वैशाली चिटणीस

रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला, संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केलेला ‘ॲनिमल’ हा सिनेमा सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. संदीप रेड्डी वांगा यांचा अर्जुन रेड्डी आणि त्याचा हिंदी अवतार असलेला कबीर सिंग होता, तसाच किंवा त्याहूनही आणखी दोन पावलं पुढे जात हा सिनेमा पुरुषांमधल्या हिंसेची, तसंच ‘अल्फा मेल’ची रुपं दाखवतो आणि ते सगळं भयंकर आहे, असं एक मत आहे. आत्यंतिक पुरुषी असलेली ‘ॲनिमल’ मधली रणविजय ही व्यक्तिरेखा अत्यंत मिसोजेनिस्ट म्हणजे स्त्रीद्वेष्टी आहे, असं एक मत आहे. तर ‘ॲनिमल’ हे नाव असलेल्या सिनेमाकडून सरळ- साध्या गोष्टीची अपेक्षा करणंच चुकीचं असं कुणाला वाटतं तर कुणाला या सिनेमातल्या नायकाच्या ‘अल्फा मेल’ स्वरुपाबाबत सिनेमा पाहताना स्त्रिया ज्या पद्धतीने टाळ्या वाजवत प्रतिसाद देतात, ते चिंताजनक वाटतं आहे. एकुणात काय तर बऱ्याच दिवसांनी एखाद्या सिनेमाबद्दल एवढी उलटसुलट चर्चा होते आहे. तसं एखादा नवीन सिनेमा आला, चाहत्यांना आवडला किंवा त्यात काहीतरी लक्ष वेधून घेणारं असलं की त्याची चर्चा होतेच. उदाहरणार्थ शाहरुख खानच्या जवान सिनेमाबद्दलही भरपूर चर्चा झाली, पण तिचे संदर्भ वेगळे होते. ‘ॲनिमल’चे संदर्भ पूर्ण वेगळे आहेत. असा सिनेमा स्त्रियांबद्दलचा सगळा पुरोगामी विचार मागे नेऊन ठेवतो, म्हणून तो आक्षेपार्ह आहे, असं काहीचं म्हणणं आहे, तर असं एवढ्या टोकाला जाऊन चर्चा करण्यासारखं त्या सिनेमात काहीही नाही, उगाच चिंता करू नका असाही एक प्रवाह आहे. गंमत म्हणजे सिनेमा बघितलेला नाही, असे लोकही या चर्चेत आपलं मत पुढे करताना दिसत आहेत.

Google Doodle Hamida Banu First women Wrestler
“मला हरव, तुझ्याशी लग्न करेन”, म्हणणारी १०८ किलोची ‘सिंहीण’; गूगल डूडलवर झळकणाऱ्या बानूची पडद्यामागची गोष्ट!
Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
Rani Mukerji reacts on feud with sister Kajol
“मतभेद सर्वत्र होतात, पण…”, काजोलबरोबरच्या वादावर स्पष्टच बोलली राणी मुखर्जी; दोघींचं नातं काय? जाणून घ्या
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?

तर या सिनेमात दाखवलेल्या पुरूषी आक्रमकता किंवा अल्फा मेल या वृत्तीबद्दल आणि तिला प्रतिसाद का मिळतो आहे, याची चर्चा. मुळात ‘ॲनिमल’ सिनेमात असं काही आहे याची हे काहीतरी वेगळं. नवं आहे, चिंताजनक आहे अशा पद्धतीने चर्चा करण्याचीच गरज नाही कारण आपण, आपला समाज असेच आहोत. ज्या सिनेमाच्या माध्यमातून हे सगळं दाखवलं जातं, तो मुळात तयार होतो तोच पुरुषांसाठी. पुरूष प्रेक्षक हेच आपल्या सिनेमाचे खरे ग्राहक असतात. त्यामुळे त्यांना रिझवण्यासाठी, त्यांना आपले पैसे वसूल झाले आहेत, असं वाटावं याच पद्धतीने सिनेमा तयार केला जातो. अगदी मोजके अपवाद वगळले तर सिनेमा कशा पद्धतीने पेश केला जातो, त्यात स्त्रियांना ज्या पद्धतीने दाखवलं जातं, ते लक्षात घेतलं की सिनेमा कसा पुरुषांसाठीचं तयार केला जातो, हे लक्षात येतं. स्त्री पुरुषांचं प्रेम ही अनेकदा सिनेमांची मुख्य संकल्पना असते. त्यातील तथाकथित नायक त्याला आवडलेली नायिका मिळवण्यासाठी सगळ्या खटापटी करतो. प्रसंगी खलनायक आणि त्याच्या सहकाऱ्यांची दोन हात करतो. वेळप्रसंगी समाजाशी संघर्ष करतो. त्याने त्याच्या सामर्थ्याचं प्रदर्शन करायचं आणि त्याला आवडलेली स्त्री मिळवायची हेच आपला सिनेमा आधीपासूनच दाखवत आलेला नाही का? मग हे अल्फा मेलपेक्षा वेगळं काय आहे ? आपल्यासाठी असं सगळं करणाऱ्या तथाकथित सामर्थ्यवान पुरुषाला हवं ते करायला आपण तयार आहोत, किंवा आपल्याला असाच पुरुष मिळायला हवा असंच स्त्रियांना वाटावं अशीच त्यांचीही मानसिकता तयार करून दिली जात नाही का? एखाद्या स्त्रीला एखादा पुरुष मिळवायचा आहे आणि त्यासाठी ती आपलं सगळं सामर्थ्यं वापरते आहे असं किती सिनेमे दाखवतात? उलट तिने निर्बुद्धपणे आपल्या सौंदर्याचा वापर करायचा आणि पुरुषाने त्याच्या सामर्थ्याचा हेच मिथक आपला सिनेमा कायमच ठसवत आला आहे. त्यामुळे अल्फा मेल ही संकल्पना खरंतर आपल्या सिनेमात वेगवेगळ्या पद्धतीने कायमच मांडली गेली आहे.

आणखी वाचा-Animal: कोण अल्फा मेल? फेमिनिस्ट मत तर राहूद्या पुरुषांवरही अन्याय करणारा अ‍ॅनिमल, नव्हे ‘राक्षस’!

पुरुष हा मुळात टोळीत वावरणाऱ्या प्रमुख नरासारखाच असतो, तो त्याला हवं ते आधी सामोपचाराने मिळवायचा प्रयत्न करतो आणि ते तसं मिळालं नाही तर आक्रमकपणे मिळवतो, हिसकावून घेतो. आणि आपल्याला मिळवण्यासाठी कुणीतरी सामर्थ्याचं प्रदर्शन करतं, आपल्या कुटुंबासाठी कुठल्याही थराला जातं ही गोष्ट स्त्रियांना आवडते, हेच सिनेमांनी आपल्याला शिकवलं आहे. एकदा ही मानसिकता तयार असल्यावर थोड्याफार फरकाने त्यात बसेल अशीच कथानकं तयार होणार यात आश्चर्य ते काय?

आणि सिनेमाही या सगळ्या गोष्टी कुठून आणतो, तर समाजातूनच ना? मुलामुलींना आपण लहानपणापासून काय शिकवतो? मुलाने पुरुषार्थ गाजवायचा असतो. त्याने कठोरपणे वागायचं असतं. त्याने कधी रडायचं नसतं. भावनांचं प्रदर्शन करायचं नसतं. त्याने बायकोच्या फार आहारी जायचं नसतं. आईबहिणींचं रक्षण करणं ही त्याची जबाबदारी आहे. सासरी त्याने जावई म्हणून रुबाब दाखवायचा असतो. स्त्रैण गोष्टींमध्ये त्याला रस असता कामा नये. त्याच्याकडे ताकद असेल तर त्याला हवी ती गोष्ट मिळवता येईल. ही ताकद कुणाकडे शारीरिक स्वरुपात असेल तर कुणाकडे सत्तेच्या स्वरुपात. तर कुणाकडे आर्थिक पातळीवर. थोडक्यात तो यापैकी कोणत्या तरी गोष्टीत इतरांपेक्षा थोडा अधिक असायला हवा. अल्फा नर असायला हवा.

त्याने पुरुषार्थ गाजवला पाहिजे म्हणजे आपोआपच तो बलदंड असला पाहिजे. ५६ इंची छाती ही या बलदंड पणाचंच प्रतीक. आता कुणी शारीरिकदृष्ट्या बलदंड असण्यात चुकीचं, वाईट काहीच नाही. पण मग शारीरिकदृष्ट्या कमजोर किंवा सौम्य व्यक्तिमत्वाच्या पुरुषाचा आपोआप अपमान सुरू होतो. नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचे ५६ इंची छातीचे उल्लेख आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या अबोल असण्याचा मुखदुर्बळ म्हणून केले गेलेला उपहास हा याच पौरुषाच्या मानसिकतेमधून येतो. पुरुषाने शारीरिक पातळीवरच त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं पाहिजे हे त्याच्यावर सतत या पद्धतीने ओझं टाकलं जातं.

आणखी वाचा-‘ॲनिमल’ क्रूरच, बाकी वास्तवात बायका कापल्या जातात हा भाग वेगळा!

मर्द- नामर्द या तर आपल्या राजकारण्यांच्या अतिशय आवडत्या संकल्पना. कुणीतरी मर्दाची औलाद आहे, कुणीतरी नामर्द आहे, कुणाला तरी बांगड्या भरण्याची गरज आहे, कुणीतरी जाऊन चूल सांभाळावी असल्या गोष्टी सतत भाषणांमधून सांगितल्या जातात. सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांमधून तलवार उपसून दाखवली जाते. सहकारी स्त्रियांबद्दलचे अवमानकारक उल्लेख तर पावलोपावली होत असतात. हे फक्त राजकारणात आहे, असं नाही, तर ते समाजातच आहे. राजकारणात ते उघडपणे, थेटपणे समोर येतं इतकंच.

कुटुंबातल्या मुलीने जातीबाहेर जाऊन प्रेम जमवलं किंवा त्यापुढे जाऊन लग्न केलं तर तिचा जीव घेणारे बाप आणि भाऊ आपल्या समाजात आहेत. तिच्याशी गोड बोलून तिला संपत्तीमधली एक पै न देणारे बाप आणि भाऊ आपल्या आसपास वावरताना दिसतात. भाजीत मीठ कमी किंवा जास्त पडलं म्हणून बायकोचा जीव घेणारे आहेत. अत्यंत क्रूर पद्धतीने बायकोला, प्रेयसीला संपवणारे पुरुष आहेत. याबरोबरच या पद्धतीच्या पुरुषांना या पद्धतीनेच घडवणाऱ्या किंवा त्यांच्या पुरुषी आक्रमकतेला खतपाणी घालणाऱ्या स्त्रियाही आहोत. कारण या सगळ्यांवर त्यांनी असंच असायला हवं हेच वर्षानुवर्षे ठसवलं गेलं आहे. एखादा पुरुष भावनाविवश होऊन रडलेला आपल्याला चालत नाही किंवा एखादी स्त्री मला मूल नको असं म्हणाली तर आपल्याला ते चालत- आवडत नाही. कारण त्यांनी तसं करायचं नसतं, हेच आपल्याला वर्षानुवर्षे माहीत असतं.

पौरुषाच्या, बाईपणाच्या संकल्पनांचे ठराविक साचे असलेल्या समाजात अॅनिमल सारखा सिनेमा तयार होतो यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे?
vaishali.chitnis@gmail.com