भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख म्हणून कर्नाटकातील हासनचे अलुर सीलिन किरणकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जी. माधवन नायर व एस. राधाकृष्णन या पूर्वीच्या प्रमुखांची नियुक्तीही वयाच्या साठीनंतर करण्यात आली होती. तेच धोरण पुढे चालवीत वयाची ६२ वर्षे पूर्ण करणाऱ्या किरणकुमार यांच्या हाती इस्रोची सूत्रे देऊन तरुणांना वाव देण्याचा संकल्प एनडीए सरकारने पाळलेला नाही. किरणकुमार हे आता अवकाश विभागाचे पदसिद्ध सचिव व अवकाश आयोगाचे अध्यक्षही असणार आहेत. असे असले तरी ते कामात गाडून घेणारे आहेत. असा माणूस वरिष्ठ म्हणून लाभणे दुर्मीळच, असे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ते सांघिक पातळीवर या संस्थेला पुढे घेऊन जातील व अवकाश संशोधनातील आव्हाने सहजगत्या पेलतील अशी आशा आहे. यू. आर. राव यांच्यानंतर इस्रोचे ते दुसरे कर्नाटकी प्रमुख आहेत. त्यांची नेमणूक सरकारने तीन वर्षांसाठी केली आहे.
मंगळयान व चांद्रयान मोहिमेसह भूस्थिर उपग्रह व प्रतिमा संवेदक तयार करण्यात त्यांनी मोठी कामगिरी केलेली आहे. भारताच्या पहिल्या दूरसंवेदन उपग्रहांपैकी एक असलेल्या ‘भास्कर’ या उपग्रहाचे काही भाग तयार करण्यातही त्यांचा वाटा होता.
दूरसंवेदन व सागरी हवामानाशी संबंधित उपग्रह संशोधन ही त्यांची मुख्य क्षेत्रे आहेत. ‘काटरेसॅट २’या उपग्रहाच्या बांधणीत त्यांनी जे संवेदक वापरले होते त्यामुळे अतिशय स्पष्ट प्रतिमा मिळवण्यात इस्रोला यश आले होते. इंडियन सोसायटी ऑफ रिमोट सेन्सिंग अॅवॉर्ड, वासविक अॅवॉर्ड, अॅस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया अॅवॉर्ड, भास्कर अॅवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅस्ट्रॉनॉटिक्सचे ते सदस्य असून ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिनीयर्स’ या संस्थेचे फेलो आहेत.
किरणकुमार यांनी बसवनागुडी येथील नॅशनल कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयात बी.एस्सी. पदवी घेतली आहे. त्यानंतर बंगळुरूच्या विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स विषयात एम.एस्सी. केले. बंगळुरू येथीलच ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ या संस्थेतून त्यांनी एमटेक ही पदवी भौतिक अभियांत्रिकीत घेतली. त्यानंतर १९७५ मध्ये ते इस्रोत रुजू झाले. गेल्याच वर्षी त्यांना सरकारकडून पद्मश्री हा नागरी किताब दिला गेला होता. विक्रम साराभाई अवकाश केंद्रातील माजी संचालक बी. एन. सुरेश यांच्या मते किरणकुमार हे चांगले तंत्रज्ञ असून इस्रोची जबाबदारी पेलण्यास समर्थ आहेत यात शंका नाही.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2015 रोजी प्रकाशित
ए. एस. किरणकुमार
भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख म्हणून कर्नाटकातील हासनचे अलुर सीलिन किरणकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
First published on: 14-01-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran kumar new isro chief