market to instability investors of investment Safe investment gold ysh 95 | Loksatta

..अजूनही सोन्यावरच भरवसा

सराफाकडून खरेदी ते आता ‘डिजिटल’ खरेदी अशी सोने गुंतवणुकीत काळानुसार स्थित्यंतरे आली. या दरम्यान भारतीयांचे सोन्यावरील प्रेम कायम राहिले.

..अजूनही सोन्यावरच भरवसा
प्रतिनिधिक छायाचित्र

गौरव मुठे

सेन्सेक्सने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ६२ हजारांची पातळी गाठली तर त्यात उच्चांकी पातळीपासून सुमारे पाच हजार अंशांची घसरण झाली आहे. बाजारातील याच अस्थिरतेला पर्याय म्हणून गुंतवणूकदार आजही गुंतवणुकीचे सुरक्षित आणि शाश्वत गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याकडे बघतात. 

अनेक दशकांचा पूर्वेतिहास तपासल्यास, चलनवाढ ही सोन्यातील मागणीला उपकारक ठरत आली आहे. महागाईच्या झळांपासून बचावाचे सोने मजबूत साधन समजले जाते. सुरक्षित आणि महागाईवर मात करणारे गुंतवणुकीचे साधन असल्याने गुंतवणूकदारांकडून सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते.

सोन्याने चालू वर्षांत आतापर्यंत शेअर बाजार आणि रोख्यांच्या तुलनेत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान एमसीएक्स गोल्डने ५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिडकॅपने ३.४ टक्के, त्याखालोखाल निफ्टीने २.३ टक्के परतावा दिला आहे. करोनाच्या महासाथीमध्ये गुंतवणूक साधनांमध्ये सोन्याची कामगिरी अव्वल राहिली. त्यानंतर सोन्याने गुंतवणूकदारांना २८ टक्क्यांपर्यंत परतावा दिला. मात्र गेल्या वर्षी ४ टक्के नकारात्मक परतावा नोंदण्यात आला होता. तज्ज्ञांच्या मते, रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेला भूराजकीय तणाव, महागाई आणि त्यापरिणामी उंबरठय़ावर येऊन ठेपलेल्या जागतिक मंदीच्या सावटामुळे सोने हा गुंतवणूकदारांचा पसंतीचा पर्याय राहील. मे महिन्यापासून देशांतर्गत बाजारात सोने मजबूत होत आहे. त्याला ४९,५०० रुपये प्रति दहा ग्रॅमचा मजबूत आधार मिळाला आहे, तर त्याने ५२,७०० रुपये प्रति दहा ग्रॅम रुपयांच्या पातळीवर मजल मारली होती.

सराफाकडून खरेदी ते आता ‘डिजिटल’ खरेदी अशी सोने गुंतवणुकीत काळानुसार स्थित्यंतरे आली. या दरम्यान भारतीयांचे सोन्यावरील प्रेम कायम राहिले. भारतात सोन्याला वेगवेगळय़ा जाती, धर्म आणि संस्कृतींमध्ये वेगवेगळे स्थान आहे. त्यामुळे भारतीयांची सोन्यामध्ये नुसती गुंतवणूक नसते तर भावनिक गुंतवणूक अधिक असते.

सुवर्ण विनिमयमान (गोल्ड स्टँडर्ड) म्हणून होणारा सोन्याचा उपयोग आता मागे पडला असला तरी आर्थिक व्यवहारांतील सोन्याचे महत्त्व आजही टिकून आहे. कारण सोन्याने फक्त भारतीयांनाच नाही तर संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. सोन्याच्या अंगी असणाऱ्या वैशिष्टय़ांमुळे सोने सगळय़ा गुंतवणुकीच्या साधनांमध्ये अद्वितीय आहे. सोन्याची स्थिरता आणि त्याचे मूल्य या दोन्ही गुणांमुळे ते अक्षरश: अक्षय्य बनते. भारतात अगदी पारंपरिक पद्धतीने सोने खरेदी केली जाते. बहुतांश लोक सराफाकडून सोने खरेदी करतात. खरेदी केलेले सोने मुख्यत: दागिन्यांच्या स्वरूपात असते. त्यामुळे आर्थिक उपयोग न करता ते दररोजच्या वापरासाठी किंवा अडचणीच्या काळात गुंतवणूक म्हणून घेतले जाते. मात्र बऱ्याचदा अडचणीत असताना देखील लोकांचा सोने विक्रीला अखेरचा पर्याय म्हणून बघितले जाते.

आपल्याला सोन्याचे लाभ-जोखीम गुणोत्तर (कमी जोखीम आणि फायद्या-खरेदीची शक्यता अधिक) समजून घेणे आवश्यक आहे. सोन्यामध्ये जोखीम कमी आणि फायदा अधिक असल्यामुळे आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी काही टक्के गुंतवणूक सोन्यामध्ये दीर्घकाळासाठी करत राहणे कधीही शहाणपणाचे ठरू शकते. गेल्या काही वर्षांत सोन्यातल्या गुंतवणुकीने खूप आकर्षक परतावा दिला नसला तरी निराशदेखील केलेले नाही. गुंतवणुकीचा सुरक्षित आकर्षक पर्याय म्हणून गुंतवणूकदारांच्या यादीमध्ये सोन्याचे स्थान अजूनही वरचे आहे. याचमुळे आजही काही गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीतील काही हिस्सा सोन्यात नियमितपणे करतात.

अगदी सुरुवातीला सोन्याची खरेदी करण्यासाठी सराफ हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. त्याच्याकडून पारंपरिक स्वरूपात सोने खरेदी केले जात असे. तासनतास बसून सोन्याचे दागिने खरेदी केली जात होते. शिवाय विक्रीच्या वेळी त्यामध्ये पुन्हा घट घेतली जाते. आता मात्र अगदी घरबसल्या आपण ‘डिजिटल’ माध्यमातून काही मिनिटांत सोने खरेदी करू शकतो. शिवाय त्यावर कोणतीही घट न लागता ते तेवढय़ाच वेळेत विकूदेखील शकतो.

दृष्टिकोन बदलणे आवश्यक

आता सोन्याच्या व्यवसायात ज्यानुसार स्थित्यंतरे आली त्यानुसार आपल्याला सोने गुंतवणुकीच्या बाबतीत दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. बऱ्याचदा दागिने स्वरूपात घेतलेले सोने वर्षांनुवर्षे कपाटात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये पडले असते. त्यावर काहीच परतावा मिळत नाही. शिवाय ते सोने सांभाळण्यासाठी बँकेला पैसे द्यावे लागतात. अडचणीच्या काळातदेखील सोने विक्री सगळय़ात शेवटचा पर्याय म्हणून बघितला जातो. मात्र आता गरज आहे सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहण्याची. सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक आणि त्यावर परतावा मिळविणे देखील शक्य आहे.

 सोन्याच्या व्यवसायाची स्थित्यंतरे आणि पर्याय थोडक्यात बघू या.

  सोन्याची नाणी/ वळी/ बिस्किट्स- यात दोन प्रकार आहेत.

कोणतेही ‘सर्टिफिकेशन’ नसणारी नाणी/वळी आणि ‘सर्टिफिकेशन’सह विकली जाणारी नाणी/बिस्किट्स.

  गोल्ड म्युच्युअल फंड

सध्या ११ म्युच्युअल फंड असा गुंतवणूक पर्याय देत आहेत. ‘रेग्युलर’ आणि ‘डायरेक्ट’ या दोन्ही प्रकारे इथे पैसे गुंतवता येतात. यांची ‘मॅनेजमेंट फी’ ०.२ ते १.४ टक्का इतकी असून गेल्या एक वर्षांचे परतावे ५ ते ९ टक्क्यांदरम्यान आहेत. ‘गोल्ड ईटीएफ’प्रमाणे ही गुंतवणूकसुद्धा आर्थिक पद्धतीची असून सोने हातात येत नाही. 

  पारंपरिक विरुद्ध ‘मॉडर्न’ सोने खरेदी (डिजिटल गोल्ड)

सध्या बाजारात ‘ऑनलाइन’ माध्यमातून देखील ‘डिजिटल’ सोने खरेदी करता येते. ‘डिजिटल पेमेंट’ पर्यायांद्वारे किंवा ‘इंटरनेट बँकिंग’च्या माध्यमातून शुद्ध सोने खरेदी करता येते. अगदी २० रुपयांपासून ग्राहकांना ही सोने खरेदी करता येते.

  ‘गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड’(गोल्ड ईटीएफ):

‘गोल्ड ईटीएफ’ सोने खरेदीचा एक चांगला पर्याय आहे. म्हणजे सोन्याची युनिट रूपाने विक्री करणे. साधारणपणे एक ग्रॅम सोन्याच्या समतुल्य एक युनिट असते. हा पर्याय म्हणजे ‘पेपरगोल्ड’ म्हणजे युनिटच्या रूपामध्ये सोने खरेदी करणे. प्रत्यक्ष सोन्याऐवजी ‘डिमॅट’ खात्यात सोने नावावर जमा होते.

  ‘गोल्ड सॉव्हर्जिन बॉण्ड’ (सार्वभौम सुवर्ण रोखे)

सध्या सुवर्ण खरेदीसाठी सर्वात आकर्षक आणि लोकप्रिय पर्याय म्हणजे ‘गोल्ड सॉव्हर्जिन बॉण्ड’ अर्थात सार्वभौम सुवर्ण रोखे आहे. सरकारने प्रत्यक्ष सोन्यातील गुंतवणूक कमी करून ती सरकारी रोख्यांमार्फत अर्थव्यवस्थेमध्ये येण्यासाठी सार्वभौम सुवर्ण रोखे बाजारात आणले आहेत. केंद्र सरकारची हमी असणारे हे सुवर्ण रोखे किमान एक ग्रॅम, व्यक्ती व हिंदू कुटुंब अविभक्त पद्धतीसाठी कमाल चार हजार ग्रॅम; तर ट्रस्ट व तत्सम संस्थांसाठी वीस हजार ग्रॅम वजनाचे सुवर्ण रोखे एका आर्थिक वर्षांत खरेदी करता येतात.

सुवर्ण रोख्यांनी किती परतावा दिला?

सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेने गुंतवणूकदारांना सहा वर्षांत जवळपास सरासरी ८० टक्क्यांहून अधिक लाभ दिला आहे. २०१६-१७ आर्थिक वर्षांत प्रति ग्रॅम २,८९३ रुपये किमतीने जारी केले गेलेल्या सुवर्ण रोख्यांची किंमत सध्या दुप्पट झाली आहे. त्यासाठी मुदतपूर्व पूर्ततेसाठी विमोचन मूल्य ५,०७७ प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षांतील पाचव्या मालिकेत प्रति ग्रॅम ५,१९७ रुपयांना विक्री करण्यात आली.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
रिअल इस्टेटला बूम

संबंधित बातम्या

हसण्यावारी हुकुमशाही..
क्वीअर सर्वनाम
सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाला ‘ओझे’ म्हणणे ही नाण्याची एक बाजू…
विद्रोहाला देशद्रोह मानणारी ‘ध्येयधुंदी’..
धम्मदीक्षेची ६६ वर्षांची परंपरा आजही तितकीच ओजस्वी… २६ हजार नागरिकांनी यंदा घेतली धम्मदीक्षा !

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs BAN 3rd ODI: विराट कोहलीने शतक झळकावत रिकी पॉंटिंगचा ‘हा’ विक्रम काढला मोडीत
चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “वाह रे पठ्ठ्या…”
‘हा’ लोकप्रिय भारतीय अभिनेता एलॉन मस्कच्या सहाय्याने घेणार अंतराळात झेप
सुपरमार्केटमध्ये खिडक्या का नसतात? यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित
“आता तुम्ही दिलेलं मत कुठे जाणार आणि कुठून कुठून जाणार, हे तुम्हाला तरी कळतं का?” – उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला!