देवानंद भगवान माने
बाबा आमटे गांधीजींविषयी म्हणत, ‘चुका सगळ्यांकडून होतात फक्त लोक त्या कबूल करत नाहीत. या माणसानेही चुका केल्या फरक इतकाच की त्याने त्या जगासमोर कबूल केल्या’ एखाद्या महापुरुषाचे यश हे त्याच्या मृत्यूनंतर त्याचे विचार किती लोकांपर्यंत पोहचले आणि काळानुरूप ते किती आत्मसात केले गेले, यावर अवलंबून असते. गांधीजी पहिल्या निकषानुसार जगात पहिल्या क्रमांकाचे मानकरी! पण दुसऱ्या निकषावर काठावर पास. कारण महान व्यक्ती त्यांच्या आयुष्यात जे कार्य करतात हे झाले त्याचे कर्तृत्व आणि मृत्यूनंतर जे कार्य उरते, ती असते अनुयायांची जबाबदारी. महानता नापास होते ती नाकर्त्या अनुयायांमुळेच. कारण सरकारी कचेरीतील भिंती सजवण्यासाठी, स्वच्छतेच्या अभियानासाठी, राजकीय फायद्यासाठी आणि परदेशी पाहुण्यांना भेटवस्तू देण्यासाठी या गोष्टी सोडल्या तर गांधीजी हा विचार नसून फक्त एक व्यक्ती किंवा वस्तू (भेटवस्तू) आहे असेच सगळ्यांना वाटते. ज्या व्यक्तीचे आणि ज्याच्या विचारांचे जगाला आकर्षण आहे, त्याचा आपल्याच काही देशवासीयांना तिटकारा आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या हत्येचे समर्थन करणारे सुद्धा आहेत. आपल्या महान लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा यापेक्षा वेगळा पुरावा कोणता असू शकतो.

स्वत:ला कठोर शिक्षा व्हावी म्हणून झगडणारा वकील

एका बनिया व्यापारी कुटुंबात जन्म, मध्यमवर्गीय कुटुंबातील बालपण, बालविवाह, परदेशात वकिलीचे शिक्षण अन् भारतात परतल्यानंतर वकिली व्यवसायातील अपयश, अफ्रिकेत संधी, काळा गोरा भेदभाव अन् पुढे अपमान हीच लढ्याची प्रेरणा मानून समानतेसाठी लढा असा गांधीजींचा इथवरचा जीवन प्रवास. पण महात्मा होण्याची सुरुवात झाली, ती भारतात परतल्यानंतर. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींचा सहभाग १९१५ नंतरचा. त्या आधी दक्षिण आफ्रिकेत भारतीयांना वसाहतीमध्ये स्थायिक होण्याचा, व्यवसाय करण्याचा, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार मिळावा म्हणून गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला. हे जे सत्याग्रह नावाचे तंत्र (शस्त्र) होते त्याचा गांधीजींनी तेथेच पहिल्यांदा उपयोग केला. सरकारने लादलेले अनिष्ट कायदे मोडायचे आणि स्वतःला अटक करवून घ्यायची. वर आपल्या गुन्ह्याची कबुलीही द्यायची आणि आपल्याला जास्तीत जास्त शिक्षा करावी अशी न्यायाधिशांना विनंतीही करायची. (हे जरा अजबच नव्हे का?) हे सर्व सत्याग्रहींनी करायचे आणि वकिल हवा असेल तर गांधींजी होतेच. असा एकमेव वकील जो आपल्या अशिलाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी म्हणून लढत असेल. म्हणूनच त्यावेळच्या राष्ट्रीय काँग्रेसमधील उच्चशिक्षित आणि यशस्वी वकिलांना हा माणूस पहिल्यांदा विचित्रच वाटला. मात्र एका चळवळीत लाखो लोक सामावून जातात पण एक व्यक्ती अख्खी चळवळ आपल्यात सामावून घेते, याचा प्रत्यय जेव्हा त्यांना आला तेव्हा या अर्धनग्न फिकिरला शरण जाण्याखेरीज त्यांच्याकडे पर्याय उरला नाही. अनेकांनी विरोध केला, चळवळीतून बाहेर पडले पण या अर्धनग्न फकिराचे जनसाम्राज्य वाढतच गेले.

narendra modi sharad pawar (1)
मुंबईतल्या सभेतून मोदींचं शरद पवारांना आव्हान, सावरकरांचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींना…”
Pm Narendra modi Speech in Nashik
“म्हणून मी मोदींच्या सभेत कांद्यावरून घोषणा दिल्या”, शरद पवारांच्या उल्लेखासह तरूणाने सांगितली घटनेची पार्श्वभूमी
Sanjay raut on narendra modi (5)
“ज्या रस्त्यावर लोकांचा मृत्यू झाला तिथे पंतप्रधानांनी…”, संजय राऊतांची टीका; म्हणाले “यासारखी अमानुष गोष्ट नाही!
eknath shinde criticized uddhav thackeray
“बाळासाहेबांना यांची क्षमता माहिती होती, त्यामुळेच…”; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका!
lokrang article, book review, ajunahi jivant aahe Gandhi, Gandhi paradigm, poem on Gandhi, Kavita sangrah, ajay kandar, Hermes prakashan, loksatta lokrang, Gandhi s life,
गांधी प्रतिमानांची आजची भावरूपे
Sanjay Nirupam on Shiv sena joining
“मी आलो आणि भंडारा संपला”, संजय निरुपम यांचे पक्षप्रवेशावेळी विधान; एकनाथ शिंदेंची ‘अशी’ होती प्रतिक्रिया
Sarafa, MNS, Avinash Jadhav,
मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात सराफाची तक्रार, पाच कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल
Thane Candidature Decision, mahayuti, ganesh Naik, thane lok sabha seat, ganesh Naik Supporters Protest, Naik Supporters Protest Against naresh Mhaske, Naik Supporters Protest Against Pratap Sarnaik, shivsena, bjp, lok sabha 2024, election 2024,
म्हस्के, सरनाईकांसमोरच नाईक समर्थकांची घोषणाबाजी

आणखी वाचा-संशोधक उद्योगपती प्रभाकर देवधर

स्वातंत्र्यचळवळ घरोघरी पोहोचली

भारतीय स्वातंत्र्याची चळवळ राष्ट्रीय काँगेसच्या पातळीवर तोपर्यंत उच्चविद्याविभूषित आणि विशिष्ट वर्गापुरतीच सीमित होती. गांधीजींनी तिला सामान्य लोकांपर्यंत पोहचवले. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आपल्याला स्वतः संघर्ष करावा लागेल प्रसंगी शिक्षा भोगावी लागेल हा विचार आणि आदर्श गांधीजींनी जनसामान्यांसमोर ठेवला. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी यात्रा, चले जाव अशा अनेक आंदोलनातून ब्रिटिश सत्तेवर दबाव आणला. जरी या आंदोलनांचे यश अपयश अनेक निकषांवर जोखले गेले, तरी गांधीजींचे उपोषण आणि आंदोलनाकडे ब्रिटिशांना दुर्लक्ष करता आले नाही, हेच या यशाचे द्योतक आहे.

देशाच्या अखंडतेसाठी प्रयत्न

हिंदू- मुस्लीम ऐक्यासाठी आणि देशाच्या अखंडतेसाठी जेवढे प्रयत्न गांधीजींनी केले तेवढे क्वचितच कुणी केले असतील. बाकीच्यांनी अखंडतेची फक्त स्वप्ने पाहिली आणि आपल्याच धर्मांध वृत्तीने देशाच्या विभागणीची बिजेही रोवली. इथेच न थांबता गांधीजींचा बळी घेऊन त्याचे खापरही त्यांच्याच माथी मारले आणि या देशाचे तुकडे गांधींमुळेच झाले, असा समज निर्माण केला. पण सत्य हे आहे की हा देश अखंड ठेवण्याच्या प्रयत्नांतील जो सर्वांत मोठा दुवा होता तो तथाकथित धर्मांध आणि अविचारी लोकांमुळे कायमचा तुटला. गांधीजींची शांतता, संतता आणि अहिंसा ही धर्मांधता आणि कट्टरतेला पराभूत करू शकली नाही. स्वातंत्र्याच्या पहाटेला फाळणीचा जो काळोख पसरला त्यात लाखो निरपराधांचा बळी गेला. इतिहासात डोकावून पाहिले तर कळेल की लोकांचे प्राण वाचवण्यासाठी कोण प्रयत्नशील होते आणि कोण दंगलींमध्ये सहभागी होते. हजारोंचे बळ आपल्याकडे असतानासुद्धा दंगल शांत करण्यात गांधींजीच सरस ठरले (आजच्या भाषेत वन मॅन आर्मी) हे माऊंटबॅटन यांचे उद्गार गांधीजींच्या प्रयत्नांच्या परकाष्ठेची साक्ष देतात.

नेहरू की पटेल या वादामागे राजकीय स्वार्थ

गांधीजींनी केलेली राष्ट्रीय नेतृत्वाची निवड ही चूक होती असाही एक प्रवाह (आता लाट) आहे आपल्याकडे. सर्वाधिक प्रांतिक सरकारांनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या बाजूने कौल दिला, हे सत्यही आहे. पण सरदारांच्या उपस्थितीत आणि सहमतीने त्यांनी नेहरूंची निवड केली. सरदार पटेलांच पोलादी व्यक्तिमत्त्व पाहता अयोग्य निवडीला त्यांनी विरोध केला नसता, असे वाटत नाही. नुकत्याच स्वातंत्र्य झालेल्या अस्थिर राष्ट्राला दीर्घकाळापर्यंत धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करू शकेल, असे नेतृत्त्व मिळावे, असा गांधीजींचा यामागचा विचार असावा. सरदार पटेल यांची तेव्हाची शारीरिक स्थिती पाहता, त्यांना दीर्घकाळ नेतृत्त्व करता येणे कठीण होते. स्वातंत्र्यानंतर काही काळातच- १९५०मध्ये पटेल यांचे निधन झाले.

आणखी वाचा-जातीयवादातून मागासपणा वाढतो की मागासपणातून जातीयवाद?

नेहरू आणि पटेल यांचे वैचारिक मतभेद होते, हे खरेच. गोष्टी राजीनाम्यापर्यंतही गेल्या पण दोघांनीही गांधीवाद सोडला नाही. इतिहास जर तर वर अवलंबून नसतो. तो घडलेल्या घटनांचा साक्षीदार असतो. आपल्यावर अन्याय झाला किंवा गांधीजींचा निर्णय चुकला हे असे सरदार पटेल यांनाही वाटले नाही. त्यामुळे ‘सरदार वल्लभभाई पटेल हे पंतप्रधान झाले असते तर?’ हा प्रश्न केवळ राजकारणाची पोळी भाजण्यासाठी निर्माण केलेला प्रश्न आहे.

गांधी- आंबेडकरांची तुलना कशासाठी?

कोणत्याही व्यक्तीच्या कार्याचा प्रभाव सर्वच क्षेत्रात समान नसतो. राजकीय स्वातंत्र्य मिळवताना गांधीजींचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याकडे दुर्लक्ष झाले किंवा वर्णव्यवस्था नैसर्गिक आहे हा त्यांचा दृष्टिकोन त्यासाठी प्रतिकूल ठरला असावा. त्यामुळे सामजिक अन् आता राजकीय स्तरावर ( खासकरून फेसबुक आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये) निर्माण केलेला प्रश्न म्हणजे ‘महात्मा गांधीजी श्रेष्ठ की बाबासाहेब आंबेडकर?’ याचे तर्काधारीत उत्तर म्हणजे प्रत्येक व्यक्ती राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या विषयांमध्ये आपली भूमिका पार पाडत असते. कोणीही सर्वच क्षेत्रांत पारंगत असत नाही. गांधीजींनी संपूर्ण आयुष्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीला समर्पित केले आणि बाबासाहेबांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी जीवन समर्पित केले. एकाने राजकीय स्वातंत्र्य श्रेष्ठ मानले आणि दुसऱ्याने सामाजिक स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्य संग्रामाच्याचा निकष लावला तर गांधीजी श्रेष्ठ आणि सामाजिक समतेच्या लढ्याचा निकष लावला तर बाबासाहेब श्रेष्ठ!! तसे तर दोघेही श्रेष्ठच. पण आपण विवेकवादी विचार न करता मत मांडतो आणि महापुरुषांची वाटणी करतो. त्यामुळे कोणाचीही महानता ठरवताना आधी त्या व्यक्तीने आपले आयुष्य कोणत्या क्षेत्रासाठी समर्पित केले आहे ते पाहिले तर सोपे होईल. दोघांचीही महानता कालातीत आहे. त्यामुळे महापुरुषांची तुलना करताना गफलत नको.

पूर्वी ग्रामीण भागांतील शाळांत घोषणा दिली जायची ‘एक रुपया चांदीचा, सारा देश गांधींचा.’ (आजही देतात) एक हिंदी गीत ही आहे ‘देदी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल’ अशा कित्येक ओळी आहेत, ज्या गांधीजींची महानता अधोरेखित करतात. सारासार विवेकबुद्धी असलेली, कोणताही राजकीय स्वार्थ नसलेली व्यक्ती हे सांगू शकेल की याचा संबंध इतिहासाची मोडतोड करण्यासाठी किंवा इतर क्रांतिकारक आणि हुतात्म्यांचे बलिदान नाकारण्यासाठी नाही, तर हा कवीच्या अतिशयोक्तीचा नमुना आहे.

आणखी वाचा-डॉ. आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात, कारण… 

हे खरे आहे की, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शांतता आणि सशस्त्र या दोन्ही मार्गांचा अवलंब केला गेला आणि आपला राजकीय स्वातंत्र्य प्राप्तीचा उद्देश पूर्ण झाला. एक भारतीय म्हणून आपल्याला जहाल, मवाळ, सशस्त्र क्रांतिकारकांच्या (विचार आणि मार्ग वेगळे असले तरी) त्याग आणि बलिदानाचे स्मरण असणे आवश्यक आहे. बाकी गांधी, नेहरू, पटेल, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांच्यात भेद करायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे काम आपले नेते न विसरता करत आहेतच. याचे पडसादही तसेच उमटतात. उदाहरणार्थ मी एकदा पुण्यात गांधीजींचे चरित्र घेऊन प्रवास करत होतो. बाजूला एक तरुण बसला होता, सहज कुतुहल म्हणून त्याने पुस्तक मागितले, मुखपृष्ठ पाहिले आणि ‘भारतीय इतिहासातला बोगस चॅप्टर म्हणजे गांधी’ असा शेरा मारून त्याने पुस्तक परतही केले. विचारल्यानंतर कळले की त्याने गांधी वाचलेले नाहीत फक्त एकलेले आहेत. एकदा माझा मित्र सांगत होता की त्यांच्या मित्रांमध्ये गांधींबद्दल संवाद चालला होता. अचानक एक जण ओरडला ‘बरं झालं, त्याला मारलं एकनाथ खडसेनं…’ (तो इतका उत्तेजित झाला की नथुराम गोडसे हे नावही विसरून गेला.)

आज भारतातील परिस्थिती पाहता गांधीना अपेक्षित असलेले रामराज्य निर्माण करण्याची भाषा असे लोक करत आहेत जे रावणाला आपला नायक मानतात आणि गांधींचे विचार रुजवण्याची भाषा करतात. त्यांना रस्त्यांवर उतरून जनचळवळ निर्माण करता येत नाही. गांधीजी सर्वांचेच आहेत, पण कोणाचेच नाहीत. आज गांधीजी असते तर नक्की म्हणाले असते ‘वैसे तो पुरी दुनिया के है हम पर…!’
vijayanandmane01@gmail.com