीजींनी आपल्याला मार्ग दाखवला आहे. हिंसेला हिंसेने नव्हे तर हिंसेला प्रेमाने उत्तर दिले पाहिजे. आक्रमकतेला विनम्रता हेच उत्तर असू शकते.

मुस्लीम समाजातील काहींनी चुकीची विधाने केल्यास, विद्वेष निर्माण केल्यास वा हिंदू सामाजाच्या, धर्माच्या विरोधात भूमिका घेतल्यास मुस्लीम समाजाच्या बाजूने असलेला हिंदूंचा वर्ग अडचणीत येईल. अशा वागण्यातून आपण हिंदू जातीयवाद्यांच्याच विरोधात काही बोलतो असे नव्हे तर हिंदू-मुस्लीम सलोख्याचे वातावरण राहावे म्हणून झटत असलेल्या हिंदूंचीही पंचाईत करतो, ही साधी बाब आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.

राज्यघटनेवर विश्वास हवा

आज महाराष्ट्रात मुंबई, औरंगाबाद, अकोला, बुलडाणा, त्र्यंबकेश्वर, शेवगाव अशा असंख्य ठिकाणी मुद्दाम खुसपटे काढण्याचे प्रयत्न होत आहेत. काही ठिकाणी तर असल्या समाजविघातक व देशद्रोही प्रवृत्तींना महाराष्ट्राचे पोलीसच प्रोत्साहन देतात की काय असा प्रश्न पडतो. पोलीस मोर्चाची दखल घेत नाहीत किंवा प्रत्यक्ष उपस्थित असूनसुद्धा हातावर हात घेऊन उभे राहतात. अशा समाजविघातक, द्वेषभावना पसरवणाऱ्या घोषणा देणाऱ्या व भाषणे करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात वेळीच कारवाई करत नाहीत. आज केंद्रातील आणि राज्यातील सत्तेचे स्वरूप नेमके काय आहे, हे मुस्लीम समाजाने समजून घेणे आवश्यक आहे. १९४७ साली देश स्वतंत्र झाला आणि त्याच वेळी देशाचे दोन तुकडे झाले. पाकिस्तानची निर्मिती होऊनही देशात हिंदूराष्ट्र निर्माण झाले नाही, तर एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. धर्म, जाती, प्रदेश, भाषा, संस्कृती यांच्यात प्रचंड विविधता असूनही एकसंघ भारत राष्ट्र उभे राहिले. डॉ. बाबासाहेबांच्या पुढाकाराने निर्माण झालेली भारतीय घटना ही सर्वसमावेशक व समाजातील सर्व घटकांना न्याय देणारी आहे.

१९२५ मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मात्र इच्छा होती, की हा देश ‘हिंदूराष्ट्र’ व्हावा. गोळवलकर गुरुजींनी तर भारतीय घटना म्हणजे वेगवेगळय़ा देशांतील घटनांमधील कायदे उचलून निर्माण केलेली ‘गोधडी’ आहे असे म्हटले होते. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न २०१४पासून सातत्याने सुरू आहेत. या देशातील शासन संस्था संपूर्ण नसली तरी मोठय़ा प्रमाणात हिंदूत्ववादी झाली आहे.

‘शहाबानो’ प्रकरणामुळे नुकसान

शासन संस्थाच अशा रीतीने हिंदूत्ववादी विचाराची होत आहे याचे भान मुस्लीम समाजाला आहे, असे दिसत नाही. पूर्वीच्या काळात जे बेजबाबदार मुस्लीम नेते जातीयवादाचा पुरस्कार करत होते, तसे आता चालू शकत नाही. शहाबानो खटल्यासारखे प्रश्न निर्माण करून आपण आपल्या समाजाचे खूप मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे, याचे भानही आपल्याला राहिलेले नाही.

आताची स्थिती ही हिंदू- मुस्लीम

संघर्षांची नसून ती मुस्लीम विरुद्ध शासन संस्था अशी आहे, हे मुस्लिमांनी लक्षात घेतले पाहिजे. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत आज ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांचा एकच अजेंडा आहे. समाजामध्ये दरी निर्माण करणे आणि सत्ता संपादन करणे. जे एकेकाळी आपल्या देशात इंग्रजांनी केले तेच हत्यार आजचा राज्यकर्ता पक्ष वापरत आहेत. अशा परिस्थितीतून मुस्लीम समाजाने सामंजस्याने, अतिशय शांतपणे विचार करून मार्ग काढणे आवश्यक आहे. आज मुस्लीम समाज शिक्षणात दलित व आदिवासींच्याही मागे पडला आहे. याचा विचार करणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूच्या घरातील एकही मुलगा/ मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, हे आपण पाहिले पाहिजे.

उलटा प्रवास नको!

मुस्लिमांचे वास्तव प्रश्न काय याचा आपण कधी विचारच करत नाही. सतत धर्माच्या नावाने मुस्लिमांना भडकावण्याचे काम करणारे मुसलमानांचे तारणहार नसून शत्रू आहेत. मोहम्मद पैगंबरांनी दुश्मनालाही माफ करा, असे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर आपल्या अनुयायांना अन्य धर्माचा आदर करा, असेही बजावले आहे. उलट आपण आपल्या काही कृतींतून मित्रांशीच शत्रुत्व ओढावून घेत नाही ना, हे पाहणे आवश्यक आहे.

कोल्हापुरात तौफिक, सोलापुरात हसीब नदाफ, बुलढाण्यात मुज्जमील, अकोल्यात बदरुज्जमा, जब्बार भाई, सय्यद शहजाद, अहमदनगरमध्ये शौकत तांबोळी, समीर काझी, नासीर शेख यांच्यासारख्या मुस्लीम समाजातील तरुण मंडळींच्या बाजूने समाजाने उभे राहिले पाहिजे आणि आधुनिकतेची वाट धरली पाहिजे. धर्माच्या नावाने उलटा प्रवास करून मुस्लीम समाजाचे काहीही कल्याण होणार नाही. असेच वातावरण राहिले तर हिंदू समाजातील जे लोक आज ठामपणे मुस्लीम समाजाच्या बाजूने उभे आहेत, त्यांच्याही मनात भीती निर्माण होईल. मुस्लीम समाजातील मौलवींना विनम्र आवाहन आहे की, त्यांनी समाजात सामंजस्य राहावे, यासाठी प्रयत्न करावा.

Story img Loader